हिंदुस्तानी संगीताचा तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडणारे हे पुस्तक हिंदू-मुसलमानांनी एकोप्याने वाढविलेल्या सांस्कृतिक वारशाची शोधकवृत्तीने ओळख करून देते आणि या शोधाच्या ओघात, औरंगजेबाविषयीचे काही गैरसमजही दूर करते..
एकोणिसाव्या शतकात बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ग्वाल्हेरला गाणे शिकायला गेले व तिथपासून सुरू झालेल्या महाराष्ट्रातील संगीताच्या वाटचालीचा इतिहास, आपल्याला ज्ञात आहे. इतिहासाच्या पुस्तकात कुठे तरी हेही वाचले होते की, अल्लाउद्दीन खिलजीच्या दक्षिणेवरील स्वारीनंतर, आपल्याबरोबर पुस्तकांप्रमाणेच देवगिरीतील ज्येष्ठ गायक गोपाल नायक यांनाही खिलजी उत्तरेत घेऊन गेला. सोमनाथ मंदिरात असणारे गडगंज धन लुटण्याबरोबरच िहदुस्तानचे ज्ञान हस्तगत करण्याचीही त्याची मनीषा होती. त्यासाठी खिलजी फौजेबरोबर अनेक विद्वानही घेऊन आला होता. त्यांचे नेमून दिलेले काम होते की भारतातील महत्त्वाचे ज्ञान असलेली पुस्तके अनुवादित करून घ्यायची. खिलजीच्या बरोबर आलेले फारसी विद्वान व िहदुस्तानातील संगीतकार यांच्या देवाण-घेवाणीमुळे िहदुस्तानी शास्त्रीय संगीताचा विकास टप्प्याटप्प्याने कसा होत गेला त्याचा वेध मधु त्रिवेदी यांनी ‘इमर्जन्स ऑफ द िहदुस्तानी ट्रॅडिशन’ या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या शोधनिबंधांचे हे संकलन आहे. या सर्व निबंधांसाठी त्यांनी उर्दू, अवधी, फारसी, संस्कृत अशा विविध भाषांत उपलब्ध असलेल्या साहित्याचा उपयोग केला आहे. अशा तऱ्हेच्या संकलनात पुनरुक्तीचा धोका मोठा असतो; पण पुस्तक काळजीपूर्वक संपादित केल्याने, आवश्यक तेथेच पुनरुक्ती आहे आणि हेही प्रमाण फारच कमी आहे. आज ज्याला आपण ‘शास्त्रीय संगीत’ म्हणतो ते इथपर्यंत कुठल्या वाटा-वळणे घेत आलेले आहे त्याचा वेध या पुस्तकात शिस्तशीरपणे व वेधकपणे घेतलेला आहे.
या संवर्धन, मिलाफ व नवनिर्माणाची प्रक्रिया खिलजीच्या काळापासूनच सुरू झाली. विद्वानांच्या या ताफ्यात सूफी संतही होते. या संतांनी अल्लापर्यंत पोहोचण्याचा स्वतचा एक वेगळा मार्ग शोधताना, हळूहळू सुफी तत्त्वज्ञान, सुफी संगीताने आकार घेण्यास सुरुवात केली. या सुफी पंथात सुऱ्हावर्दी, चिश्ती अशी अनेक घराणी होती. चिश्ती संत निजामुद्दीन औलियाचा काळ हाच. त्याचा मोठा प्रभाव खिलजी घराण्यावर होता. त्याचा शिष्योत्तम अमीर खुश्रो हा बहुआयामी विद्वान होता. उर्दू भाषा निर्माणालाही यानेच मोठा हातभार लावला, तसेच त्याने फारसी व िहदुस्तानी संगीताच्या मिलाफाचे प्रयोग आपल्या संगीतात केले. सुरुवातीला फारशी व ‘देशी’ भाषेचा उपयोग संगीतात होता. गाण्याच्या साह्याने परमेश्वराला (किंवा अल्लाला) आळवण्याची रीत िहदू व मुसलमानांच्यात याच वेळी उदयास आली. स्थानिक लोकसंगीत व इराणचे फारसी संगीत याच्या संकरातून कव्वाली, ठुमरी, टप्पा, गझल तसेच रागदारी संगीत तेरावे शतक ते एकोणिसावे शतक असे विकसित होत गेले. लेखिकेने वेध घेतलेली व्याप्ती उत्तर भारत म्हणजे दिल्ली, आग्रा, ग्वालियर, लखनऊ व काही अंशी पंजाब व काश्मीर प्रांत अशी आहे. पंजाब व काश्मिरातून