इंग्रजी कादंबरीसाठी दिलं जाणारं प्रतिष्ठेचं आणि वाचकांची उत्कंठा ताणणारं ‘मॅन बुकर पारितोषिक’ यंदा मार्लन जेम्स यांना मिळालं. संजीव सहोता हे ब्रिटनस्थ भारतीय लेखकदेखील अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते आणि सहोतांची कादंबरी ही सध्या गाजणाऱ्या ‘स्थलांतर’ या विषयावरली असल्यामुळे ते विजेते ठरणार अशीही चर्चा होती, पण अखेर सहोतांना चकित व्हावं लागलं. मार्लन जेम्स यांची ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग्ज’ ही कादंबरी दिवंगत गायक बॉब मार्ले यांच्या खुनाच्या अयशस्वी प्रयत्नापासून (सन १९७६) सुरू होते, हे तिचं वेगळेपण ठरलं.

बॉब मार्ले हे रेग्गे (किंवा ‘रेगी’) या प्रकारातले गायक. मूळचे जमेकाचे. मार्लन जेम्सही जमेकाचेच, पण गेली अनेक र्वष अमेरिकेत मिनेपलिसमध्ये राहातात. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी, १९८१ साली दिवंगत झालेल्या मार्ले यांच्या गाण्यांमध्ये जगाला फाटा देणारा कलंदरपणा आणि त्याच वेळी अख्ख्या जगावर प्रेम करू शकणारा दिलदारपणा यांचं मिश्रण असायचं. ‘रास्ताफारी’ हा मार्ले यांचा पंथ, इथिओपियाच्या सम्राटाला सर्वेसर्वा मानणारा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, कायम बेछूट! या प्रवृत्तींमागे जी मूल्यं आहेत, ती बॉब मार्ले यांच्या गाण्यांमध्ये अगदी सुंदर होऊन प्रकटायची. पण जग न जुमानण्याची आणि गरजूंना आपलं मानून त्यांच्यावर प्रेम करण्याची प्रवृत्ती कुरूपपणे का होईना, गुंडपुंडामध्येही दिसते. हे असे गुंडपुंड लोक या कादंबरीत भरपूर आहेत. कादंबरीत पात्रंही बरीच आहेत.. एकंदर ७६ पात्रांची यादीच मार्लन जेम्स यांनी कादंबरीच्या सुरुवातीला दिली आहे, त्यापैकी ५० पात्रं वाचकांशी बोलतात. बाकीची बऱ्याच प्रमाणात गप्प राहातात, पण त्यांचं वर्णन कादंबरीत येतं. गुंडांचे किंवा गुंडांचं प्यादं बनलेल्या साध्याच माणसांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत, त्यांचं आंतरराष्ट्रीय जाळं कसं आपसूक वाढत जाणारं आहे आणि या क्षेत्राला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पटदेखील कसा आहे, याचा वेध मार्लन जेम्स घेतात. ही कादंबरी केवळ व्यक्तींची न राहाता, राजकीय पटलावर वाचकाला घेऊन जाते. महत्त्वाच्या ठरतात त्या व्यक्तीच, पण तरीही कादंबरीला एकच एक ‘नायक’ असू नये, अशी खबरदारी मार्लन जेम्स यांनी घेतली आहे.
एवढी पात्रं आणि एकही मुख्य पात्र नाही, हेच या कादंबरीचं प्रमुख वेगळेपण ठरलं. अनेक पात्रांच्या तोंडून ‘गायका’च्या मृत्यूचे आणि त्या ‘गायका’ला संपवण्यासाठी कोण कसकसे प्रयत्न करत होते याचे उल्लेख येतात. अखेर ‘गायक’ गेला तो खरोखरच आजारानं वगैरे की कट करून त्याला संपवण्यात आलं? कट असेल, तर तो अमेरिकी गुप्तहेर संघटनेचा – सीआयएचा – होता का? या प्रश्नांची उत्तरं मार्लन जेम्स यांच्याकडून मिळणार नाहीत. पण रसरशीत प्रेम, पराकोटीचा द्वेष या भावना जगणारी माणसं आपापल्या सत्यावर कशी कायम असतात, हे मात्र कादंबरीतून कळेल. कादंबरीत वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण आहे.. बॉब मार्लेचं नाव कुठंही नाही. त्याचा उल्लेख ‘गायक’ असाच आहे.
बुकर पारितोषिकाची घोषणा १३ ऑक्टोबरला झाली. त्यानंतर या कादंबरीबद्दलचं कुतूहल इतकं उफाळलं आहे की, ते शमवण्यासाठी ब्रिटिश प्रसारमाध्यमांची शर्थ सुरू आहे. ‘गार्डियन’नं मार्लन जेम्स यांना गाठून, या इतक्या पात्रांमधून तुम्हाला आधी कोण ‘भेटलं’- किंवा कोणत्या पात्रापासून या कादंबरीचं बीजारोपण झालं, असा प्रश्न केला. या कादंबरीत काही पात्रं वारंवार येतात.. उदाहरणार्थ गुन्हेगारी टोळीप्रमुख पापा लो, चित्रवाणी बातमीदार निना बर्जेस किंवा ‘डॉक्टर लव्ह’.. पण या पात्रांपैकी कुणीही नाही, उलट ‘जॉन-जॉन के’ असं मार्लन जेम्स उत्तरले. लगेच ‘गार्डियन’च्या प्रतिनिधीनं, जॉन के. या पात्राचा माग काढणं सुरू केलं आणि पाहतात तर काय? हा जॉन के. समलिंगी आहे.. किंवा त्याचा जिवाभावाचा मित्र तरी नक्कीच समलिंगी पुरुष आहे. झालं! त्या तेवढय़ा माहितीला आणखी कशाची तरी जोड हवी म्हणून याच मार्लन जेम्स यांचे ब्लॉग खणून काढण्यात आले- अखेर २००६ मधली एक नोंद किंवा या नोंदीतलीही एक ओळ फार उपयोगी पडली.. ती ओळ होती, ‘ शाळेत असताना मी इतका बारकुडा आणि एकलकोंडा होतो की मुलं मला चिडवायची. मला समलिंगी म्हणायची..’ बस्स! इतकंच. एवढय़ावरून, ‘ही समलिंगी कादंबरी तर नव्हे?’ असाही प्रश्न ब्रिटनमधल्या या प्रतिष्ठित वृत्तपत्रानं केला आहे.
पण मार्लन जेम्स यांची ही तिसरी कादंबरी ‘एपिक’ स्वरूपाची आहे आणि तिच्यावर कोणताही एक शिक्का मारता येणं अशक्य आहे, हेच अधिक खरं!