उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खाँसाहेबांनी केवळ शैलीपुरतेच आपले सर्जन अडकवून ठेवले नाही. इंग्लिश गिटारवादक ज्युलिअन ब्रेम यांच्याबरोबर त्यांनी १९६३ मध्ये जाहीर कार्यक्रम सादर केला. संगीतातून व्यक्त होणाऱ्या भारतीय संवेदनांना पाश्चात्त्यांच्या शैलीत मिसळून टाकणे ही तेव्हा अजब गोष्ट होती. ऐकणाऱ्यास या दोन्ही संगीत परंपरांचा आकळ होत असतानाच एका नव्या आनंदाची अनुभूतीही मिळाली आणि त्यातूनच जागतिक पातळीवरील स्वरसंवादाला सुरुवात झाली.

संगीताच्या दुनियेत प्रथा, परंपरा, रूढी आणि चालीरीती यांना फार महत्त्व. कोणतेही उस्तादजी, पंडितजी किंवा श्रद्धेय गुरुजनांचे नुसते नाव जरी उच्चारले, तरीही कानाच्या पाळीला हात लावण्याची एक परंपरा आहे. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांचे नाव घेताच समस्त रसिक मंडळीही कानाच्या पाळीला हात लावून आपला आदर व्यक्त करत आले आहेत. याचे कारण या सगळ्यांच्या आयुष्यात खाँसाहेबांनी जो अपूर्व स्वररंग भरला आहे, त्याने त्यांचे आयुष्य खरोखरीच समृद्ध झाले आहे. भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेत वाद्यवादनाच्या क्षेत्रात आपल्या अफाट कर्तृत्वाने पुढे आलेल्या मोजक्या कलावंतांपैकी उस्ताद अब्दुल हलीम होते. बीन हे भारतीय संगीताचे स्रोतवाद्य म्हणता येईल. कृष्णाच्या बासरीने भारतीय उपखंडातील संगीताला नवा साज मिळाला. पण त्यापुढे जाऊन विज्ञानाची कास धरून संगीताची सुंदर दुनिया सजवण्यासाठी बीन, सतार, सरोद यांसारख्या वाद्यांची निर्मिती झाली आणि एका नव्या अनोख्या स्वरानुभवाला सामोरे जाता आले. सतार या वाद्याने स्वरप्रेमींच्या गळ्यातला ताईत होण्याचा मान मिळवला, याचे कारण त्यातून संगीत व्यक्त होण्याच्या अनेक शक्यता. माणसाच्या उत्क्रांत अवस्थेत संगीत निर्माण करण्यासाठी त्याच्याजवळ असलेले एकमेव हुकमी साधन गळा एवढेच होते. मेंदूत तयार होणारे संगीत व्यक्त करण्यासाठी या गळ्याचा त्याने हरतऱ्हेने उपयोग करण्यास सुरुवात केली. पण एक वेळ अशीही आली, की मेंदूत निर्माण होणारे संगीत व्यक्त करण्यासाठी गळाही अपुरा पडतो आहे की काय, असे वाटू लागले. नावीन्याचा शोध हे तर माणसाचे सर्वात मोठे शस्त्र. त्यातूनच वाद्यांची निर्मिती झाली असावी आणि गळ्याच्या मर्यादा ओलांडून नवे संगीत साध्य करण्याची इच्छाशक्ती जागृत झाली असावी. मात्र त्यासाठी वाद्यावर हुकमत असणे फारच जरुरीचे.

