अध्यात्माची लय अंगात भिनलेली माणसे स्वत:च्याही नकळत इतरांना शहाणे करतात. चित्रकार अकबर पदमसी तसे होते..

कलाबाजार जेव्हा फार सोकावू लागला, तेव्हा मात्र पदमसींनी कॅनव्हासवर रंगचित्रे करणे टाळून साधीसुधी, एकरंगी, साध्याच माणसांची चित्रे केली. चित्र करत राहणे हाच खरा मोबदला मानला आणि गांधीजींची चित्रे हुबेहूब दिसण्यापेक्षा, ‘गांधी ओळखू येण्या’चे महत्त्व ओळखले..

प्रसारमाध्यमांना सरसकट बोल लावण्याचे दिवस नव्हते, तेव्हाची गोष्ट. तारीख २९ एप्रिल १९५४. मूळचा मुंबईकर, पण पॅरिसमध्ये दोन वर्षे राहून तेथेही बक्षीस वगैरे मिळवणारा एक तरुण चित्रकार मुंबईत चित्रप्रदर्शन भरवतो. त्या चित्रांना त्याकाळच्या एका इंग्रजी दैनिकातून भरभरून दादही मिळते, परंतु या चित्रांची प्रशंसा करणाऱ्या याच लिखाणात एका चित्राचा उल्लेख निराळ्या पद्धतीने होतो. हे चित्र शयनगृहातील एका युगुलाचे. ‘प्रेमिक’ हेच त्या चित्राचे नाव. मात्र त्या चित्रातील स्त्रीच्या अंगावर वस्त्रे नाहीत आणि तिच्या खांद्यावर पुरुषाचा असलेला हात जरा अधिकच खाली आहे हे सारे कुणाला आक्षेपार्ह वाटणार नाही काय, असा सवाल त्या दैनिकाने केला होता. मग आक्षेपांची राळच उडाली. या तरुण चित्रकाराविरुद्ध पोलिसांनी अश्लीलतेचा गुन्हा दाखल करून ताब्यातही घेतले. त्या काळचे पोलीस, ताब्यात घेतलेल्यास विनाविलंब न्यायाधीशांपुढे नेत. तसेही झाले आणि न्यायाधीशांपुढे या तरुण चित्रकाराने गुन्हा कबूल करणे नाकारले. शिक्षा भोगेन पण स्वत:च्या चित्राला अश्लील म्हणणार नाही, असे या तरुणाचे म्हणणे. मग तो हात तिथे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी केला त्यावर या तरुणाचा प्रतिप्रश्न – तो हात तिथे नसता, तर हे नवराबायकोच आहेत असे कशाला म्हणावे?.. हेका न सोडणारा त्या वेळचा हा तरुण म्हणजे अकबर पदमसी. माध्यमांनी माझ्याविरुद्ध कट केला असे म्हणत स्वत:च्या कृतीचा दोष दुसऱ्यावर ढकलणे, खजुराहो वगैरे ठिकाणच्या कामशिल्पांचे दाखले देऊन पूर्वापार चालते ते पाप कसे असा बचाव करणे, यापैकी काहीही पदमसी यांनी केले नाही. स्वत:च्या कृतीची जबाबदारी स्वत:चीच, ही समज त्यांनी आयुष्यभर जपली आणि मुंबईतच नव्हे तर भारतीय तसेच जागतिक कलाक्षेत्रात नाव मिळवले. अकबर पदमसी यांची निधनवार्ता सोमवारी आल्यानंतर चित्रकार हळहळले असतील, पण हे जाणे केवळ एका यशस्वी चित्रकाराचे नसून आत्मजाणीव जपणाऱ्या एका महत्त्वाच्या भारतीयाचे होते.

