हौशी प्रयोग, स्वतंत्र लेखन, लेखनात होत गेलेले बदल आणि प्रयोगाचे बदलत गेलेले स्वरूप या समवेतच प्रेक्षक आणि नाटक यांच्या संबंधाबद्दलही बादल सरकार यांनी वेगळ्या वाटा शोधल्या, वेगळे विचारही मांडले. त्यांच्या जाणिवांचा प्रवास, त्यांचे नाटय़विषयक चिंतन आणि नटांचे रंगकर्म यांचा एक मर्मग्राही आलेख या पुस्तकातून आपल्यापुढे येतो. हा सारा प्रवासाचा तपशील टिपण्यासाठी लेखिकेने कसून मेहनत केली आहे
बादल सरकार यांच्या नाटय़कर्तृत्वाचा सर्वागीण आढावा घेणारे पुस्तक सेज पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केले आहे. मूळ नाव: ‘बादल सरकार : टुवर्ड्स अ थिएटर ऑफ कन्सायन्स’. अंजुम कटियाल यांच्या साक्षेपी नजरेने बादलबाबूंच्या प्रदीर्घ वाटचालीचा अनेक बाजूंनी वेध घेतला आहे.
बादलबाबूंना नाटकवेड लहानपणापासूनच जडले होते. ते एका परिपक्व विचारचौकटीपर्यंत कसे विकसित होत गेले, याचे टप्पे यात सूक्ष्मपणे टिपले आहेत. नाटकवेड विविधांगी होत गेले. हौशी प्रयोग, स्वतंत्र लेखन, लेखनात होत गेलेले बदल आणि प्रयोगाचे बदलत गेलेले स्वरूप या समवेतच प्रेक्षक आणि नाटक यांच्या संबंधाबद्दलही बादलबाबूंनी वेगळ्या वाटा शोधल्या, वेगळे विचारही मांडले. त्यांच्या जाणिवांचा प्रवास, त्यांचे नाटय़विषयक चिंतन आणि नटांचे रंगकर्म यांचा एक मर्मग्राही आलेख आपल्यापुढे येतो. हा सारा प्रवासाचा तपशील टिपण्यासाठी लेखिकेने कसून मेहनत केली आहे आणि बादलबाबूंच्या रोजनिशीतील नोंदी, पत्रे, इतरांनी त्यांची घेतलेली दखल आणि व्यक्त केलेली मते हे सर्व साहित्य धुंडाळले आहे. त्यातील शिस्तीमुळे हा उलगडा सांगणारा एक उत्तम अभ्यासग्रंथ वाचल्याचा आनंद वाचकाला मिळतो.
पुस्तकाची मांडणी करताना कालानुक्रम आणि विकासाचे टप्पे या दोन्हीचा मेळ घातला आहे. प्रकरणांची अनुक्रमणिका वाचतानाच हा इरादा लक्षात येतो. पहिला हौशी आणि लोकप्रिय रंगभूमीवर पाऊल टाकण्याचा काळ संपता संपता पहिले महत्त्वाचे वळण येते, ‘एवम् इंद्रजित’ या नाटकाचे. नंतरची प्रकरणे त्यांचा रंगमंचाची चौकट मोडून बाहेर येण्याचा प्रवास नोंदतात आणि ‘तिसरी रंगभूमी’ Third Theatr  या संकल्पनेपर्यंतचा प्रवास उलगडतात. त्यानंतर ‘कार्यशाळा’ पद्धतीचा विकास आणि फक्त आशयसूत्रांना वाहिलेली दोन प्रकरणे आणि शेवटी एक विहंगावलोकन ही संगतवार मांडणी अभ्यासकांना उपयुक्त आहे.
१९६० च्या दशकात निर्माण झालेल्या आधुनिक भारतीय रंगभूमीचे बादलबाबू एक आधारस्तंभ होते. त्यांचा या प्रकारचा अभ्यास ही नाटकवाल्यांना इतिहासाचे भान देणारी बाब आहे. स्वातंत्र्यानंतर नाटककरांचा उद्गार नवे रूप शोधू लागला. त्यात गतकालाकडे नवे दृष्टिक्षेप होते, मध्यमवर्गीय जाणिवा व्यापक आणि सूक्ष्म करण्याचे प्रयत्न होते, आणि मिथकांची नवी तपासणी होती. नवस्वतंत्र काळातील प्रगतीचे तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष जगण्यातल्या विसंगतीवर बोट ठेवणारे, प्रश्न विचारणारे दर्शन होते. बादलबाबूंचा रोख मुख्यत: शहरी मध्यमवर्गाच्या बोथट झालेल्या जाणिवांवर होता. जागतिक पातळीवरच्या जाणीवजागृतीच्या (Conscentization)  संकल्पनेशी त्यांचा धागा जोडलेला होता.
