नवं कोरं पुस्तक, लोकांच्या चर्चेत असलेलं पुस्तक किंवा आगामी पुस्तक यांची चर्चा ‘बुकबातमी’ या सदरातून बऱ्याचदा झाली आहे.. पण आजचं पुस्तक तसं नाही.. म्हणजे एक तर, ते पहिल्यांदा १९७० साली जिनिव्हा इथल्या ‘इन्स्टिटय़ूट फॉर कल्चरल अॅक्शन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे प्रकाशित झालं होतं. मग आपले खेळातून शिक्षणाचे प्रसारक अरविंद गुप्ता यांनी त्याची भारतीय आवृत्ती आणली. ती सर्वदूर जावी यासाठी १९९८ मध्ये पुन्हा ती गोव्यातून, म्हापशाच्या ‘अदर इंडिया बुकस्टोअर’नं प्रकाशित केली. आतापर्यंत या पुस्तकाच्या हिंदी, तेलुगू आदी भाषांत आणि मराठीतही (अनुवाद : हेमलता होनवाड, मनोविकास प्रकाशन, २०१०) अनुवादित आवृत्त्या निघाल्या आहेत. काही प्रकाशकांनी ‘सर्व हक्क आमचे’ असं म्हटलं असलं, तरी मुळात हे पुस्तक ‘सर्व हक्क खुले’ या प्रकारचं आहे. त्यामुळे त्याचे अनुवाद करताना त्यात भरही घातली जाऊ शकते.
मग बातमी काय?
– शिक्षणाबद्दलचा जागतिक आशय सांगणारं हे पुस्तक तुम्हाला माहीत नसेल, तर तीच बातमी! आठवीपर्यंत परीक्षा किंवा पास-नापासाचे शिक्के नकोत’ हा मूळ विचार या पुस्तकानं ४५ वर्षांपूर्वी मांडला होता. त्याहीपुढे जाऊन, शाळा ही व्यवस्थाच कशी ‘काही जणांना वगळणारी’ आणि ‘ज्यांच्याकडे आधीपासून शिक्षणपूरक भांडवल (घरातलं वातावरण आणि पैसा) आहे, त्यांनाच पुढे जाऊ देणारी’ आहे, असाही विचार या पुस्तकानं मांडला. अनेक जागरूक पालकांना ‘होम स्कूलिंग’ साठी उद्युक्त करण्यास हे पुस्तकदेखील एक कारण ठरलं. ‘आता परिस्थिती बदलली’ असं म्हणणारे म्हणोत, पण या पुस्तकानं मांडलेले मूळ प्रश्न बदललेले नाहीत.
म्हणून, तुम्ही पालक असाल, तर १३ जूनला आपल्या पाल्याला शाळेत सोडण्याआधी शाळा धोक्याची का, अशी वैचारिक- पण मांडणी करणारं हे पुस्तक जरूर पाहा आणि वाचा! पुस्तक एखाद्या ‘कॉमिक’ सारखं चित्रमय आहे. पण ते मोठय़ांसाठीच आहे.
आणि हो, ‘पुस्तक मिळत नाही’ वगैरे कारणंही तुमच्याकडे असूच शकत नाहीत. इंटरनेटवरून अख्खं पुस्तक (इंग्रजी वा मराठीतही) तुम्ही पीडीएफ स्वरूपात वाचू शकता.
त्याकरिता लिंक पुढीलप्रमाणे :
इंग्रजी पुस्तकासाठी :
http://gyanpedia.in/Portals/0/T oys%20from%20Trash/Resources/books/
Danger_schoo.pdf
मराठी पुस्तकासाठी :
Click to access dhokaschool.pdf