आजचा हिंदू धर्म म्हणजे धर्मशास्त्रोक्त ‘श्रौत-स्मार्त धर्म’ होय. साधारणपणे बुद्धपूर्वकालीन श्रुतींचा तो ‘श्रौत’ व बुद्धोत्तरकालीन स्मृतींचा तो ‘स्मार्त’ असे समजले जाते. मात्र त्यावर आधारित बव्हंशी पुराणे तसेच महाकाव्ये यांचाही समावेश या धर्मात होतो. इ.स. पूर्व २०० ते इ.स. १२०० अशा सुमारे १४०० वर्षांच्या कालखंडात सतत होणारे बदल रिचवत श्रौत-स्मार्त धर्माला आकार येत गेला. या इतिहासाचा आढावा हे पुस्तक घेतेच, शिवाय कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग यांचा प्रवास, त्यामागील कर्मकांड व दर्शनशास्त्र, महाभारत, मिथके, स्थापत्यकला अशा विविध अंगांनी श्रौत-स्मार्त धर्माविषयीचे आकलनही मांडते..
१९९१ चे नवे आíथक धोरण व त्याच वर्षी झालेली जनगणना या प्रमुख कारणांमुळे भारतातील व्यापारी पेठेकडे जगाचे लक्ष वेधले गेले. परिणामी विकसित राष्ट्रांनी आपल्या गुंतवणुकीस उपयुक्त म्हणून भारतविषयक संशोधनास प्रोत्साहन दिले व या खंडप्राय देशाचा अभ्यास जगातील विविध विद्यापीठांत होऊ लागला. परंपराप्रिय समजल्या जाणाऱ्या ‘हिंदू’ विचारसरणीच्या अनुषंगाने सिडनी विद्यापीठातील जॉफ्री ओडी यांनी संपादित केलेला ‘हिंदूइझम इन इंडिया’ हा मौलिक द्विखंडी ग्रंथ याच प्रक्रियेची परिनिष्पत्ती दिसते.
आजचा हिंदू धर्म म्हणजे धर्मशास्त्रोक्त ‘श्रौत-स्मार्त धर्म’ होय. साधारणपणे बुद्धपूर्वकालीन श्रुतींचा तो ‘श्रौत’ व बुद्धोत्तरकालीन स्मृतींचा तो ‘स्मार्त’ असे समजले जाते. मात्र त्यावर आधारित बव्हंशी पुराणे तसेच महाकाव्ये यांचाही समावेश या धर्मात होतो. ‘हिंदूइझम इन इंडिया- द अर्ली पीरियड’ या प्रथम खंडात स्थूलमानाने इ.स. पूर्व २०० ते इ.स. १२०० असा सुमारे १४०० वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. यात कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग यांचा प्रवास, त्यामागील कर्मकांड व दर्शनशास्त्र, महाभारत, मिथके, स्थापत्यकला अशा विविध अंगांनी श्रौत-स्मार्त धर्माचा शोध घेतला गेला आहे. जॉफ्री ओडी यांनी ‘हिंदू’ हा शब्द मध्यपूर्वेच्या परकीय मध्ययुगीन आक्रमकांनी शोधला असला तरी त्याचा प्रचार-प्रसार मात्र इंग्रजांनी केला, अशी साधार मांडणी केली आहे. अॅक्सेल मिशेल्स यांनी ‘कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग मिळून श्रौत-स्मार्त धर्म बनला आहे,’ असे कळीचे सूत्र सांगितले आहे.
