खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी ‘ट्विटर’वरून एक वादग्रस्त ट्विप्पणी केली होती. ती ट्विप्पणी काही हजार जणांनी ‘री-ट्वीट’ केली आहे, हे छुप्या अभिमानानं सांगितलं जाऊ लागलं होतं. पण झालं भलतंच. एका महिलेबद्दल अनुदार उद्गार त्या ट्विप्पणीत होते, म्हणून ती खासदार रावल यांना काढून टाकावी (डिलीट करावी) लागली. ज्या महिलेला ‘जीपच्या वर बांधा’ असं त्या भूतपूर्व ट्विप्पणीत खासदार रावल यांनी म्हटलं होतं, त्यांचं नाव अरुंधती रॉय. ‘मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ ही यांची दुसरी कादंबरी वीस वर्षांच्या खंडानंतर- आणि मधल्या वीस वर्षांत खंडीभर ललितेतर पुस्तकं त्यांच्या नावावर जमल्यानंतर-  येत्या ६ जून रोजी प्रकाशित होते आहे.

याच कादंबरीच्या प्रचार-प्रसारासाठी ४ जूनपासून ते ११ जूनपर्यंत ब्रिटनमध्ये ठिकठिकाणी, तर १९ जूनपासून पुढे २७ जूनपर्यंत अमेरिकेत विविध ठिकाणी या कादंबरीच्या प्रकाशनानिमित्तानं कार्यक्रम होतील. त्यापैकी अनेक कार्यक्रम हे पाश्चात्त्य प्रथेनुसार तिकीट लावून होणार आहेत. यापैकी पहिल्याच कार्यक्रमाचं (५ जून) तिकीट आहे १८ ब्रिटिश पौंड (म्हणजे सुमारे १५०० रुपये). मँचेस्टर तसंच आर्यलडमधलं डब्लिन या शहरांतले ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ सुरू नसूनही, ‘फेस्टिव्हल’च्याच आयोजकांनी रॉय यांचा ‘खास कार्यक्रम’ ठेवला आहे. अमेरिकेत एरवी विद्यापीठांमध्ये रॉय यांची व्याख्यानं होतात, पण यंदाचे कार्यक्रम टाऊन हॉल किंवा थिएटर अशा जागी आहेत.

या कादंबरीच्या ६० लाख प्रतींची नोंदणी आधीच नोंदवली गेली आहे. पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन-हॅमिश हॅमिल्टन. या दोन्ही तपशिलांच्या बडेपणामुळे असेल वा अन्य कारणांनी, इंग्रजी प्रसारमाध्यमं या कादंबरीबद्दलची चर्चा जिवंत ठेवणाऱ्या भरपूर बातम्या देत आहेत. उदाहरणार्थ, एका इंग्रजी वृत्तपत्राचे छायाचित्रकार मयांक ऑस्टिन सूफी यांनी या कादंबरीच्या मुखपृष्ठावरलं छायाचित्र काढलं; तर ते कसं काढलं, कशी भरपूर मेहनत केली, त्यामागची संकल्पना खुद्द रॉय यांनीच कशी सांगितली होती, हे सारं सविस्तरपणे त्या वृत्तपत्राच्याच समूहातल्या दुसऱ्या दैनिकानं सांगितलं.. म्हणजे थोडक्यात, ‘रावल यांच्या विधानांमुळे रॉय यांना फुकटची प्रसिद्धी मिळाली,’ असंही नाही म्हणता येणार.. सहा लाख प्रतींच्या आकडय़ानं फुकट-प्रसिद्धी तर एवीतेवीच मिळतेय.