बादलबाबूंच्या नाटकांनी शहरी मध्यमवर्गीय जाणिवांची कसून तपासणी केली. त्यांच्या संकुचित परिघावर, आत्मकेन्द्री सुखलोलुपतेवर, संवेदनशून्य व्यवहारावर हल्ला चढवला. माणूस म्हणून विकसित होण्याच्या शक्यतेकडे पाठ फिरवून तसेच जगत राहण्यापेक्षा आत्महत्या का करू नये असाच टोकाचा प्रश्न विचारत प्रेक्षकांना हलवून सोडण्याचे काम त्यांच्या पहिल्या टप्प्यातील नाटकांनी केले. या विचारांच्या मागे ‘जग बदल घालूनी घाव’ या परिवर्तनाच्या प्रेरणेचे गुंजन जाणवते.
संकुचित परिघापलीकडच्या जगात भरलेली िहसा आणि क्रौर्य, त्यात असलेला प्रत्येकाचा सहभाग उजेडात आणला की एक ऐतिहासिक अपराधभावना आणि परिवर्तनाच्या जबाबदारीची जाणीव ही दोन्ही सूत्रे आपोआप समोर येतात. शहरी मध्यमवर्गाला खेडुतांचे, आदिवासींचे, दलितांचे भान नाही. सभोवतालच्या सुस्त िभती फोडून माणूसपणाच्या जथ्यात सहभागी होण्याचे आवाहन हा त्यांच्या आशयसूत्राचा प्रवास.
विसाव्या शतकाने जगासमोर एक प्रचंड प्रश्न उभा केला. ‘अणुबॉम्ब आणि र्सवकष युद्धाच्या अमानुष क्रौर्याला लव्हाळ्यासारख्या माणसाने तोंड कसे द्यावे? माणसामाणसातल्या व्यवहारावर नतिकतेचा अंकुश कसा उभा करायचा?’ हा परिवर्तनाच्या लढाईमधला कळीचा मुद्दा. या ठिकाणी मध्यमवर्गाने असहायपणे खाली मान घालून हात चोळत बसू नये, तर सज्जनशक्तीचा प्रवाह बळकट करावा ही धारणा बादलबाबू पुन:पुन्हा मांडतात. त्यांच्या फ्रान्समधील वास्तव्यानंतर हाच प्रश्न त्यांनी विविध संदर्भात उभा केला.
फ्रान्स, रशिया, नायजेरिया, अमेरिका या आणि इतर देशातील विचारधारा त्यांनी अभ्यासल्या. ग्रोटोव्हस्की, रिचर्ड शेक्नर यांच्यासारख्या सद्धांतिक विचारातून रंगकर्माच्या वाटा शोधण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. या संपर्कानंतर बादलबाबू विचारपूर्वक चौकटी रंगमंचाच्या बंदिस्तीतून बाहेर पडले. नाटय़लेखनाऐवजी संहिता-संकल्पना फुलवण्याची प्रक्रिया सुरू झाली, नाटकाच्या प्रयोगाचा खर्च कमी कसा ठेवता येईल याचे प्रयोग सुरू झाले आणि जाणीवजागृतीची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. नाटय़रचना अधिक खुल्या, लवचीक आणि बहुस्पर्शी होत गेल्या. शब्दांवर विसंबणे कमी होऊन नटांची शरीरे अधिक बोलकी झाली. आíथक प्रश्नातून वाट काढताना नेपथ्य, वेशभूषा आणि तिकिटांच्या किमती कमी करून नाटक मोकळ्या सार्वजनिक जागेत गेले, एक साधा सामूहिक वेश सर्व नट वापरू लागले, आणि प्रवेशमूल्याऐवजी ऐच्छिक देणगी असे फरक त्यांनी करून पाहिले. अशा नाटकांचे प्रयोग खेडय़ापाडय़ातही नेले आणि नाटकाचा प्रेक्षक म्हणजे केवळ शहरी मध्यमवर्ग असे समीकरण उरले नाही. यातील सर्व अवस्थान्तरांचा वेध पुस्तकामध्ये काळजीपूर्वक घेतला आहे. जवळजवळ अध्रे शतकभर चाललेला हा प्रवास मानसिक, सामाजिक, राजकीय आणि व्यावहारिक अशा सर्व पातळ्यांवर लक्षणीय ठरला आणि रंगभूमीचा प्रयोजनविचार थेट समाजाला भिडला.
या सर्व प्रकारच्या उलथापालथीमध्ये देशाच्या विविध प्रांतातील रंगकर्मी जोडले गेले, सामील झाले. यात बादलबाबूंनी घेतलेल्या कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत. त्यांची कार्यशाळा ही संकल्पना फक्त नट घडवण्यापुरती सीमित नसे. नटामधला माणूस रंगभूमीचा कार्यकर्ता बनत असे. एकूण प्रक्रिया माणसाच्या घडणीतील महत्त्वाच्या घटकांशी जोडलेली असे. शरीरावरचा ताबा, कौशल्याची विविधता यांच्याइतकेच महत्त्व समूहभावनेला, परस्परविश्वासाला असे. व्यावहारिक जगात वावरताना स्वत:च्या मनाला जडलेल्या अनेकानेक प्रतिबंधापासून (Inhibitions) मानसिकरीत्या मुक्त होणे महत्त्वाचे असे. त्यामुळे स्वत:च्या अभिव्यक्तीवर स्वत:च घातलेले अडसर दूर होत.