ग्रंथात नमुदित प्रमुख घटनांच्या कालानुक्रमानुसार आर्य बाहेरून आले, असे पहिल्या खंडाचे संपादक-लेखक ग्रेग बेली यांचे मत दिसते. ऋग्वेदाचा कालखंड हा इ.स. पूर्व १२००-८०० वष्रे असा नोंदविण्यात आला आहे. वैदिक काळात प्रमुख स्थान असणाऱ्या कर्ममार्गाचा मुख्य उद्देश स्वर्गप्राप्ती व सुफलन असा होता. प्रारंभीच्या उपनिषदांत (इ.स. पूर्व ६०० ते ३००) या कर्ममार्गाच्या विरोधात विश्लेषण येऊ लागले. श्रमण संस्कृती तर कर्ममार्गाच्या विरोधात होती. आधुनिक संशोधकांच्या मते, तत्कालिन मगध प्रांतातील श्रमण संस्कृतीशी वायव्येकडून आलेल्या वैदिक संस्कृतीचा समन्वय होऊन ‘हिंदुइजम’ची निर्मिती झाली. अॅक्सेल मिशेल्स यांनी कर्मकांडाविषयी तपशीलवार विवेचन केले आहे. इ.स. पूर्व १७५० ते ५०० या काळातील वैदिक साहित्यात ‘कर्म’ म्हणजे बळी असा अर्थ ठळकपणे दिसतो. नंतर ‘पुनर्जन्मास कारणीभूत ठरणारे कृत्य’ असा अर्थ त्याला प्राप्त होऊ लागला. यज्ञ हे प्रमुख कर्मकांड असून ते घरातील ‘गृ’ व सार्वजनिक ‘श्रौत’ अशा दोन्ही पद्धतीने केले जात असे. इ.स. ३००-४०० या काळातील गृसूत्रांत पूजेचा पहिला सूचक उल्लेख आढळत असला तरी या शब्दाचे मूळ तमिळ भाषेत असावे. यज्ञात पशूबळी चालू शकतो, तर पूजेत केवळ शाकाहारी पदार्थ चालतात. ग्रंथात वर्षभर चालणाऱ्या सणांची व आयुष्यभर करावयाच्या कर्मकांडाची यादीही दिली आहे. प्राथमिक कर्मकांडाद्वारे यज्ञात दिला जाणारा बळी हा फारसा महत्त्वाचा नसे. मात्र सातव्या शतकातील कुमारिल भट्टाचा दाखला देऊन लेखक सांगतात, की हा बळी त्याच्या योग्यतेनुसार नंतर (स्वर्गात) फळ देतो. या अदृश्य परिणामामुळे कर्म व पुनर्जन्म यांचा पाया घातला गेला. परंतु ढोबळ मानाने पाहू गेल्यास उत्तरवैदिककाळात पुनर्जन्माची संकल्पना आली, असे दिसते. तसेच, पवित्र कार्यासाठी एखाद्याला योग्य वा सक्षम बनविणे म्हणजे संस्कार, असे ब्रायन स्मिथ सांगतात. मनुस्मृतीनुसार संस्कार शब्दाचा अर्थ द्विजांना वेदाध्ययनासाठी योग्य बनविणे, असा आहे.
‘महाभारत आणि धर्म’ या प्रकरणात अॅडम बॉल्स यांनी धर्माच्या विविध छटा सोदाहरण स्पष्ट केल्या आहेत. धर्म टिकविण्यासाठी इतर धर्माचा त्याग करावा लागतो. यातून धर्माची सापेक्षता दिसून येते. भीमपुत्र घटोत्कच हा पांडवांच्या पक्षातील असूनही कृष्णाकडूनच कसा वध्य होता, ही माहिती चकित करणारी आहे. भूमातेने गिळलेले रथचक्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा नि:शस्त्र कर्ण अर्जुनाला धर्माने वागण्याची विनंती करतो. ती अव्हेरताना कृष्णाने द्रौपदीचा अवमान व युद्धानुषंगिक घटनांची कर्णाला आठवण करून देत तेव्हा कुठे गेला होता धर्म, असा प्रतिप्रश्न विचारला. मात्र हा प्रश्न कृष्ण व अर्जुनालाही लागू होतो, असा अर्थपूर्ण शेरा मारून लेखकाने महाभारताच्या मूळ स्वरूपाविषयी असलेले तज्ज्ञांतील मतभेद नोंदविताना फित्झगेराल्ड व इतर अभ्यासकांनी युधिष्ठिराच्या पात्राचे सम्राट अशोकाच्या व्यक्तिमत्त्वाशी दाखविलेले साधम्र्य नमूद केले आहे.
‘मिथकशास्त्र’ सांगताना ग्रेग बेली यांनी मिथकांचा प्रचार-प्रसार पुराणकालात अधिक झाल्याचे सांगून त्यांचा सविस्तर धांडोळा घेतला आहे. देवी भागवत पुराणातील देवी मिथकात वेदकाळातील इंद्राने केलेल्या वृत्रासुराच्या पराभवाचे प्रतिबिंब आहे. या अभिप्रायाचा पतीचा विधिवत वध करणाऱ्या गणराणीशी ताळमेळ बसत नाही. तथापि, गणपती-शंकर द्वंद्व म्हणजे फ्रॉईडने सांगितलेला पितागंड असून त्यातून माता व बालक यांची पित्याविरोधातील लक्षणीय आघाडी कुटुंबातील कलह दर्शविते, हे वेगळे निरीक्षण आहे. सोंथायमर यांच्या मते, धनगर समाजातील मिथके ही अधिक विश्वासार्ह व पडताळणीयोग्य असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. तमिळ मिथकांत स्थानमहात्म्य महत्त्वाचे आहे, असेही येथे नमूद केले आहे.
