गलवान खोऱ्यात चीनकडून झालेले घुसखोरीचे प्रयत्न ही भारताबरोबर संघर्षमय पवित्र्याची निव्वळ एक सुरुवात होती, हे नंतरच्या काही घटनांनी दाखवून दिले होते. त्या वेळी भारतीय लष्कराने चीनला रोखून धरले. परंतु त्यानंतर झालेल्या राजनयिक चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये गलवानचा आणि भारत-चीन प्रत्यक्ष ताबारेषेवरील अनेक विवाद्य भूभागांविषयी (चीननेच उकरून काढलेला) तिढा सुटलेला नाही. आता हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल राकेशकुमारसिंग भदौरिया यांनी चीनच्या क्षेपणास्त्र तैनातीविषयी इशारा दिला आहे. लडाख सीमेवर क्षेपणास्त्रादी अवजड शस्त्रसामग्री तैनात करून चीनने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. भारत-चीनदरम्यान ४५ वर्षांमध्ये प्रथमच संघर्षांमध्ये मनुष्यहानी झाली आणि बंदुकीचा वापरही झाला. चीनने असे का केले असावे, याविषयी आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे हवाई दलप्रमुखांनी बजावले आहे. त्यांनी काही गृहीतके मांडली. चिनी लष्कराच्या पश्चिम विभागाची युद्धसज्जता पारखण्यासाठी गलवानची कुरापत काढली गेली असावी, हा एक अंदाज. किंवा चीनकडील तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी, संभाव्य त्रुटींचा आढावा घेण्यासाठी चीनकडून अशा प्रकारे आक्रमक हालचाली झाल्या असाव्यात, हा दुसरा अंदाज. निव्वळ भारतीय सीमेवरच नव्हे, तर दक्षिण चीन समुद्रात चीनच्या नौदलानेही आक्रमक वाटाव्यात अशा कवायती आणि मोहिमा आखल्या होत्या. त्या समुद्रात मासेमारी आणि व्यापारी मक्तेदारी करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा जुनीच आहे. कोविडकाळात चीनच्या आक्रमकतेमध्ये वाढ झाली, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळेच एकीकडे लष्करी सुसज्जतेवर भर दिला जात असताना, दुसरीकडे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनीही आणखी एका विमानवाहू युद्धनौकेची मागणी उचलून धरली आहे. याचे कारण चीनशी संघर्षांची शक्यता जमीन, जल आणि वायू या तिन्ही माध्यमांमध्ये गृहीत धरली जाऊ लागली आहे. भदौरिया यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले. जागतिक महासत्ता होण्याची चीनची मनीषा आहेच, परंतु यासाठी त्यांनी सहकार्याऐवजी संघर्षांच्या मार्गाला प्राधान्य दिले. या संघर्षमय पवित्र्यामुळे बहुतेक प्रमुख देश सावध झाले हे तर उघड आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानच्या मदतीने भारताने स्थापलेला ‘क्वाड’ हा अनौपचारिक गट याचेच एक उदाहरण. चीनने मध्यंतरी पाकिस्तानात हवाई कसरती केल्या आणि ‘क्वाड’च्या नाविक कसरतींना काही प्रमाणात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान हे चीनच्या हातचे बाहुले असल्याचे वेगळ्याने सांगण्याची गरज नाहीच. मात्र पाकिस्तानच्या खांद्यावर स्वार होऊन चीन अफगाणिस्तानात आणि तेथून मध्य आशियात शिरकाव करू पाहतो आहे ही भदौरिया यांनी व्यक्त केलेली शक्यता विचार करायला लावते. इराणशी मैत्री वाढवूनही चीनचे मध्य आशियाकडे लक्ष आहेच. ‘बेल्ट अॅण्ड रोड’ प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य आशियात प्रभावक्षेत्र वाढवण्याचा चीनचा प्रयत्न यापूर्वीच सुरू झाला आहे. परंतु या पट्टय़ातील बहुतेक सर्व देशांना चीनचे भांडवली मांडलिकत्व पत्करणे कितपत झेपेल याविषयी रास्त शंका व्यक्त केली जाते. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानेही पँगाँग सरोवरकिनारी काही मोक्याची शिखरे व्यापली. कोविडचा फैलाव आणि विस्तारवाद या दोन्ही मुद्दय़ांवरून चीनविषयी संशय वाढीस लागला. तरीही चीनच्या हालचालींमागे काहीएक उद्देश होता आणि त्याचा आम्ही अभ्यास केला आहे, हे भदौरिया यांनी सांगितले. ते योग्यच. लडाखमधील अत्यंत प्रतिकूल टापूमध्ये दीर्घ काळ तळ ठोकून बसावे लागणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. कारण पूर्वी कधीही नव्हता इतका चीन-विशेषत: अध्यक्ष क्षि जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी झालेला दिसतो. हलाई दलप्रमुखांच्या इशाऱ्याकडे या परिप्रेक्ष्यात पाहावे लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2020 रोजी प्रकाशित
हवाई दलप्रमुखांचा इशारा..
पाकिस्तान हे चीनच्या हातचे बाहुले असल्याचे वेगळ्याने सांगण्याची गरज नाहीच.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-12-2020 at 04:10 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China deploys air support system missile at lac rakesh kumar singh bhadauria zws