सतार, सरोद, बीन, वीणा यांसारख्या तंतुवाद्यांवर आपले वर्चस्व निर्माण करणे ही फारच कमाल गोष्ट. स्वर निर्माण करणाऱ्या पट्टय़ा सतारीत असतात, तर सरोद आणि वीणेमध्ये त्या जागा अदृश्य असतात. तारेच्या कोणत्या बिंदूवर किती प्रमाणात दाब दिला की कोणता स्वर दिसतो, यासाठी आयुष्यभराची मेहनत एवढेच काय ते करण्यासारखे. म्हणजे बोटांना डोळे आल्याशिवाय या वाद्यांमधून संगीत व्यक्तच होऊ शकत नाही. मनातले संगीत हातातून बाहेर येईपर्यंत तासन्तास रियाज करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हे. वाद्य हातात येणे, म्हणजेच त्यावर आपला संपूर्ण ताबा असणे. ऐकताना सुंदर वाटत असले, तरीही त्यामागील कष्टाची साधीशी कल्पनाही येऊ शकणार नाही. अब्दुल हलीम जाफर खाँ यांनी सतार अशी आपल्या हाती ठेवली होती. ती त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसीही होती. आपले सगळे जगणे, विचारशक्ती आणि कष्ट त्यांनी सतारीलाच अर्पण करून टाकले होते. हाती सतार घेतल्यानंतरच्या पहिल्याच झंकारात कलाकाराची ताकद सहजपणे कळून यावी, अशी उंची गाठलेल्या जाफर खाँसाहेबांनी फक्त स्वरसौंदर्याची पूजा केली आणि त्यासाठी जीवनभर फक्त ध्यासच घेतला. वाद्याची पाठ बघत पुढे असलेल्या स्वरपट्टय़ांवर कधी दाब देत, तर कधी खेचकाम करत, तर कधी भ्रमराप्रमाणे या स्वरावरून त्या स्वरापर्यंत अतिशय तरलपणे मींड काढत खाँसाहेबांनी आपले स्वरचिंब मन उघडे केले आणि आपली कला नाजूक आणि कोमल अशा स्वराकृतींनी सजवत मनाच्या आरपार जाण्याची क्षमता सिद्ध केली.

बाबा अल्लाउदिन खाँ हे पंडित रविशंकर आणि उस्ताद विलायत खाँ यांचे गुरू. सतार आणि सरोद या वाद्यांवर या दोघा महान कलाकारांनी आपले आगळेवेगळे विश्व उभे केले. या दोघांच्या जोडीला अब्दुल हलीम जाफर हेही येऊन बसले आणि संगीताच्या दुनियेत या वादक त्रयींचा बोलबाला होऊ लागला. सतार या वाद्यातच अशी काही ताकद आहे, की ती गळ्याबरहुकूमही वाजू शकते आणि तिच्या मूळ स्वभावाला अनुसरून तंतअंगानेही वाजू शकते. पंडित रविशंकर यांनी तंतअंगावर भर दिला, तर विलायत खाँसाहेब गायकी अंगावर प्रभुत्व मिळवून राहिले. काळाच्या त्याच टप्प्यात हलीम जाफर खाँ यांना आपले वेगळेपण सिद्ध करणे अगत्याचे वाटू लागले आणि त्यातूनच ‘जाफरबानी’ या वाद्यवादनाच्या नव्या शैलीचा जन्म झाला. तंत्रावर स्वार होतानाच त्यातील सृजनाचाही वेध घेणारी ही शैली खाँसाहेबांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवली. इंदौरच्या बीनकार घराण्याची पताका फडकवणारे आजोबा आणि वडील यांच्यापासून संगीताचा वारसा जन्मसिद्ध हक्काने मिळालेले हलीम जाफर खाँ हे त्या घरातील एकमेव संगीतकार. परंपरेने चालत आलेले ज्ञान आपल्या सर्जनाने उजळून टाकण्यासाठी कलावंताच्या अंगी प्रतिभेचे सामथ्र्य असावे लागते. जाफरबानी ही शैली विकसित करण्यासाठी खाँसाहेबांनी हे सामथ्र्य एकवटले आणि त्यातून सतारीच्या वादनात आणखी खुमारी भरू लागली. भारतातील जवळजवळ प्रत्येक शहरात आणि संगीतसभेत त्यांना आमंत्रणे मिळू लागली, याचे कारणच हा नवा रंग अधिक लुभावणारा होता आणि रसिकांना त्याचे महत्त्वही कळून चुकले होते.

