राष्ट्रवादापेक्षा नीतिमत्तेला, आर्थिक प्रगतीऐवजी विचारस्वातंत्र्याला महत्त्व देऊन वाक्लाव हावेल यांनी राज्य चालविले. त्याआधीची अनेक वर्षे याच मानवी मूल्यांसाठी झगडा दिला. नाटककार, साहित्यिक असलेल्या हावेल यांचे जगण्याचे भान कलावंताचेच होते.. या नेत्याच्या जीवनाचा आणि मर्यादांचाही उत्तम प्रकारे धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाचा हा दीर्घ परिचय. पुस्तक अप्राप्य आहे, म्हणूनच..
‘राजकारणाचे अधिष्ठान नैतिकतेत असले पाहिजे. माझे राजकारण ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि ती माझ्या प्रत्येक कृतीत दिसेल’; असे म्हणणारे वाक्लाव हावेल हे केवळ राजकारणीच नव्हे; तर प्रतिभावंत नाटककार, निबंधलेखक व तत्त्वचिंतकही होते. चेकोस्लोव्हाकियातील प्रस्थापित साम्यवादी राजवटीच्या विरोधात वैचारिक असंतोषाचे स्थंडिल धगधगते ठेवणारे हावेल शांततामय मार्गाचा अवलंब करून या विषम संघर्षांत विजयी झाले. आरंभी हावेल चेकोस्लोव्हाकियाचे अध्यक्ष होते. नंतर चेकोस्लोव्हाकियाची फाळणी होऊन चेक व स्लोव्हाकिया वेगळे झाल्यावर ते चेकचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडले गेले. हावेल यांचे नाटय़लेखन, त्यांची मानवतावादी विचारसरणी आणि राजकीय कर्तृत्व याद्वारे त्यांचे उर्जस्वल व्यक्तिमत्त्वच अधोरेखित होत जाते. आपल्या मतांवर ठाम राहणाऱ्या, मूल्यांसाठी झगडणाऱ्या, सर्जनशील वृत्तीच्या आणि नेमस्त व्यक्तिमत्त्वाच्या हावेल यांचे संपूर्ण जीवन ही एक संघर्षयात्रा होती. ही संघर्षयात्रा मायकेल झ्ॉन्टोवस्की यांनी ‘हावेल : ए लाइफ’मध्ये विस्ताराने शब्दबद्ध केली आहे.
हावेल यांचा जन्म ५ सप्टेंबर १९३६ रोजी झाला. जन्मस्थळ अर्थातच प्राग. याच प्रागने फ्रान्झ काफ्का आणि हासेक यांसारखे प्रतिभावंत साहित्यिक जगाला दिले होते. हावेल घराणे मुळातच बुद्धिवान आणि तालेवार म्हणून प्रसिद्ध होते. हावेलचे आजोबा वास्तुशिल्पी होते. प्रागमधील अनेक देखण्या इमारती आणि राजवाडा त्यांनी बांधला होता. हावेलच्या वडिलांनीही तोच व्यवसाय पुढे चालू ठेवला. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपातील अनेक राष्ट्रांत स्टॅलीनने साम्यवादी राजवटी लादल्या आणि सोव्हिएत युनियनच्या लष्करी बळावर त्या टिकविल्या. १९४८ मध्ये चेकोस्लोव्हाकियातही तेच घडले. आधीची राजवट जाऊन तेथे साम्यवादी सरकार आले. हे सत्तांतर होत असताना, हावेल यांच्या कुटुंबाला ‘वर्गशत्रू’ ठरविण्यात आले आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त केली गेली. कोणत्याही श्रीमंत माणसाच्या मुलाला उच्चशिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश देण्यात येऊ नये, या स्टॅलीनच्या आदेशाची अंमलबजावणी चेकोस्लोव्हाकियात करण्यात आली आणि मग शालान्त परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्या हावेल यांना प्राग विद्यापीठाचे दरवाजे बंद झाले. नंतर रासायनिक प्रयोगशाळेतील साहाय्यक, खिडक्यांच्या काचा पुसणारा कामगार, अशी अंगमेहनतीची कामे करीत त्यांनी रात्रीच्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले.
