हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाच्या अवघ्या दहा प्रती खरेदी करण्यासाठी ३८ लाख रुपयांचा खर्च केला. लोकांच्या पैशातून हा खर्च केल्याची माहिती उघडकीला आल्यानंतर, ‘हा भ्रष्टाचारच आहे’ अशी प्रतिक्रिया बहुतेकांनी दिली. परंतु खट्टर यांच्याविषयी राजकीय सहानुभूती नसणाऱ्यांनाही दोन गोष्टी मान्यच कराव्या लागतील. त्या अशा :

(१) कदाचित हा खर्च ‘प्रत्येक प्रतीच्या छापील किमतीवर किमान ७०० हून अधिक रुपयांची सवलतच मिळवून, अगदी पावत्यांसह चोखपणे झाला आहे.’

(२) ‘गीतेच्या एका प्रतीची एवढी मोठी छापील किंमत?’ हा प्रश्नही गैरलागूच, कारण त्या विशिष्ट आवृत्तीच्या प्रती काही केवळ हरयाणा सरकारपुरत्या महाग नसून, ती सर्वासाठी साधारण याच किमतीला उपलब्ध आहेत.

आपल्या ‘बुकबातमी’चा खट्टर किंवा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. आपला संबंध आहे तो, गीतेसारख्या सार्वत्रिक उपलब्धता असलेल्या पुस्तकाची प्रत एवढी महाग कशी, या प्रश्नाशी.

साधारण दीड वर्षांपूर्वी मुंबईच्या एका मोठय़ा पुस्तक-दुकानात हीच महागडी प्रत ३८ हजार ७५० रुपयांना उपलब्ध होती. हरयाणा सरकारनं प्रती विकत घेतल्या होत्या दहा. म्हणजे जर त्यांनी याच आवृत्तीच्या प्रती विकत घेतल्या असतील, तर त्यांना एका प्रतीवर (मुंबईतल्या दुकानाच्या मानानं) ७५० रुपयांची सवलतच मिळाली आहे आणि एका प्रतीची किंमत आता ३८ हजार रुपये झाली आहे, असा अर्थ होतो (हरयाणा सरकारनं खरीदलेल्या प्रती याच आवृत्तीच्या नसल्याचं – किंवा असल्याचंही- सिद्ध झालेलं नाही.). ‘राजकार्ट’ नावाच्या एका इंटरनेट-विक्रीस्थळी याच प्रतीची किंमत ३६,६५० रुपये अशी शुक्रवारी (१२ जानेवारी २०१८) होती.

कबूल की, ग्रंथप्रेमी, ग्रंथसंग्राहक आणि कदाचित गीता-पाईक असलेल्या सर्वानी तोंडात बोटं घालावीत, अशीच ही अवाचा सवा किंमत आहे. पण ही किंमत केवळ पुस्तकाची नाहीच. हा एकंदर १४.६ किलो वजनाचा खोका आहे. त्यात मुलामेदार चकचकती सोनेरी ग्रंथखूण, प्रचंड आकाराचं- जाड कागदांचं पुस्तक, ते ठेवण्यासाठी उघडमीट होणाऱ्या छोटेखानी संदुकीसारखा खोका, आणि हे पुस्तक उघडून वाचतेवेळी ते अगदी सहज सामावू शकेल, इतका मोठा स्टॅण्ड अशा सर्व वस्तू ३८,७५० (किंवा ३६,६५०) रुपयांना मिळतात.

कॅलेंडर-चित्रकार म्हणून महानच असलेले (आणि हल्ली कलेऐवजी दृश्यसंस्कृतीवर कलासंग्रहालयांचा भर असल्यानं अमेरिकी कलासंग्रहालयांपर्यंत पोहोचलेले) जी. एल. एन. सिम्हा यांची चित्रं या पुस्तकाच्या पानोपानी आहेत. काही चित्रांमध्ये कलमकारीसारखी भरपूर कलाकुसर आहे. तरीही कुणाला जर ‘ही एवढी महाग पुस्तकं काढावीच कशाला?’, ‘पुस्तक हे काय धनिकपणा मिरवण्याचं साधन आहे का?’ असे प्रश्न पडत असतील, तर आपलं कर्म निराळं आहे असं खुशाल समजावं!