‘बोस- अ‍ॅन इंडियन सामुराई’ या पुस्तकाची चर्चा सुमारे महिन्याभरापूर्वी (२१ जानेवारी) जोरात होती. लष्करी इतिहासकार मेजर जनरल (निवृत्त) जी.डी. बक्षी. हे या पुस्तकाचे लेखक. त्यांनी असा दावा केला होता की, महात्मा गांधी यांच्या लढय़ामुळे भारत स्वतंत्र झाला यात फारसे तथ्य नाही आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले.. त्यामुळे महात्मा गांधी हे राष्ट्रपिता नव्हते तर सुभाषचंद्र बोस हे खरे राष्ट्रपिता होते. या पुस्तकाचे पुढे काय झाले?
आता लेखक बक्षी यांनी हा दावा कशाच्या आधारे केला तर त्यात त्यांनी त्या वेळी पश्चिम बंगालचे गव्हर्नर असलेले पी.बी.चक्रबर्ती व ( भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करणारे) ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांच्यातील संभाषणाचाआधार घेतला आह.े हा संवाद नेमका काय झाला होता हे बक्षी यांनी पुस्तकात उद्धृत केले आहे. ‘द हिस्टरी ऑफ बंगाल’ या ढाका विद्यापीठाचे कुलगुरू आर.सी मजुमदार यांनी फार पूर्वी संपादित केलेल्या तीन खंडांच्या इतिहास ग्रंथातील तपशिलावर चक्रबर्ती यांनी प्रकाशकांना पत्र पाठवले होते. त्यातून सुभाषचंद्रांच्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील निर्णायक योगदानावर या संभाषणाच्या तपशिलाने प्रकाश पडला होता. पंतप्रधान अ‍ॅटली हे दोन दिवस गव्हर्नर चक्रबर्ती यांचे पाहुणे होते, तेव्हा चक्रबर्ती यांनी त्यांना विचारले की, गांधीजींच्या छोडो भारत चळवळीमुळे भारताला स्वातंत्र्य दिले जात आहे का. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्यात १९४२ च्या छोडो भारत चळवळीचा कितपत प्रभाव आहे, हे जाणण्याचा हेतू त्यामागे होता. त्यावर अ‍ॅटली यांनी सांगितले की, भारताला स्वातंत्र्य देण्याची अनेक कारणे आहेत; एक म्हणजे भारतीय लष्कराची ब्रिटिशांवरची निष्ठा कमी झाली आहे त्याचे कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या लष्करी कारवाया (ब्रिटिशांच्या दृष्टीने ‘कारवाया’च) हे आहे.ोांधींच्या लढय़ाचा फार किरकोळ परिणाम आमच्यावर झाला, असे अ‍ॅटली यांनी काहीसे कुत्सित हास्य करीत सांगितले होते.
अ‍ॅटली यांच्या त्या संभाषणाचा सूर असा होता की, आम्ही भारताला स्वातंत्र्य महात्मा गांधी यांच्या लढय़ामुळे दिलेले नाही,तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिले. त्यामुळे गांधी हे राष्ट्रपिता नाहीत तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे खरे राष्ट्रपिता आहेत, असा त्याचा गर्भितार्थ. याचाच अर्थ बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. १९४५ पासूनच्या घटना पाहिल्या तर आपल्याला चक्रबर्ती यांच्या म्हणण्याचा अर्थ उमगतो.. इतिहासाच्या पुनरावलोकनाचा हा प्रयत्न ‘खळबळजनक’ ठरला होता, त्याला महिना लोटला. त्या वेळी लेखक बक्षी यांनी ‘नॉलेज वर्ल्ड प्रकाशनातर्फे या महिन्याच्या(जानेवारी २०१६) अखेरीस हे पुस्तक येते आहे’ असे म्हटले होते. राहुल कंवल यांनी याबाबतची इंग्रजी बातमी देतानाही ‘नॉलेज वर्ल्ड’चा उल्लेख केला होता.
मात्र, या प्रकाशक संस्थेच्या कल्पना शुक्ला यांनीच आपण ते बघितले नसल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले. बक्षींची आधीची सर्व पुस्तके त्यांनीच प्रकाशित केल्याने हा खुलासा ‘पुस्तक कधी?’ हा प्रश्न कायम ठेवणारा आहे!