काव्यलेखनाने हावेल यांनी साहित्यनिर्मितीस आरंभ केला. कोणत्याही कम्युनिस्ट राष्ट्रांत लेखकांची सरकारमान्य संघटना असे; तशीच ती चेकोस्लोव्हाकियातही होती. हावेलही काही काळ या संघटनेत सहभागी झाले होते, पण ही संघटना सरकारी प्रचाराची यंत्रणा म्हणून जे काम करीत असे, त्यात त्यांनी कधीच भाग घेतला नाही. याच सुमारास हावेल यांना सक्तीने दोन वर्षे लष्करात काम करावे लागले. १९६० मध्ये चेकोस्लोव्हाकियात सरकारमान्य लेखक संघटनेला पर्यायी वाङ्मयीन चळवळ सुरू झाली. ‘तेवर’ हे मासिक या चळवळीचे मुखपत्र होते. इतर बंडखोर तरुणांप्रमाणेच हावेलसुद्धा या चळवळीत सहभागी झाले आणि ‘तेवर’मध्ये लेखन करू लागले. ‘तेवर’मध्ये लिहिलेल्या एका लेखात त्यांनी म्हटले होते; ‘सर्वात वाईट गोष्ट अशी, की आपण प्रदूषित नैतिक वातावरणात जगत आहोत. आपण आजारी आहोत; मनोरुग्ण आहोत. कारण आपण विचार करतो त्यापेक्षा वेगळे बोलण्याची आपल्याला सवय झालेली आहे.’ याच सुमारास हावेल यांनी रंगभूमीवर मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि दीर्घ परिश्रमानंतर त्यांनी नाटककार म्हणून नाव मिळविले. त्या काळात चेकोस्लोव्हाकियातील राजकीय परिस्थिती अतिशय गोंधळाची होती. त्यातील विसंगती आणि हास्यास्पदता चित्रित करण्यासाठी त्यांनी ‘असंगत रंगभूमी’ (अॅब्सर्ड थिएटर) हा नाटय़बंध स्वीकारला. हावेल यांच्या नाटकांतून अस्तित्ववादी विचारसरणी आणि त्यांना आलेले अनुभव यांचे एकजिनसी चित्रण आढळते; तसेच त्यांच्यावरील सॅम्युअल बेकेट आणि युजीन आयनेस्को यांचा प्रभावही जाणवतो. १९६३ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘दि गार्डन पार्टी’ या नाटकात त्यांनी सरकारी नोकरशाहीचा दीर्घसूत्री कारभार आणि त्यामुळे होणारी सर्वसामान्य माणसाची ससेहोलपट यावर बोचरे भाष्य केले होते. ‘दि मेमोरॅण्डम’ (१९६५), ‘दि इनक्रीज्ड डिफिकल्टी ऑफ कॉन्सन्ट्रेशन’ (१९६८), ‘बटरफ्लाय ऑन दि अन्टेना’ (१९६८) ‘कॉन्स्पिरेटर्स’ (१९७१), ‘ऑडियन्स’ (१९७५), ‘प्रोटेस्ट’ (१९७६), ‘मिस्टेक’ (१९८३), ‘लार्गो डिसोलोटो’ (१९८४), ‘रिडेव्हलपमेंट’ (१९८७) आणि ‘टुमारो’ (१९८८) ही हावेल यांची आणखी काही महत्त्वपूर्ण नाटके.
१९६५ मध्ये चेकोस्लोव्हाकियातील विचारवंत आणि सर्वसामान्य जनतेत नव्या विचारांचा प्रसार झाला. त्यामुळे अस्वस्थ होऊन सरकारने दडपशाहीचा अवलंब केला. त्या वेळी लेखनस्वातंत्र्यासाठी हावेल यांनी बराच प्रयत्न केला. त्यांच्या मतासारख्या लेखकांचा एक गट निर्माण झाला आणि त्यातूनच पुढे ज्याला ‘प्राग स्प्रिंग’ म्हणतात त्याचा उदय झाला. अलेक्झांडर डय़ुबचेक यांच्या हाती सत्ता आली. डय़ुबचेक यांची मार्क्सवादावर श्रद्धा होती, पण मानवी चेहऱ्याचा साम्यवाद हवा असे त्यांचे मत होते. साम्यवादी राजवटीत दुर्मीळ असणाऱ्या विचारस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांची