ऐतिहासिक, पौराणिक पात्रांविषयी समाजमनात आकर्षण असते. अशा पात्रांभोवती रचलेले साहित्यही अनेकांना आकर्षित करत असते. मराठीत तर अशा पात्रांभोवती गुंफलेल्या चरित्रकादंबऱ्यांची एक लाटच काही दशकांपूर्वी येऊन गेली. त्या कादंबऱ्यांचे अनेकांनी स्वागत केले, काहींनी नाके मुरडली, तर काहींनी सपशेल दुर्लक्षच केले. परंतु वाचनव्यवहार अशा प्रतिक्रियांनी वा दुर्लक्षाने फारसा प्रभावित होत नाही, असेच म्हणावे लागेल. याचे कारण अशा कादंबऱ्या मराठीत वाचल्या गेल्या, नव्हे त्यांच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या आल्या, हेही आता स्पष्ट झाले आहे. मराठीतील वास्तववादी कादंबऱ्यांची तयार झालेली प्रथा एकीकडे, गोमटे कल्पित रचणाऱ्या कादंबऱ्या दुसरीकडे आणि या दोहोंमधून मधला मार्ग काढणाऱ्या पौराणिक-ऐतिहासिक कादंबऱ्या तिसरीकडे अशी त्रिभागणी आहे. या तिसऱ्या वर्गातील कादंबरीकारांमध्ये रणजित देसाई हे प्रमुख नाव. त्यांच्या कादंबऱ्यांचा मराठीत एक वाचकवर्ग आहे. त्यात आजही घट झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘श्रीमान योगी’ आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यावरील ‘स्वामी’ या त्यांच्या साठच्या दशकात लिहिलेल्या कादंबऱ्यांनी गेल्या तीनेक पिढय़ांचे वाचनरंजन केले. त्यापाठोपाठ आलेली त्यांची ‘राधेय’ ही महाभारतातील कर्ण या पात्राभोवती गुंफलेली कादंबरीही चर्चेत राहिली. कर्णाच्या मनाचा ठाव घेत लिहिलेली ही कादंबरी आता इंग्रजीत अनुवादित झाली आहे. हार्पर कॉलिन्स या प्रकाशनसंस्थेकडून प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीचे इंग्रजीतील शीर्षक आहे- ‘कर्ण : द ग्रेट वॉरियर’! याआधी ना. सं. इनामदार, व. पु. काळे, मिलिंद बोकील यांची पुस्तके आणि देसाई यांची ‘श्रीमान योगी’ही इंग्रजीत नेणारे विक्रांत पांडे यांनी हा अनुवाद केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karna the great warrior paperback by author ranjit desai author and vikrant pande zws