स्टॅनले मार्टिन लीबर अर्थात- लोकप्रिय महानायकांची जादुई दुनिया निर्माण करणारे माव्र्हल कॉमिक्सचे जनक स्टॅन ली गेल्या वर्षी निवर्तले. स्पायडर मॅन, एक्स-मेन, आयर्न मॅन.. आदी त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांच्या कॉमिक्स कथांनी आणि त्यांवरील चित्रपटांनी अमेरिकीच नाही, तर जगभरच्या वाचक-प्रेक्षकांवर गारुड केले. स्टॅन ली हे त्यांच्या अखेरच्या काळात एका कादंबरीवर काम करत होते, अशा स्वरूपाच्या बातम्या तेव्हा येत होत्याच; परंतु मंगळवारी ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ती कादंबरी आता प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. तशी घोषणाच या कादंबरीचे प्रकाशक असलेल्या हफ्टन मिफिन हारकोर्ट या प्रकाशनसंस्थेने केली आहे. ‘प्रौढ वाचकांसाठीची स्टॅन ली यांची पहिली कादंबरी’ असे या कादंबरीचे वर्णन केले जात असून, ती येत्या १७ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. अतिमानवी शक्तीचे नायक हे ली यांच्या पात्ररचनेचे वैशिष्टय़ या कादंबरीतही असणार असून, अशा दोन पात्रांच्या मैत्रीची कथा सांगणाऱ्या या कादंबरीचे शीर्षक आहे- ‘ए ट्रिक ऑफ लाइट’! तंत्रज्ञानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवू शकणारा कॅमेरॉन आणि हॅकर निआ ही ती दोन पात्रे. आपापल्या शक्ती आणि हुन्नरीचा उपयोग ते मानवी समाजास नष्ट करू पाहणाऱ्यांविरोधात करतात, त्यासाठी दोघे कसे एकत्र येतात, याची ही कहाणी! हे पुस्तक सप्टेंबरमध्ये येईलच, पण त्याआधीच त्याची ध्वनिमुद्रित आवृत्ती (ऑडिओ-बुक) परवा- गुरुवारीच प्रसिद्ध झाली आहे. अमेरिकी अभिनेत्री यारा शाहिदीने तिचे वाचन केले असून, त्यात खुद्द स्टॅन ली यांचाही आवाज ऐकायला मिळणार आहे!
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2019 रोजी प्रकाशित
बुकबातमी : स्टॅन ली यांची शेवटची कादंबरी!
तंत्रज्ञानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवू शकणारा कॅमेरॉन आणि हॅकर निआ ही ती दोन पात्रे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-06-2019 at 02:07 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A trick of light novel by stan lee zws