त्यांनी चेकोस्लोव्हाकियात प्रतिष्ठापना केली. या कामी हावेल यांनी त्यांना मदत केली, पण हा सुखद काळ थोडाच टिकला. मार्शल टिटो यांच्या युगोस्लाव्हियाप्रमाणेच चेकोस्लोव्हाकियाही आपल्या नियंत्रणातून जाईल, या भीतीने रशियन राज्यकर्त्यांनी डय़ुबचेक यांना पदच्युत केले आणि जबरदस्तीने राजकीय विजनवासात पाठविले. ‘प्राग स्प्रिंग’ मावळला आणि चेकोस्लोव्हाकियात दीर्घकालीन शिशिर सुरू झाला. गुस्ताव हुसाक राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी जनतेला वारेमाप आश्वासने दिली, पण एकाचीही पूर्ती केली नाही. (प्रख्यात चेक लेखक मिलान कुंदेरा हा तर हुसाक यांना उपरोधाने ‘प्रेसिडेंट ऑफ फर्गेटिंग’ असे म्हणत असे.) हुसाकने आपल्या राजकीय विरोधकांना सरळ सरळ तुरुंगात टाकले. प्राध्याकांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आणि बुद्धिजीवी मंडळींना शरीरश्रमाची कामे देण्यात आली. हुसाकच्या कारकीर्दीत इतिहास नव्याने लिहिला जाऊ लागला आणि कृत्रिम शासकीय भाषेचे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले. (‘दि मेमोरण्डम’ या नाटकात एक सरकारी अधिकारी आपल्या लहरीनुसार सर्वसामान्यांना परिचित असलेली भाषा शासनव्यवहारातून काढून टाकतो आणि ‘टाइडीप’ ही क्लिष्ट भाषा जनतेवर लादतो, असे हावेल यांनी दाखविले होते.) हुसाकच्या कारकीर्दीत हावेल यांच्या नाटकांच्या प्रयोगांवर बंदी घालण्यात आली. देशातील जनतेच्या मुक्त विचारांचा संकोच झाला. सर्वत्र दडपशाही, संशय, हिंसाचार आणि भीती यांचे वातावरण होते. हुसाकच्या कारकीर्दीविषयी ‘मरणप्राय स्तब्धतेचा एक प्रदीर्घ कालखंड’ असे हावेल यांनी म्हटले होते आणि सर्वसामान्य चेक जनतेचे वर्णन ‘अस्थमा झालेला समाज’ असे केले होते. (अस्थमा झालेला रुग्ण मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाही.)
चेकोस्लोव्हाकियातील दडपशाही असह्य़ झाल्यावर हावेल यांनी गुस्ताव हुसाक यांना ८ एप्रिल १९७५ रोजी एक पत्र लिहिले. कम्युनिस्ट राजवटीत देशाची भौतिक व नैतिक अधोगती कशी झाली आहे, याचे विदारक चित्रण हावेल यांनी या पत्रात केले होते. या पत्राला सरकारी नियंत्रणामुळे उघडपणे प्रसिद्धी मिळू शकली नाही, तरी गुप्तपणे त्याचा प्रसार होतच राहिला. याच सुमारास हावेल यांनी ‘पॉवर ऑफ पॉवरलेस’ (सत्ताहीनांचे सामथ्र्य) हा सुमारे ८६ पानांचा प्रदीर्घ लेख लिहिला. त्यांचा हा लेख आणि हुसाक यांना लिहिलेले पत्र ‘लिव्हिंग इन ट्रथ’ (१९८६) मध्ये ग्रथित झाले आहेत. हावेल यांनी या काळात फार मोठय़ा प्रमाणात वैचारिक लेखन केले. त्यांचा ‘समर मेडिटेशन्स : ऑन पॉलिटिक्स, मोरॅलिटी अॅण्ड सिव्हिलिटी इन ए टाइम ऑफ ट्रॅन्झिशन’ हा लेखसंग्रह १९९२ मध्ये ‘फेबर अॅण्ड फेबर’ या इंग्लंडमधील प्रख्यात प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केला होता.