उस्ताद जाफर खाँ यांनी केवळ शैलीपुरतेच आपले सर्जन अडकवून ठेवले नाही. जागतिक संगीताची हाक ऐकणारे ते पहिले संगीतकार. पंडित रविशंकर यांची ‘बीटल्स’ची गाठ पडण्यापूर्वी १९५८ मध्ये जाफर खाँसाहेबांची गाठ झ्ॉज पियानोवादक आणि संगीतकार डेव्ह ब्रुबेक यांच्याशी पडली. तेथपासून एका नव्या युगाचाही आरंभ झाला. इंग्लिश गिटारवादक ज्युलिअन ब्रेम यांच्याबरोबर खाँसाहेबांनी १९६३ मध्ये जाहीर कार्यक्रमही सादर केला. संगीतातून व्यक्त होणाऱ्या भारतीय संवेदनांना पाश्चात्त्यांच्या शैलीत मिसळून टाकणे ही तेव्हा तर अजब गोष्ट होती. ऐकणाऱ्यास या दोन्ही संगीत परंपरांचा आकळ होत असतानाच एका नव्या आनंदाची अनुभूतीही मिळाली आणि त्यातूनच जागतिक पातळीवरील स्वरसंवादाला सुरुवात झाली. खाँसाहेब तेवढय़ावर थांबले नाहीत, कारण त्यांची सर्जनशीलता त्यांना स्वस्थ बसू देणारी नव्हती. भारतातच अस्तित्वात असलेल्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक या दोन समांतर परंपरांचे सांस्कृतिक भान येत असतानाच खाँसाहेबांनी नव्या प्रयोगालाही सुरुवात केली. कर्नाटक संगीतात प्रचलित असलेले किरवाणी, लतांगी, गणमूर्ती यांसारखे अनेक राग त्यांनी हिंदुस्थानी संगीत शैलीत आणले, त्यावर नवे संस्कार केले आणि त्यातून रसिकांना अपूर्वाई अनुभवता आली. काळाच्या बरोबर राहण्यासाठी समाजभान असणारा कलावंत अगदीच विरळा. खाँसाहेबांनी त्यांच्या कलाकारकीर्दीत चित्रपट संगीतातही आपले योगदान दिले. वयाच्या सतराव्या वर्षांपासून ते याही संगीतप्रवाहाशी जोडले गेले. ‘गूँज उठी शहनाई’ या १९५९ सालच्या चित्रपटातील उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्याबरोबरची त्यांची जुगलबंदी त्या काळात प्रत्येकाच्या मनात गुंजत राहिली. त्यानंतरही त्यांनी काही चित्रपटांसाठी वादन केले. संगीत ही कला शिकल्याशिवाय येणारी नाही. त्यामुळेच खाँसाहेबांनी संगीत शिकवण्यासाठी मुंबईत ‘हलीम अ‍ॅकॅडमी ऑफ सतार’ ही संस्था सुरू केली.

मूळ स्वभाव अभिजाततेचा असल्याने खाँसाहेबांनी मैफली वादक म्हणून असलेली आपली ओळख कधीही पुसू दिली नाही. ऋग्वेदातील संगीताचा संस्कार त्यांना महत्त्वाचा वाटला, याचे कारण भारतीय उपखंडातील बहुसांस्कृतिकतेचे महत्त्व त्यांना उमगले होते. स्वर हेच सर्वस्व मानणाऱ्या आणि त्यासाठी आपले सगळे व्यक्तिमत्त्व त्यामध्ये विरघळू देण्यास उत्सुक असलेल्या कलेच्या दुनियेत खाँसाहेब आयुष्यभर रमले. सौंदर्याची त्यांची ही उपासना त्यांना विविध पुरस्कारांचे मानकरी होण्यास उपयोगी पडलीही, मात्र उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्या लेखी स्वर हाच श्वास, स्वर हेच जीवन आणि स्वर हेच जगण्याचे ईप्सित. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक प्रज्ञावान संगीतसाधक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ustad abdul halim jaffer khan