ही जाणीव भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून आली म्हणावे, तर तो अभ्यास पदमसींनी केलाच कशाला असा प्रश्न पडतो. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पदमसी १९४८ पासून शिकू लागले, तेव्हा कलागुरू शंकर पळशीकर हे नुकतेच अध्यापक म्हणून रुजू झाले होते. पळशीकर हे पदमसींपेक्षा दहा वर्षांनी मोठे तर पुढे जेजेतील धातुकला विभाग नावारूपाला आणणारे नागेश साबण्णवार हे केवळ तीन वर्षांनी मोठे. पण या दोघांचा प्रभाव पदमसींनी जपला. म्हणजे या दोघांच्या नकला न करता, पळशीकरांची साधना आणि साबण्णवारांची कृतिशीलता स्वत:त रुजवण्याचा आजन्म प्रयत्न केला. आधुनिक कला भारतीय असावी, ही अपेक्षा १९४८ मध्ये सार्वत्रिक होती आणि आनंद कुमारस्वामींनी प्राचीन भारतीय कलेतिहासातून आधुनिकतेचे दुवे शोधण्याचा केलेला प्रयत्न मुल्कराज आनंद आदी पुढे चालवीत होते. अशा काळात संस्कृतची शिकवणी लावून पळशीकरांच्या बोलण्यात ज्यांचा उल्लेख असे ती गीता आणि उपनिषदे पदमसींनी वाचली. कलेचे मर्म समजण्यासाठी आधी तत्त्वज्ञान माहीत असले पाहिजे, यासारखा उपदेश पदमसींनी अक्षरश: झेलला. १९५१ मध्ये पॅरिसला गेल्यावर त्यांना रझा, रामकुमार आणि सूझासारखे भारतीय मित्र भेटले, पॅरिसमध्येच जोडीदारीणही मिळाली. तिथे जम बसू लागला. तरीही आपण इथे परके आहोत ही जाणीव त्यांना होती. त्या काळची रझा आणि पदमसींची पॅरिसनजीकची शहरचित्रे सारखीच दिसतात. पण त्याच वेळी पदमसींचा चित्रविचारही मूकपणे पुढे जात होता. ‘रंग म्हणजेच अवकाश’ असा काहीसा त्या वेळचा तो विचार, राखाडी छटांमधून उद्गार शोधत होता. पण या विचाराचा खरा आविष्कार झाला तो त्यांच्या पुढल्या काळातील ‘मेटास्केप’ या मालिकेत. लाल, निळा, पिवळा अशा मूळ रंगांतून निसर्गचित्रांसारखीच भासणारी, पण परा म्हणजे मेटा अनुभव देणारी ही चित्रे होती. निसर्गचित्राच्या ‘आत’ पाहाण्यास सरावलेल्या कलारसिकांचे डोळे या परादृश्यांतही खोलवरची मिती शोधू लागत. पण तसे करताना आपण पुन्हा सपाटीकडेच का आलो, हे अनेकांना कळत नसे. याचे कारण म्हणजे या परादृश्यांचा काहीसा खवलेदार पोत आणि रंग-अवकाशाच्या सायुज्यामुळे साधलेली सखोलता यांमधून होणारी नजरबंदी. हा पोत पॅलेटनाइफ या साधनामुळे येई. ‘आयुध एकच, पण तेच रंग लावते आणि त्याच वेळी रंग काढूनही घेते’ असे या पॅलेटनाइफचे वर्णन पदमसी करीत.