१९७७ मध्ये चेकोस्लोव्हाकियातील अनेक विचारवंत आणि कलावंतांनी एकत्र येऊन ‘चार्टर-७७’ हा मानवी हक्काचा जाहीरनामा काढला. साम्यवादामुळे देशात सर्वसामान्यांची कशी फरफट होत आहे, याचे वास्तव चित्रण त्यात करण्यात आले होते. हा ठराव तयार करण्यात आणि तो लोकांसमोर मांडण्यात हावेल यांचा पुढाकार होता. आरंभी केवळ २४२ जणांच्या सह्य़ा असलेला हा ठराव हावेल यांच्या नेतृत्वाने झळाळून उठला आणि चेकोस्लोव्हाकियात असंतोषाचा आगडोंब उसळला. मानवी हक्कांची सनद असलेल्या ‘चार्टर-७७’ला कम्युनिस्ट सरकारने विरोध करणे अपरिहार्यच होते. हावेल यांना जगभरातील विचारवंतांनी आणि प्रतिभावंतांनी आपला पाठिंबा जाहीर केला. त्यात नोबेल पारितोषिक विजेते हाईनरिष ब्योल आणि सॅम्युअल बेकेट तसेच आर्थर मिलर व मिलान कुंदेरा यांचा समावेश होता. ‘कॅटॉस्ट्रोफी’ हे नाटक अर्पण करून बेकेटने हावेलविषयी आदर व्यक्त केला होता. (आपल्याकडील प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनीही १९९० च्या दशकात प्रसिद्ध झालेले आपले ‘रामप्रहर’ हे पुस्तक हावेल यांना अर्पण केलेले आहे.) ‘चार्टर-७७’ प्रसिद्ध झाल्यावर हावेल यांनी सरकारचे समर्थन करावे. किमानपक्षी टीका तरी करू नये यासाठी त्यांना खरीदण्याचा प्रयत्न केला गेला, पण हावेल म्हणजे कोणी विकाऊ बुद्धिमंत नव्हतेच. मग त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून हावेल यांना तीन वेळा कारावासाची शिक्षा झाली. तेथे त्यांना वेल्डरचे काम करावे लागे व बिअरची रिकामी पिंपे व्यवस्थित रचावी लागत. १९७९ ते १९८९ या कालावधीत ते पाच वर्षे तुरुंगात होते. कारावासाची एक मुदत तर केवळ हावेल न्यूमोनियाने मरणार अशी लक्षणे दिसू लागल्यावर संपुष्टात आली. तुरुंगात असताना हावेल यांचे वाचन आणि लेखन चालू होते. तेथे त्यांनी त्याआधी अनेकवार वाचलेले फ्रांझ काफ्काचे साहित्य पुन्हा एकदा वाचून काढले आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. जून १९७९ ते सप्टेंबर १९८२ या कालावधीत हावेल यांनी आपली पत्नी ओल्गा हिला १४४ पत्रे लिहिली. मूळ चेक भाषेतील या पत्रांचा इंग्रजी अनुवाद ‘लेटर्स टू ओल्गा’ या शीर्षकाने (अनुवादक- पॉल विल्सन) १९८८ मध्ये प्रसिद्ध झाला. हा पत्रसंग्रह पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचा असून धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान आणि कला याविषयीची आपली मते हावेल यांनी त्यात मुक्तपणे व्यक्त केली आहेत. पहिल्याच पत्रात हावेल म्हणतात : ‘हा तुरुंगवास मी दु:ख म्हणून घेत नाही किंवा विनोद म्हणूनही. त्यातून मला केव्हा तरी जायचेच होते, ते पूर्वीच निश्चित झाले होते, असे समजून मी त्याचा स्वीकार करीत आहे.’ या कारावासाविषयीच्या क्रिया-प्रतिक्रिया नंतरच्या पत्रांतून पुढे आलेल्या आहेत. ‘जीवन कोणताही अर्थ घेऊन नाही. जीवनाला अर्थ द्यावा लागतो; निर्थकतेच्या जबडय़ातून जीवनाला सोडवावे लागते,’ असा सकारात्मक विचार हावेल यांनी एका पत्रातून मांडला होता.
१९८९ मध्ये जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर साम्यवादाचा सूर्य अस्तमान होऊ लागला होता. ज्या साम्यवादाची पाठराखण करण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी उदारीकरणाची प्रक्रिया आरंभली होती, तिची जागा लोकशाहीने घेतली आणि खुद्द रशियातच साम्यवाद पराभूत झाला. त्याचा परिणाम सोविएत युनियनच्या अंकित असलेल्या राष्ट्रांच्या राजकारणावर झाला आणि पूर्व युरोपात लोकशाहीची प्रतिष्ठापना झाली. चेकोस्लोव्हाकियातील कम्युनिस्ट राजवट कोसळल्यावर २० डिसेंबर १९८९ रोजी हावेल राष्ट्राध्यक्ष झाले. रशियात साम्यवादाचा पराभव झाल्याने, पूर्व युरोपातील जे वांशिक गट केवळ साम्यवादामुळे एकत्र टिकून होते, ते परस्परांपासून अलग होऊ लागले. साम्यवादाचा आधार गेल्यावर खुद्द सोविएत युनियनची अनेक शकले उडाली होतीच. त्यातच खासगीकरणाची प्रक्रिया गतिमान झाल्याने, पूर्व युरोपातील अनेक वांशिक गटांनी आपापली स्वतंत्र राष्ट्रे निर्माण केली. चेकोस्लोव्हाकियातही ‘चेक’आणि ‘स्लोवाक’ या वंशांत दुरावा निर्माण झाला. १९९२ च्या जुलै महिन्यात झालेल्या वरिष्ठ संसदीय सदनाच्या निवडणुकीत स्लोवाक प्रभागातून आवश्यक ते बहुमत मिळविण्यात हावेल यांना अपयश आले आणि चेकोस्लोव्हाकियाच्या विभाजनाचे स्पष्ट संकेत मिळाले. हावेल यांनी शांतपणे राजीनामा दिल्याने चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन रक्ताचा एक थेंबही न सांडता झाले. १९८९ मध्ये चेकोस्लोव्हाकियाचे अध्यक्ष होताना आपल्या विजयाची घटना ही ‘वेल्वेट रिव्होल्यूशन’ (मखमली क्रांती) असल्याचे त्यांनी नमूद केले होते. समंजस वृत्तीने आणि धोरणीपणाने वागून हावेल यांनी स्लोवाकप्रांताची सूत्रे ब्लादीमिर मेसियर यांच्या हाती दिली. त्यामुळे या फाळणीची वाटही मखमलीच राहिली. त्यानंतर हावेल चेक प्रजासत्ताकचे अध्यक्ष झाले.