प्रबळ पुरातत्त्वाचा अभाव हे वैदिक काळातील महत्त्वाचे वैगुण्य आहे, याकडे बेलींनी लक्ष वेधले आहे. काही शिलालेखांत धार्मिकतेपेक्षा राजकीय आशय अधिक दिसतो. शिवाय संस्कृतचे भाषाविषयक पुरावे हे वरच्या शास्त्या वर्गाच्या संदर्भाने येतात, त्यात शासित वर्गाला स्थान नाही. शेवटच्या प्रकरणात क्रिस्पिन ब्रॅन्फूट यांनी स्थापत्य, मूर्ती व चित्रकलेचा आढावा घेतला आहे.
श्रौत-स्मार्त धर्माचे अविभाज्य अंग असलेल्या मूर्तीपूजेचे उद्गाते महायानी बौद्ध आहेत. विशेषत: सातव्या शतकापासून देवालये ही धार्मिक व राजकीय सत्तेची केंद्रे बनली. मध्ययुगीन आक्रमकांनी देवळांना लक्ष्य केल्याचे कारण येथे सापडते. देवळांत उत्तरेकडील नागर व दक्षिणेकडील द्रविड या दोन शैली आहेत. मात्र, पुराणांतील वर्णनांचा ऐतिहासिक पुराव्यांशी काहीही संबंध आढळत नाही. तसेच अकबराच्या दरबारात चित्रमय रामायण निर्मिले गेल्याचे सर्वश्रुत असले तरी साहिब्दीन नामक मुस्लीम कलाकाराने कर्मठ मेवाडमध्ये चित्रमय रामायण सजविले, असा मौलिक तपशील लेखकाने दिला आहे. अर्जुनाला गीतोपदेश करणाऱ्या रथधारी कृष्णाचे चित्र अनैतिहासिक असून हल्ली दिसणारे चित्र रामकृष्ण मिशनमुळे लोकप्रिय झाले. अवनिंद्रनाथ टागोर यांनी १९०५ साली बंगाली महिलेच्या स्वरूपात भारतमातेचे चित्र रंगविले. त्याचप्रमाणे ‘हिंदुजागृतीनंतर’ राम-लक्ष्मण, हनुमान अधिक आक्रमक दिसू लागले, असे सूक्ष्म निरीक्षण लेखकाने मांडले आहे.
अॅन्जेलिका मलिनर लिखित ‘कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग’ तसेच एरिक जॉन लॉट लिखित ‘श्रौत-स्मार्त धर्मातील दर्शने’ ही या ग्रंथातील सर्वात महत्त्वाची प्रकरणे आहेत. मानवी इतिहासात औद्योगिक क्रांतीपूर्वीचा काळ हा आध्यात्मिक मुक्तीचा समजला जातो. या दृष्टीने वैदिक काळात कर्म म्हणजे वैदिक कर्मकांड होय. उपनिषद काळात अविनाशी आत्मा देहात तात्पुरत्या निवासाला असल्याचे समजले जाई, तर ‘ब्रह्मन’ म्हणजे विश्वनिर्मितीचे असे मूळ कारण की जे इंद्रियातीत निरपेक्ष अशा चिरंतन अस्तित्वाने भारलेले आहे. ब्रह्मन, आत्मा व कर्म यांच्यातील संबंधांचे जंजाळ उभारण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालली असावी.
स्थूलमानाने प्रकृती व पुरुष यांच्या संयोगाने निर्मिती होते, असे सांगणारे सांख्य तत्त्वज्ञान हे ज्ञानमार्गाला महत्त्व देणारे असून पतंजलीच्या (४ थे शतक) योगसूत्रावर सांख्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव असल्याचे लेखिकेचे निरीक्षण आहे. जैनवादाने उपवासाचे कर्म करून मुक्तीचा मार्ग सांगितला, तर बौद्धवादाने कार्यकारणभाव सांगून कारणे नष्ट केल्यास कर्ममुक्ती मिळते, असे सांगितले.
इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स.चे पहिले शतक यादरम्यान रचल्या गेलेल्या भगवद्गीतेवर आधारित भक्ती हा मुक्तिमार्ग म्हणून सर्वात शेवटी आला. गीतेत भक्तियोग हा शब्द केवळ एकदाच आला असला तरी गीतेवरील भाष्यांत कर्म, ज्ञान व भक्तीचा उल्लेख केल्यामुळे भक्तिमार्ग सुप्रतिष्ठित झाला. डॉ. आंबेडकर यांना मात्र गीता म्हणजे बौद्धवादाच्या विरोधात उभी केलेली विविध विचारांची आघाडी वाटते. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करण्याचा गीतेतील उपदेश फळासाठी कर्म करण्याच्या वैदिक कर्मकांडाच्या विरोधात आहे, हे उघड आहे. भक्तिमार्गाचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे, मुमुक्षुंनी स्थानिक भाषांना प्राधान्य दिल्यामुळे संस्कृतचे महत्त्व लयाला गेले. परिणामी भाषेच्या परिघातील सर्व जातींचे जनसमुदाय भक्तिमार्गावर आरूढ होऊ शकले. हे अमान्य असणाऱ्या सनातनी ब्राह्मणांच्या संतापाला ज्ञानेश्वर, रविदास, तुकाराम असे विविध जातींचे संत बळी पडले. इस्लामी सुफी पंथाच्या अस्तित्वाने व संसर्गाने या भक्तिपंथाला वेगळा आयाम मिळवून दिला.
आधुनिक काळात विवेकानंद यांनी कर्मवाद, भक्तिवाद व ज्ञानवाद हे तिन्ही मार्ग मोक्षाप्रति नेणारे थेट व स्वतंत्र मार्ग असून ते ‘योगा’चे वेगेवेगळे प्रकार आहेत, असे विश्लेषण केले आहे. अशा विविध प्रकारच्या अर्थान्वयार्थामुळे श्रौत-स्मार्त धर्माचे एकच एक विशिष्ट असे तत्त्व निश्चित करणे जिकिरीचे झाले आहे. देवदेवतांविषयीची कुतूहलता व शुद्धतम स्वरूपातील गूढ चतन्याचे अस्तित्व, हे दर्शनशास्त्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत. या संदर्भात श्रौत-स्मार्त धर्म एकमुखाने बोलत नाही.
वेदकालात ब्रह्मन या शब्दाचा मूळ अर्थ बळीचे कर्मकांड व संबंधित मंत्रोच्चार यांच्याशी निगडित पवित्र शक्तीशी जोडला गेला आहे. पूर्वमीमांसा शाखेत याच पवित्र शक्तीला ‘अपूर्व’ असे म्हटले गेले आहे. क्षत्र म्हणजे स्त्री व ब्रह्मन म्हणजे पुरुष, असाही अर्थ आहे. प्रारंभीच्या उपनिषदांत, काही क्षत्रिय ऋषींनी पवित्र ब्रह्मनबाबत शंका उपस्थित करायला सुरुवात केली. वेदांत म्हणजे वेदांच्या शेवटी, नंतर आलेले असा अर्थ असला, तरी त्याचा अर्थ उपनिषदांच्या ब्रह्मसूत्रांत आलेले ज्ञान असाही घेतला जातो. हे ब्रह्मज्ञान वाचून नव्हे तर ऐकूनच प्राप्त होऊ शकते, म्हणून श्रुती व म्हणून श्रौत धर्म!
वैशाषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्व व उत्तर मीमांसा ही षड्दर्शने होत. त्यांचे परस्परांत मतभेद असले तरी महावीर, बुद्ध व चार्वाक या नास्तिकांचा विरोध हे त्यांच्यातील समान तत्त्व असल्याची टिप्पणी लेखकाने केली आहे. प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील या षड्दर्शनांचे विभाजन वर्णजात समर्थन या कसोटीवर करतात. कैवल्य म्हणजे दुसरेतिसरे काही नसून आत्म्याची सांसारिक इंद्रियांतून मुक्ती असून ते पतंजलीच्या योगदर्शनाचे सार आहे, तर न्यायदर्शनानुसार जगाचे रहाटगाडगे चालविण्यासाठी देवाची आवश्यकता आहे.
