माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे आधुनिक भारताच्या उभारणीत काहीच योगदान नाही का? या देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी त्यांनी काहीच काम केले नाही का? गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसने वा गांधी घराण्याने देशाची वाट लावली असे उचलली जीभ लावली टाळ्याला स्वरूपाचे कथन निवडणुकांच्या प्रचारसभांतून वा फेसबुक, ट्विटरवरून करणे वेगळे. वास्तव मात्र याहून वेगळे आणि गुंतागुंतीचे आहे. ते समजून घेण्याची अनेकांची इच्छा नसते आणि काहींची तर पात्रताही. देशाचा गाडा हाकणाऱ्यांना मात्र पूर्वसुरींच्या कार्यकर्तृत्वाची कृतज्ञ जाणीव असलीच पाहिजे. परंतु इंदिरा आणि राजीव गांधी यांची छायाचित्रे असलेली टपाल तिकिटे छापण्याचे बंद करून आपणास तशी जाणीव नाही, हेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दाखवून दिले आहे. वस्तुत: टपाल तिकिटांवरील छायाचित्रे ही तशी किरकोळ बाब. सरकारने एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे टपाल तिकीट छापले म्हणून काही त्या व्यक्तींच्या गौरवात फार भर पडते, असे नाही. अशा तिकिटांमागे देशाची कृतज्ञ भावना असते. प्राणी, पक्षी, फुले वा एखाद्या स्थानवैशिष्टय़ाची तिकिटे काढली जातात. त्यामागे देशाची ओळख करून देण्याचा एक इवलासा प्रयत्न असतो. सर्वच देश हे करतात. डिसेंबर २००८ मध्ये आपल्या टपाल खात्यानेही आधुनिक भारताचे शिल्पकार अशी एक तिकीटमाला प्रसिद्ध केली. त्यात नेहरू, गांधी, आंबेडकर यांच्याबरोबरच सत्यजीत रे, होमी भाभा, जेआरडी टाटा, मदर तेरेसा यांचा समावेश होता. पुढे सत्ताबदल झाला आणि नव्या सरकारच्या नेतृत्वाखालील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला बहुधा ही यादी खटकली. त्यांनी या मालेतील पाच रुपये किमतीच्या तिकिटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिले. आता इंदिरा आणि राजीव यांच्या तिकिटाची किंमत नेमकी तेवढीच असावी हा योगायोग मानावा असे या मंत्रालयाचे म्हणणे असू शकते. ते मान्य करायला काहीच हरकत नाही. फक्त ते करताना त्या योगायोगामागील योजनेबद्दल मात्र या मंत्रालयाची पाठ थोपटली पाहिजे. मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत अशी हाक दिलेली आहेच. त्या योजनेबरहुकूम हे काम चालले आहे असेही म्हणावयास प्रत्यवाय नाही. यात फक्त एकच गोष्ट वारंवार विसरली जात आहे की मोदींच्या मागे संसदेत प्रचंड बहुमत असले, तरी भाजपला ३१ टक्के लोकांनीच मते दिली आहेत. ती मतेही विकासासाठी, प्रगतीसाठी होती. या ३१ टक्क्यांखेरीज १९.३ टक्के मते काँग्रेसने राखली होती आणि यापैकी मोठा वर्ग अजूनही काँग्रेसला मानणारा आहे. त्यांना अशा टपाली टपल्या मारून दुखावण्यातून काय साध्य होणार, हे मोदी सरकारलाच माहीत. काँग्रेसला अधूनमधून अशी जीभ वेडावून दाखविली म्हणजे हे ३१ टक्के खूश होतील असे मोदी सरकारला वाटत असेल तर ते काही अंशी बरोबर आहे. काही अंशीच, कारण त्यातीलही अनेकांना या अशा द्वेषाच्या राजकारणात काडीमात्र रस नाही. त्यांनी पूर्वी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार हेच या सरकारचे म्हणणे असेल तर तेही अनेकांना मान्य नाही. या सरकारच्या हे जेवढय़ा लवकर लक्षात येईल तेवढे बरे, कारण अखेर या अशा टपल्यांमधून क्षणिक काळ सुख मिळते. अच्छे काही घडत नाही.