अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तंत्रज्ञान सल्लागारपदी नेमणूक झाल्यावर अनीश चोप्रा यांना जी प्रसिद्धी मिळाली होती, तिला आता पाच वर्षे उलटून गेली. त्याहीनंतर ‘अमेरिकेचे (पहिलेवहिले) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी’ हे पद अनीश यांना मिळाले, तेही जानेवारी २०१२ मध्येच त्यांनी सोडले आहे.. २०१३ मध्ये त्यांनी व्हर्जिनिया प्रांतातील गव्हर्नरपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केला होता, त्यात ते यशस्वी न झाल्याने राजकारणात सक्रिय झाले नाहीत.. मग, अशा व्यक्तीबद्दल आता पुन्हा वॉशिंग्टन पोस्टसारखी दैनिके कौतुकाचा सूर का लावू लागली आहेत? चोप्रा हे आता राजकारणात नाहीत, ‘अमेरिकेतील एक व्यावसायिक’ एवढीच त्यांची ओळख आहे.. तरीही?
याचे उत्तर चोप्रा यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि कारकीर्दीतच आहे. थोडक्यात सांगायचे तर, जे काम ओबामांनी दिलेल्या उच्चपदावर असताना चोप्रा यांनी केले, त्याच कामाचा त्याहीपुढला टप्पा गाठण्याचे पाऊल त्यांनी ‘अमेरिकेतील एक व्यावसायिक’ या नात्याने उचलले आहे! ही बाब अमेरिकी दैनिकांना दखल घेण्याजोगी, कौतुकास्पद वाटते.
म्हणजे असे की, चोप्रा हे अमेरिकेचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या पदावर असताना सरकारकडील माहिती अधिकाधिक खुली व्हावी, यासाठीच्या आंतरजालीय रचनांच्या (वेब प्लॅटफॉर्म आणि आर्किटेक्चर) उभारणीला प्रोत्साहन देणार होते. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांत खासगी उद्योगांना सरकारी माहिती उपयोगी पडावी, त्या माहितीच्या आदानप्रदानातून केवळ सरकारीच नव्हे तर खासगी कारभारातही पारदर्शकता यावी आणि अंतिमत लोकांना उत्तम सेवांचा लाभ मिळावा, असा या आंतरजालीय रचनांवर भर देण्यामागील हेतू होता. अशी उद्दिष्टे एखाद्याच उच्चपदस्थाच्या ठरीव कार्यकाळात साध्य होत नसतात.. त्यात चोप्रा यांनी तर, कार्यकाळाचे बंधन नसताना स्वतहून तीन वर्षांत मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपद सोडले होते. मात्र, हीच उद्दिष्टे साध्य व्हावीत, या हेतूने त्यांनी  ‘हंच अ‍ॅनालिटिक्स’ या कंपनीची जुळवाजुळव सुरू केली. त्याबद्दल विचारले जाई तेव्हा आरोग्य, शिक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांतील निर्णय घेणाऱ्यांचे काम ही कंपनी सोपे करील असे चोप्रा सांगत. पण म्हणजे काय आणि अन्य सल्ला कंपन्यांपेक्षा ‘हंच’ निराळी कशी, हे दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी दैनिकांतून स्पष्ट झाले.. ओबामांच्या ‘सर्वासाठी आरोग्य’ योजनेनंतर रुग्णालयांकडून होणाऱ्या औषधखरेदीत पारदर्शकता आणि किफायत, दोन्ही असावे यासाठी आंतरजालीय रचना बनवण्याचे काम ‘हंच’ करणार आहे. एवढय़ा माहितीवरून चोप्रांचे कौतुक होते आहे, ते अमेरिकेचा (केवळ राष्ट्राध्यक्षांचा नव्हे) त्यांच्यावर विश्वास आहे, म्हणून!