विशेषत: चार्वाक, महावीर, बुद्ध यांनी कर्मकांडासह त्याच्या अर्थाबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यातून बा कर्मकांडाऐवजी अंतर्गत शुद्धतेवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या श्रमण परंपरेचा सनातनी ब्राह्मणांशी संघर्ष उफाळून आला. शंकराचार्य व रामानुज दोघेही उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता यांना प्रमाण मानत असले तरी त्यांच्यात फरक आहे. ब्रह्मज्ञान हे श्रुतींच्या आधारे मिळू शकते, हे मान्य करणाऱ्या शंकराचार्यावर माध्यमिक बौद्धांचा प्रभाव होता. त्यांची व्यवहारिका ही अपराविद्या, तर परमाíथका पराविद्या असून जगाची माया व अविद्या शून्यामध्ये विलीन करायला ते तयार नाहीत. परंतु त्यांचे अंतिम ब्रह्मन हे निर्गुण व वर्णनातीत असल्याने ते ‘नति नति’ असे संबोधले जाऊ शकते. त्यांचे गुरू गौडपाद हे बौद्धच होते. म्हणून शंकराचार्याना ‘प्रच्छन्न बौद्ध’ म्हणतात. रामानुज वगरेंचा देव हा सत्, अनंत व आनंद असला तरी तो सगुण आहे. आश्चर्य म्हणजे तमिळनाडू व महाराष्ट्रातील भक्ती सगुण असून उत्तरेतील कबीराची मात्र निराकार आहे.
कृष्णभक्तीचा पाया म्हणजे वेदांताच्या प्रस्थान त्रयीतील महत्त्वाचा भाग समजली जाणारी गीता होय. प्रथमत: कनिष्ठ समजली जाणारी गीता नंतर हिंदूदर्शनाचे सर्वात प्रमाणभूत विवेचन म्हणून नावारूपास आली. भक्तिवादासही परमेश्वर, राजनीतीज्ञ, प्रियकर अशी अनेकविध रूपे धारण करणारा कृष्ण अधिक सोईस्कर होता. मूलत: संस्कृत भक्ती म्हणजे प्राकृत भत्ता असून त्याचा तत्कालीन अर्थ दासाचा वाटा असा होतो. कालौघात दासांचा भौतिक वाटा स्त्रीशूद्रादितिशूद्रांच्या आध्यात्मिक मुक्तीचे साधन झाला. ‘सब भूमी गोपाल की’ या आळवणीतून मुक्तीसाठी आसुसलेल्या कृष्णभक्तांच्या वेदनांचा विस्फोट ऐकू येतो. विषप्राशन करणाऱ्या मीरेच्या वेदनांसह सर्व भक्तांच्या विद्रोहाचा अंगार मध्ययुगीन भक्तिरसात थिजून जाणे अपरिहार्य होते. कार्यकारणभाव लक्षात न घेता भक्तिवादास टीकालक्ष्य करणाऱ्यांनी भक्ती शब्दाची ही ‘अनित्यता’ समजून घ्यायला हवी.
या प्रदीर्घ कालावधीत शासन-शोषणाची प्रमुख संस्था असलेल्या वर्ण-जातिसंस्थेबाबतचे मौन ही उत्तम संदर्भमूल्य असलेल्या या ग्रंथातील प्रमुख उणीव भासते. तसेच अन्वेषणप्रक्रियेच्या अभावामुळे कोणत्या भौतिक वास्तवामुळे श्रौत-स्मार्त धर्मात कर्मवादापासून भक्तिमार्गापर्यंत बदल होत गेले, याचाही बोध होत नाही.
पाश्चात्त्य नवप्रबोधनाचे तेज घेऊन आलेल्या इंग्रज राजवटीत महात्मा फुले व पुढे डॉ. आंबेडकर यांनी भौतिक मुक्ती देणाऱ्या आधुनिक जातिसंस्थानिर्मूलक चळवळीला आकार दिला. त्यामुळे श्रौत-स्मार्त धर्माचे सर्वागीण मूल्यमापन होऊ लागले आहे. कृष्णासह श्रौत-स्मार्त धर्माच्या सगळ्या नायकांची व त्यांच्या तत्त्वज्ञानाची खरी कसोटी आता लागणार आहे. अर्थात, श्रौत-स्मार्त धर्माचे मालक-कब्जेदारदेखील शांत बसलेले नाहीत. सनातनी वारशासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास संशोधन, व्यवस्थापन, प्रसार माध्यमे अशा आधुनिक अभ्यासशाखांच्या माध्यमातून त्यांनीही चढाईचे धोरण स्वीकारले आहे. श्रौत-स्मार्त धर्माच्या या आधुनिक स्वरूपाची चर्चा पुढील खंडात आली आहे.
(पूर्वार्ध)
- ‘हिंदूइझम इन इंडिया- द अर्ली पीरियड’
- संपादक : ग्रेग बेली
- मालिका संपादक : जॉफ्री ओडी
- प्रकाशक : सेज पब्लिकेशन
- पृष्ठे : २४८, किंमत : ६९५ रुपये
शुद्धोदन आहेर
ahersd26@gmail.com