उम्बतरे इको हा इटालियन लेखक इंग्रजीतही वाचकप्रिय झाला, इटलीत तर लेखकांचा मेरुमणी म्हणून अलीकडल्या काळात ओळखला गेला आणि अखेर वयाच्या ८४ व्या वर्षी- १९ फेब्रुवारी २०१६ रोजी वारला. तत्त्वज्ञान, मध्ययुगीन इतिहास, आज मानववर्तनशास्त्राचे स्वरूप आलेली मानववंशशास्त्र शाखा, भाषाशास्त्र आणि अर्थातच साहित्य/समीक्षा एवढे विषय त्याच्या अभ्यासाचे होते आणि त्याच्या दोन प्रचंड आकाराच्या घरांपैकी एकात ३०,००० आणि  एकात २०,००० ग्रंथ होते- ही माहिती तर आपल्याला विकिपीडियासुद्धा देतो.  त्याची राजकीय मतं तिखट आणि धारदार होती, हे मात्र ‘इन्व्हेंटिंग द एनिमी’ यासारखं त्याच्या निबंधांचं पुस्तक वाचूनच कळतं.  ‘न्यूयॉर्क शहरात एका पाकिस्तानी टॅक्सीवाल्यानं मला मी कुठला विचारलं. इटलीचा कळल्यावर तो म्हणतो, ‘अच्छा, मग शत्रू कोण तुमचा?’ अशी सुरुवात असलेल्या निबंधाचंही नाव ‘इन्व्हेंटिंग द एनिमी’ हेच आहे. त्या पुस्तकातले निबंध छान संवादी शैलीत आहेत.. पण अभ्यासकी वळणाचं किंवा थेट टीका मांडणारं लिखाणही उम्बतरे इको यांनी अमाप केलं. त्यापैकी काही इंग्रजीतही आलं.