मात्र कोणत्याही आयुधाला नकार न देता सर्व प्रकारचे काम करून पाहायचे, हा अकबर पदमसींचा खाक्या. त्यामुळेच १९६९ मध्ये त्यांना ‘नेहरू फेलोशिप’चे तीन लाख रुपये मिळाले, त्यातून त्यांनी फक्त चित्रकारांसाठी, प्रयोगशील चित्रपट बनवण्याचा स्टुडिओ स्थापला! त्या काळी हे धाडसच. हुसेन, नलिनी मलानी, गीव्ह पटेल या साऱ्यांनी पहिलेवहिले लघुपट वा सचेतपट अकबर पदमसींच्या या ‘व्हिजन एक्स्चेंज वर्कशॉप’मध्ये बनवले. हे धाडस १९७२ मध्येच गुंडाळावे लागले, पण तोवर अकबर पदमसी यांनीही ‘सीझीगी’ हा, निव्वळ अक्षरचिन्हांचा वापर असलेला साडेसोळा मिनिटांचा लघुपट साकारला होता. पॅरिसला सुरू केलेला संसार रूढार्थाने अपयशी ठरत असताना पदमसी कलाकारांच्या औपचारिक संघटनांपासूनही दूर राहिले. मात्र तय्यब मेहता, सुधीर पटवर्धन, पुढे अतुल दोडिया, बोस कृष्णम्माचारी असे विविध वयांचे मित्र त्यांनी जोडले. याच प्रवासात कधी तरी त्यांना भानु पदमसी ही जोडीदार मिळाली. पुढल्या काळात तर ‘जेजे’च्या विद्यार्थ्यांना पदमसींकडे घेऊन जाणे, हा बोसचा एक उपक्रमच ठरला. पदमसी अशा विद्यार्थ्यांशी सौम्यपणे चित्रकलेबद्दल बोलत. तंत्रकौशल्य हवेच आणि वाचनही हवे, हे आवर्जून सांगत.

कुरळे केस, आडवा प्रसन्न चेहरा, आडमाप म्हणावा असा बांधा असलेले पदमसी समवयस्कांशी मात्र रगेलपणे बोलत. तीन लाख रुपये स्वत:साठी न वापरता त्यातून भारतीय चित्रकारांच्या ‘चलचित्रकले’चा इतिहास रचणारे पदमसी, ‘पैसा जपून वापरावा’ असे इष्टमित्रांना सांगत. अगदी व्यावहारिक सल्लेसुद्धा खासगीत देत आणि ‘मला हल्ली पैसाच दिसतो’ असा विनोद मात्र स्वत:वर जाहीरपणे करत. पण कलाबाजार जेव्हा फार सोकावू लागला, तेव्हाच पदमसींनी कॅनव्हासवर रंगचित्रे करणे टाळून साधीसुधी, एकरंगी, साध्याच माणसांची चित्रे केली. का? याचे थेट उत्तर नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘दगडाला टाकी केल्यासारखे’ चित्रकाम करीत राहाणे हाच त्यांना खरा मोबदला वाटे. आसपासच्या घटनांनी अस्वस्थ जरूर व्हायचे, पण त्या घटनांमध्ये वाहावत जाऊन काही तरी प्रतिसाद द्यायचा नाही असा अभिजातपणा त्यांनी जपला. या अभिजातपणाची खूण म्हणजे पदमसी यांची गांधी-चित्रे. ती १९९२-९३ पासून होत गेली आणि पाच-सहा वर्षांनंतर प्रदर्शनात दिसली. हे रेखन हुबेहूब नाही, असा आक्षेप पोरसवदा समीक्षक घेत होते आणि तसल्या समीक्षकाला झिडकारून टाकण्याऐवजी पदमसी प्रतिप्रश्न विचारत होते, ‘‘गांधीजी हे गांधीजींसारखेच दिसणं महत्त्वाचं की गांधी ओळखू येणं महत्त्वाचं?’’

अध्यात्माची लय अंगात भिनलेली माणसे स्वत:च्याही नकळत इतरांना शहाणे करतात. पदमसी तसे होते. गीतेतल्या कर्मयोगापेक्षा निराळे, मांडुक्योपनिषदातील ‘एक झाड दोन पक्ष्यां’चे तत्त्व ही त्यांच्या आयुष्याची लय होती. पदमसींच्या झाडावरला एक पक्षी पॅलेटनाइफने काम करी, दुसरा केवळ मितीच्या आभासाची फळे खाई; पण आपण परादृश्यच पाहायचे आहे हे त्यांना माहीत असावे. परादृश्याचा हा प्रवासी आता अनंतात विलीन झाला. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना आदरांजली.