नटांना आपापले काम करताना एका वेगळ्याच आंतरिक स्वातंत्र्याचा अनुभव येत असे. प्रथम फक्त नाटय़क्षेत्रात केलेले हे काम पुढे इतर ठिकाणीही उपयोगी ठरले. या कार्यशाळा त्यांच्या तालमीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनीही पुढे चालवल्या. संपूर्ण देशभरातल्या रंगकर्मीना ही पद्धत आणि तिचे फायदे पोचले. पाकिस्तान, बांगला देश अशा शेजाऱ्यांप्रमाणेच त्यांनी इंग्लंडमधेही या कार्यशाळा घेतल्या. हा सर्व इतिहास मुळातून वाचण्याजोगा आहे.
पाश्चिमात्य प्रभावाखालील शहरी रंगभूमी आणि खेडोपाडी चालणारी पारंपरिक लोकरंगभूमी यांच्यातील दरी नाहीशी करायची, तर मूलभूत बदल केल्याशिवाय ते शक्य होणार नाही या निर्णयाप्रत बादलबाबू आले आणि त्यांनी ‘तिसरी रंगभूमी’ उभारली. व्यापक समाजभान आणि प्रेक्षकांशी थेट संवाद, रंजनातून प्रबोधनावर भर आणि निर्मितीच्या खर्चाची किंवा प्रेक्षकाने तिकीट काढून येण्याची आíथक गुंतवणूक किमान पातळीवर (म्हणजे स्वस्त किंवा मोफत) या तीन प्रमुख वैशिष्टय़ांनी तिसरी रंगभूमी आपला ठसा उमटवत गेली. यातून अटळपणे एक अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता तीन मुद्दय़ांभोवती असते: राजकीय वाद, राजकीय कृती आणि राजकीय संदेश.
राजकीय नाटक (Political Theatre) म्हटल्याबरोबर सत्तेची वक्रदृष्टी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुद्दे सहज पुढे येतात. बादलबाबू ज्या प्रकारचे प्रबोधन करत गेले, त्याचा पाया सत्ताकारणात नव्हता. त्यांचे लक्ष विवेकनिष्ठ मानवतावादाकडे होते. सदिच्छा, संवाद आणि समन्वय यांना बाधा आणणाऱ्या वृत्ती आणि व्यवस्था यांच्याविरुद्ध जाणीवजागृती हे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. ही जागृती समाजाच्या सर्वच थरात आणण्याची गरज त्यांनी पुन:पुन्हा मांडली. केवळ शहरी मध्यम वर्ग नव्हे तर अन्यायाच्या वरवंटय़ाखाली भरडले जाणारे समाजगटही त्यांना जागे करायचे होते. त्या सर्वाचा एकच ‘जुलूस’ बनावा हे त्यांचे मुख्य प्रतिपादन होते. प्रत्येक माणसाला स्वत:चा आवाज असावा, तो उठवण्याचे स्वातंत्र्य त्याला असावे. ते मिळावे यासाठी इतर समाजघटकांनी त्याला साथ द्यावी, असा हा एका परीने साधा परंतु परिवर्तनाची दिशा सांगणारा विचार आहे. या विचाराची या पुस्तकात कसून छाननी केली आहे. अनेक रंगकर्मी आणि विद्वानांची पसंती-नापसंती नोंदवलेली आहे. शेवटी बादलबाबूंना दिलासा देणारा प्रेक्षकप्रतिसादही नोंदला आहे.
समाजाची राजकीय समज आणि पक्षीय राजकारण यात होणारे व्यवहार गुंतागुंतीचे असतात. पक्षीय राजकारण सत्तेच्या खेळात मग्न राहू शकते. परंतु समाजाची राजकीय समज सत्तेच्या खेळातले डावपेच आरपार बघू शकते. शेवटी वास्तवात परिवर्तनाची गरज असते, तेव्हा प्रत्यक्ष वागणुकीत बदल घडला पाहिजे हे मुख्य उद्दिष्ट ठरते. जाणीव जागृती, प्रतीकात्मक कृती या गोष्टी त्याला पूरक असल्या, तरी प्रतीक म्हणजे प्रत्यक्ष नव्हे, ही बाब उरतेच. बादलबाबू पूरक जाणिवा तीव्र आणि मजबूत करण्यासाठी झटले. हे त्यांच्या शेवटच्या काळातील मुलाखतीत आणि लेखनात दिसून येते. रंगभूमीविषयी गांभीर्याने विचार करणाऱ्यांना, अभ्यासकांना आणि संशोधकांना या पुस्तकाने मोठाच लाभ होणार आहे.

डॉ. श्यामला वनारसे 
svanarase75@gmail.com
‘बादल सरकार : टुवर्ड्स अ थिएटर ऑफ कन्सायन्स लेखिका : अंजुम कातीयाल

प्रकाशक : सेज पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : २६६ किंमत: रु. ९९५