आलेल्या पंडितांचा उल्लेख आहे व काश्मीरमध्ये कल्हणने लिहिलेल्या राजतरंगिणी या ग्रंथाचा उल्लेख आहे. फिरोज खिलजीच्या काळापासून दिल्लीत व ग्वालियरला राजा मानसिंग तोमर यांच्या काळात संगीतात हे निरनिराळे प्रयोग होत होते व संगीत बदलत होते. काही सुलतान संगीतात रस घेणारे असत तर काहींना स्थानिक रीती वा संस्कृतमध्ये असणारे ज्ञान यांचे संगीताशी असलेले संदर्भच कळत नसल्याने भारतीय परंपरेत संगीताचा अभिन्न अंग असलेल्या नाटकाला वाईट दिवस आले. त्यामुळे काही काळ नटांना व कलाकारांना बसून राहावे लागले. लेखिका म्हणते की, कलाकार काही काळ जरी बसून राहिले तरी त्यांनी नव्या राज्यकर्त्यांना पसंत पडेल असे संगीत लवकरच आत्मसात केले व हे करण्यात िहदू-मुस्लीम हा भेद तेव्हाही नव्हता व पुढेही कधी आला नाही. म्हणजे भक्ती संगीतात जेव्हा स्थानिक भाषेचा उपयोग होऊ लागला तेव्हा ते गाणारे दोन्ही धर्माचे असत. पुढेही कृष्णभक्तीची अथवा सासू-नणंद (साँसननदी) वा अल्लाची गीते दोन्ही धर्माचे गायक व नर्तक सारख्याच समरसतेने सादर करत. संगीताच्या जगात धर्मभेद कधीही आडवे आले नाहीत. ध्रुपद-धमारच्या जागी पद, भजन किंवा कव्वाली, मर्सयिाखानी (मोहर्रममध्ये गायली जाणारी हसन-हुसेन आठवण गीते.) अशी सामान्य लोकांना कळणारी व आत्मसात करता येणारी गाणीही या काळात निर्माण झाली. भक्ती संप्रदायाच्या वाढीबरोबर वृंदावनात कृष्णभक्ती व रासलीला वाढली. आगऱ्याजवळील वृंदावनच्या आसपास असंख्य मंदिरांचे निर्माण याच काळात झाले. हीच पदे व गाणी मुगलकाळात ब्रज भाषेत लिहिली जाऊ लागली. या व्रज भाषेला एक अंगभूत लय व गोडवा असल्याच्या मान्यतेमुळे या भाषेला प्रतिष्ठा मिळाली व अशा पदांचा प्रसार झाला. अकबराच्या काळात इतर अनेक बाबींचा विकास झालाच पण संगीतकारांबरोबरच्या आपसातील देवाणघेवाणीमुळे संगीत विकासाच्या वरच्या टप्प्यावर जात, शास्त्रीय संगीताच्या स्तरावर पोचले व दरबारात प्रतिष्ठा पावले. शहाजहानने राजधानी दिल्लीला आणली. लेखिका म्हणते की, शहाजहान काळात इमारतींच्या स्थापत्यावर मुख्यत्वे दाट इराणी प्रभाव जाणवत असला तरी संगीतावर मात्र िहदुस्तानी प्रभाव ठळकपणे जाणवू लागला होता. औरंगजेबही संगीताचा जाणकार होता व त्याच्या हुकमतीची पहिली दहा वष्रे संगीताचा आस्वाद नियमितपणे घेत असे. नंतर जरी त्याने संगीत ऐकणे सोडून दिले असले तरी त्याने संगीतावर बंदी घातली नव्हती व त्याच्या काळातही संगीताची प्रगती होत होती. एवढेच नव्हे तर त्याच्या जनान्यात मनोरंजनाचे साधन म्हणून राण्यांच्या सख्या उत्तम कलाकार असत तसेच राजघराण्यातील पुरुषांनीही संगीतातील आपली रुची टिकवून ठेवली होती. औरंगजेबानंतर दिल्लीचे महत्त्व कमी होऊ लागले. त्याच वेळी अवधच्या संस्कृतीची भरभराट होत होती. अवधच्या दरबारात कथ्थक नृत्याने आजचे विकसित रूप गाठले. संगीतातही ठुमरी, तराणा इत्यादींचा आविष्कार झाला. एकोणिसाव्या शतकात इंग्रजी राज्याने संस्थानांना अंतर्गत स्वायत्तता दिल्याने मोठी व श्रीमंत संस्थाने कलेची आश्रयदाती झाली. त्यांच्या आश्रयाखाली आज आपल्याला ज्ञात असलेली संगीतातील घराणी विकसित झाली.
विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत संगीत व नृत्याचा पेशा कलावंत समाजच अंगीकारत होता. तेराव्या शतकापासून हा पेशा कोणकोणत्या जातींनी अंगीकारला त्याचेही विवेचन संगीतावरील चच्रेच्या ओघात येते. संस्कृत साहित्यात आलेली नायकीण, तुर्को-इराणी राज्यकत्रे आल्यावर त्यांना संस्कृत व स्थानिक संस्कृतीचे ज्ञान नसल्याने बेकार झाल्या. पण त्यांच्या घरातील पुरुषांनी राज्यकर्त्यांच्या संगीताचे ज्ञान करून घेऊन, त्यात आपली भर टाकून, संमिश्र संगीताची निर्मिती केली. सुरुवातीच्या काळात नायक घराण्याचे मोठे नाव होते. हळूहळू त्यात स्त्रियांनी शिरकाव केला. यात भांड, डोम आदी जातींची नावे दिसतात. पतुरियाबाजी म्हणजे स्त्रियांच्या नाचाचा शौक असाही उल्लेख दिसतो. या स्त्रियांना लग्न करायला बंदी नव्हती. पण जगण्याचा पेशा म्हणून काही काळ हा व्यवसाय स्वीकारल्याचे उल्लेख आहेत. उत्तम गाणाऱ्या काही स्त्रिया नामवंत झाल्याचेही उल्लेख आहेत. हळूहळू त्यांचा व्यवसाय ही जात झाली, पण महाराष्ट्र किंवा गोवा तसेच खाली दक्षिणेत, देवाला वाहून त्यांच्या देवदासी असण्याचा उल्लेख आढळत नाही. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या विचारसरणीत स्त्रियांना देवाला वाहणे संमत नव्हतेच. त्यामुळे या काळात ‘गाण्या-बजावण्याचा’ व्यवसाय करणारे स्त्री-पुरुष अनेक जातींतून आलेले आढळतात. पुढे यात कोठेवाली (म्हणजे जिच्याकडे मोठय़ा प्रमाणात शास्त्रीय चीजांचा-रचनांचा संग्रह आहे ती.) इत्यादी भेद निर्माण झाले. पण हा विषय पुस्तकात नाही. तरीही, पुस्तकातून आपल्याला माहीत नसलेल्या संगीताच्या इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला माहीत होतात व त्यांचा उलगडा होतो.
वर म्हटल्याप्रमाणे पुस्तक संशोधकीय कसोटय़ांना पार पडणारे व संगीताच्या विकासाच्या टप्प्यांचा शोध घेणारे आहे, म्हणूनच ते महत्त्वाचे आहे. निकोप छपाई व काळजीपूर्वक संपादन ही थ्री एसेज कलेक्टिव्हची वैशिष्टय़े इथेही आहेत. पुस्तक वाचताना त्यामुळे अडखळायला होत नाही.

‘इमर्जन्स ऑफ द हिंदुस्तानी ट्रॅडिशन’
म्युझिक, डान्स अँड ड्रामा इन नॉर्थ इंडिया
(१३ वे – १९ वे शतक)
लेखिका : मधु त्रिवेदी
प्रकाशक : थ्री एसेज कलेक्टिव्ह, गुडगांव
पृष्ठे : २०५ ; किं. ३५० रु.

 

वासंती दामले 
vasantidamle@hotmail.com