मायकेल झ्ॉन्टोवस्की हे हावेल यांचे राजकीय प्रवक्ते आणि प्रसिद्धी सचिव होते. त्यामुळे हावेल यांची राजकीय कारकीर्द त्यांना जवळून पाहावयास मिळाली. २९ डिसेंबर १९८९ ते २० जुलै १९९२ या काळात हावेल चेकोस्लोव्हाकियाचे अध्यक्ष होते.या काळात त्यांनी १७ आंतरराष्ट्रीय करार केले, १०७ भाषणे दिली आणि पूर्व युरोपात चेकोस्लोव्हाकियाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. १९९३ ते २००३ या काळात चेक प्रजासत्ताकला ‘नाटो’चे सदस्यत्व मिळवून देण्यात आणि चेक जनतेवरील प्रांतवादाचे जोखड दूर करण्यात हावेल बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले, पण इतर क्षेत्रांतील त्यांची कामगिरी तशी निराशाजनक होती. सत्तेवरून पायउतार झाल्यावर हावेल लेखन-वाचनात मग्न झाले. या काळात प्रसिद्ध झालेला ‘टू दि कॅसल अॅण्ड बॅक’ (२००८) हा हावेल यांचा ग्रंथ त्यांच्या चिंतनशीलतेचा प्रत्यय देतो. चेक जनतेचा विवेकरक्षक आणि विचारदाता म्हणून हावेल यांची जागतिक पातळीवर प्रसिद्धी विस्तारली होती आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते धनी झाले होते. आपली पत्नी ओल्गा मरण पावल्यावर हावेल यांनी वयाची साठी उलटल्यावर देगमार वेस्क्रानोव्हा या अंगप्रदर्शन करणाऱ्या सुमार दर्जाच्या अभिनेत्रीशी केलेला विवाह चेक जनतेला फारसा आवडला नाही, तरीही त्यांची लोकप्रियता तशीच अबाधित राहिली. हावेल यांचा मित्रपरिवार जगभर पसरला होता. त्यात बिल क्लिंटन आणि दलाई लामा यांचा समावेश होता. बिल क्लिंटनबरोबर संगीतात रममाण होणारे हावेल दलाई लामांबरोबर तात्त्विक चर्चा आणि ध्यानधारणा करीत असत. हावेल सुरक्षा सैनिकांशिवाय सर्वसामान्यांत सहजपणे मिसळत आणि त्यांच्याशी संवाद साधत.
झ्ॉन्टोवस्की सांगतात की हावेल यांच्या व्यक्तिमत्त्वात लोभसवाणी अनौपचारिकता होती; नंतर ती बेशिस्तीत रूपांतरित झाली. ते अतिरिक्त मद्यपान आणि धूम्रपान करू लागले. परिणामी त्यांची प्रकृती ढासळली आणि १८ डिसेंबर २०११ रोजी ते निधन पावले. हावेल यांच्या लोकोत्तर गुणांचा परिचय करून देत असतानाच झन्टोवस्की यांनी त्यांच्या दोषांचाही निर्देश केला आहे. त्यामुळे हावेल यांचे सामथ्र्य आणि मर्यादा यांचे वस्तुनिष्ठ भान वाचकांना येते.
हावेल – अ लाइफ
लेखक : मायकेल झॉन्टोवस्की
प्रकाशक : ग्रोव्ह प्रेस, न्यूयॉर्क
पृष्ठे : ५४३ किंमत : ३० डॉलर
भालचंद्र गुजर