अंधारलेल्या घराच्या कोपऱ्यात उजेडापुरती एखादी पणती लावताच तिच्या मंद प्रकाशात घर सोज्वळपणे उजळून जावे, अंधाराला हटविणाऱ्या त्या इवल्याशा पणतीचे कौतुक व्हावे.. अचानक वीज यावी, लख्ख प्रकाशात पुन्हा सारे घर झळाळून जावे आणि घराच्या कोपऱ्यात पणती मिणमिणते आहे याचाही विसर पडावा, तेल संपून जाईपर्यंत तिने त्रयस्थासारखे जळतच रहावे आणि तेल संपताच विझून जावे, तसे काहीसे पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांच्याबाबतीत झाले. शेती आणि सहकार या खात्यांचे सखोल ज्ञान असलेले भाऊसाहेब फुंडकर ही भाजपच्या दृष्टीने एक महत्त्वाची व्यक्तिसंपदा होती. केवळ शेतकऱ्यांशीच नव्हे, तर खेडोपाडीच्या जनतेशी असलेला व्यक्तिगत संपर्क, त्यांच्या समस्यांची नेमकी जाण आणि त्यांना जोडण्याचे कसब यामुळे भाऊसाहेबांनी ‘एकला चलो रे’च्या काळातही ‘शत प्रतिशत भाजप’ असे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अथक परिश्रम केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भाऊसाहेबांची कारकीर्द उजवी असली, तरी तेव्हा भाजप हा सत्तेतील पक्ष नसल्याने, त्यांच्या कामगिरीचा गाजावाजा झालाच नाही. स्वत: भाऊसाहेबांनादेखील तसा डांगोरा पिटण्याचा तिटकाराच होता. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार, माजी विरोधी पक्षनेते आणि आता राज्याचे कृषिमंत्री एवढीच त्यांची ओळख राहिली. भाऊसाहेबांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, त्या त्या जागेवर आपला स्वत:चा ठसा उमटविण्याची अजोड कुवतही त्यांच्याकडे होती. पण जबाबदारीच्या काळातील कामाचे श्रेय भाऊसाहेबांपर्यंत पोहोचलेच नाही. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली आणि भाऊसाहेबांच्या ज्येष्ठत्वाचा बहुमान म्हणून त्यांना राज्याचे कृषिमंत्रीपदही मिळाले. तसे पाहिले, तर फडणवीस सरकारातील एक मंत्री एवढाच त्यांचा औपचारिक दर्जा असला, तरी खुद्द फडणवीस यांनी मात्र त्यांना नेहमीच आदराचे स्थान दिले. भाऊसाहेब हे आपले नेते आहेत, याचा विसर फडणवीस यांना कधीच पडला नाही. त्यामुळेच, भाऊसाहेबांच्या खात्यातील प्रत्येक अडचणीच्या काळात मुख्यमंत्री स्वत: धावून गेले आणि त्या समस्यांची झळ भाऊसाहेबांपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांची पूर्ततादेखील केली. शेतकरी आत्महत्या, शेतकरी आंदोलन, तूरडाळीचा प्रश्न, ऊस, कापूस, पीकविमा अशा अनेक प्रश्नांची उकल मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून करून टाकल्याने, भाऊसाहेबांना मंत्रिपदाच्या मुकुटाचे काटे टोचलेच नाहीत. त्यामुळे भाऊसाहेब हे काहीसे अलिप्त मंत्री राहिले. मंत्रीपरिवारातील मंत्र्यांचा परस्परांवर आणि प्रमुखावर, म्हणजे मुख्यमंत्र्यावर विश्वास असणे ही सरकारच्या यशाची गुरुकिल्ली असते. भाऊसाहेबांची या सूत्रावर कमालीची श्रद्धा असावी. म्हणूनच, अनेकदा मंत्रिमंडळाच्या बठकांनाही त्यांची फारशी हजेरी नसे. विरोधकांनी मात्र त्यांची खिल्लीच उडविली. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तर कृषिमंत्री दाखवा, २५ हजार रुपये मिळवा असे आव्हानही दिले. पण फुंडकर मात्र आपल्या खात्याशी एकनिष्ठपणे काम करीत राहिले. मुख्यमंत्र्यांनी फुंडकर यांच्या खात्याशी संबंधित अनेक समस्यांना धडाडीने सामोरे जाऊन त्या सोडविल्याने कृषी खात्याची मार्गक्रमणा सोपी झाली, खात्याला महत्त्व प्राप्त झाले हे खरे असले, तरी त्यामुळे फुंडकरांच्या कर्तृत्वावर मात्र काहीशी काजळी धरली, अशी खंत त्यांच्या निकटवर्ती वर्तुळात व्यक्त होत होती. मात्र फडणवीस व फुंडकर यांच्यातील या अनोख्या जिव्हाळ्याचे पक्षातील अनेक नेत्यांना कौतुकही वाटत होते. अगदी दोनच दिवसांपूर्वी, पीकविम्यासंदर्भात बैठक घेऊन पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फुंडकर यांच्या खात्याविषयी त्यांची आस्था त्यातून प्रकट झाली होती. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी स्वत: फुंडकर सातत्याने आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यात लक्ष घातले होते. आता त्याची पूर्तता होणे हीच फुंडकर यांना सरकारची श्रद्धांजली ठरेल.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2018 रोजी प्रकाशित
एकच पणती.. मिणमिणती!
भाऊसाहेबांच्या खात्यातील प्रत्येक अडचणीच्या काळात मुख्यमंत्री स्वत: धावून गेले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-06-2018 at 04:51 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pandurang fundkar dies of heart attack