सुधा मूर्ती
आर. के. नारायण, मुल्कराज आनंद, राजा राव या ज्येष्ठ लेखकांनी भारतीय मातीचा गंध इंग्रजीत आणला. आम्हाला इंग्लिश लेखक न म्हणता ‘इंडिश’ लेखक म्हणा, असं ‘स्वामी’ या मालगुडी गावच्या खोडकर मुलाला अजरामर करणारे आर. के. नारायण यांनी सुचवलं होतं आणि त्यामध्ये अर्थही होता! लेखक म्हणून फार मोठे असलेली ही त्रयी दिवंगत झाल्यानंतर अनेक वर्ष कुणी ‘इंडिश’ लिहित नव्हतं, ते काम गेल्या दोन दशकांमध्ये सुधा मूर्ती यांनी केलं. त्यांची पुस्तकं इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांत आहेत आणि त्यांचं इंग्रजी लिखाण वाचतानाही भारतीय मूल्यांची जाण, आधुनिकतेचं भारतीय भान आणि साहित्याला ‘संस्कार’ मानणारी भारतीय भूमिका यांची प्रचीती सतत येत राहते. मग ते ‘वाइज अँड अदरवाइज’ सारखं गाजलेलं, मराठीसह अन्य भाषांतही आलेलं पुस्तक असो, की ‘ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज’ यासारखं छोटुकलं पुस्तक असो. प्रासादिक भाषेत, वाचकाचं बोट धरून आपण गोष्ट सांगायची आहे, हे पथ्य सुधा मूर्ती नेहमीच पाळत आल्या आहेत. लेखक म्हणून, ‘आजी’ची भूमिका त्यांनी अगदी सहज निभावली आहे.
याच सुधा-आजींनी तीन लहान आकाराच्या पुस्तकांमधून गोपण्णाची गोष्ट सांगायचं ठरवलं आहे. गोपण्णा म्हणजे गोपी.. मूर्ती कुटुंबातला ‘गोपी’ हा गोल्डन रिट्रायव्हर कुळातला श्वान. ‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वहि देती मान’ हे खरं, पण असा मारून मुटकून मिळवलेला मानपान मूर्ती कुटुंबाला चालतो थोडाच? गोपी मनानंही जणू मूर्ती यांच्या कुटुंबातलाच झाला. कन्नडभाषक घरांमध्ये मुलाला सहजपणे ‘अण्णा’ म्हटलं जातं, तशी त्याला ‘गोपण्णा’ ही हाकदेखील परिचयाची झाली. हे त्याचं ‘कुटुंबीय होणं’ हा गोपीच्या गोष्टींचा गाभा. पहिल्या पुस्तकात, गोपी घरी येतो. पिल्लाएवढय़ाच डोळय़ांनी आणि दुडदुड पायांनी घर पाहू लागतो. तो माणसांना हळुहळू ओळखू लागतो. इथं पहिला भाग संपतो. ‘गोल्डन रिट्रायव्हर’ हे कूळ हुषार. या कुळातले श्वान दिसायला काहीसे लॅब्रेडोरसारखेच, पण तुलनेनं शेलाटे. वाढत्या वयात गोपी बरंच काही शिकू लागतो, स्वत:च्या गुणांनी सर्वानाच लळा लावतो, हा दुसरा भाग. आणि तिसऱ्या भागात, गोपी प्रौढपणे जगाबद्दल बोलणार आहे!
या सर्वच गोष्टी, गोपीला काय वाटलं असेल, याचा विचार करून सांगितलेल्या आहे. ‘डॉगी आणायचा’ असा हट्ट धरणाऱ्या मुलांसाठी- आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा- या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ‘हार्पर कॉलिन्स’या प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थेतर्फे या तीन्ही पुस्तकांचा संच लवकरच प्रकाशित होतो आहे. ‘आपल्या घरात कुत्रा नको’ म्हणणाऱ्यांनीही श्वान-मानव नातं काय असतं, हे (दुरून) अनुभवण्यासाठी या गोष्टी वाचायला हरकत नाही!