नोम चॉम्स्की हे नाव जगभर नेहमीच चर्चेत राहिले आहे. चॉम्स्की यांनी ऐन व्हिएतनाम-ज्वरात १९६७ मध्ये ‘न्यूयॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’मध्ये लिहिलेल्या ‘बुद्धिवंतांची जबाबदारी’ या निबंधाने या चर्चेची सुरुवात झाली. या निबंधात चॉम्स्की यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे विश्लेषण करतानाच बुद्धिवंतांचे दोन प्रकारही सांगितले होते. एक म्हणजे, राज्यसंस्थेच्या कृती व धोरणांना अंधपणे समर्थन देणारे बुद्धिवंत; तर दुसरे अशा कृती व धोरणांची मूल्यात्मक चिकित्सा करणारे. म्हणजे, चॉम्स्की यांनी दुसऱ्या प्रकारच्या बुद्धिवंतांची तेव्हाच्या जागतिक तणावाच्या परिस्थितीत निकडीची गरज असल्याचा सूर सुमारे अर्धशतकापूर्वी लावला होता. परिस्थिती बदलावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या, राज्यसंस्थेला खडे बोल सुनावण्याचे धाडस दाखवणाऱ्या बुद्धिवंतांची निकड आजही संपलेली नाही. खुद्द चॉम्स्की यांनी हे दुसऱ्या प्रकारचे बुद्धिवंतपण टिकवून धरले. याचे कारण, या निबंधापासून ते आजवरच्या त्यांच्या लिखाणातून त्यांनी राज्यसंस्थेच्या आणि ती चालवणाऱ्यांच्या चुका वेळोवेळी परखडपणे मांडल्या. व्हिएतनाम युद्धावर न थांबता इस्राइल-पॅलेस्टाइन वाद असो किंवा अमेरिकेच्या स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांबद्दलच्या उक्ती व कृतींतील फरक असो की, माध्यमांच्या धुरीणत्वाचा मुद्दा असो, अशा बाबींची रोखठोक चिकित्सा केली. त्यापैकी निवडक २३ लेखांचा (उपरोक्त निबंधासह) संग्रह ‘हू रूल्स द वर्ल्ड?’ या नावाने नुकताच प्रकाशित झाला आहे.

चॉम्स्की यांच्या वयाच्या ८७व्या वर्षी प्रकाशित झालेल्या या संग्रहात त्यांच्या आजवरच्या लेखनाचा धावता आढावा जसा येतो, तसेच ‘या जगावर सत्ता कुणाची?’ या प्रश्नाचेही उत्तर मिळते. हे उत्तर चॉम्स्की यांच्या वाचकांना त्यांच्या याआधीच्या लेखनातून परिचित असेलच. जगभर प्रभाव असणाऱ्या महाकाय वित्तीय संस्था, त्यांचे नियंत्रण करणारे देश आणि त्यातून जपला जाणारा साम्राज्यवाद हेच जागतिक व्यवस्था घडवतात आणि बिघडवतात, अशा सोप्या शब्दांत ते सांगताही येते. परंतु चॉम्स्की यांच्या लेखनातून त्याचे ऐतिहासिक तपशील व त्यांच्या सातत्याचे पुरावे मिळत जातात. जागतिक व्यवस्थेचे विश्लेषण करताना चॉम्स्कींनी तीन भाग गृहीत धरले आहेत. ते म्हणजे- पूर्व युरोप, पूर्व आशिया व इस्लामी जग. रशियाचा युक्रेन व सीरियामधील हस्तक्षेप किंवा चीनची त्याच्या आजूबाजूच्या सागरी क्षेत्रांवर असलेली नजर यामुळे पूर्व युरोप व पूर्व आशियात तणावाची व परस्पर वर्चस्वाची स्पर्धा सुरू  झाली. मुख्य म्हणजे यातून अमेरिकेचे जागतिक स्थान डळमळीत होणे, तर दुसऱ्या बाजूला ‘दहशतवादाविरुद्ध युद्ध’ या अमेरिका पुरस्कृत नीतीने इस्लामी जगतात ओढवलेले अराजक- अशी काहीशी आजची जागतिक परिस्थिती आहे. अशा वेळी ‘वर्चस्वाच्या स्पर्धेविरुद्ध आवाज उठविणे हाच विवेकी पर्याय’ असल्याचे चॉम्स्की यांचे म्हणणे आहे. याशिवाय आण्विक युद्धे व जागतिक तापमानवाढ या दोन महत्त्वाच्या समस्यांबद्दलही त्यांचे चिंतन यात येते.

परंतु अशा प्रकारचे बरेचसे लेखन चॉम्स्कींनी याआधीही केलेले आहे. त्यापेक्षा निराळे यात काय, असाही प्रश्न वाचकांकडून विचारला जाऊ शकतो. आणि तो उचितही ठरेल. चॉम्स्की यांना ५० वर्षे एकाच सुरात बोलावे लागले, कुणाला एकसुरी वाटू शकणारी टीका करावी लागली, हे जरी यातून समोर येत असले तरी चॉम्स्की यांनी चर्चेला सुरुवात करून दिली आहे. बुद्धिवंतांत त्यांनी अस्वस्थता पेरली आहे. त्या अस्वस्थतेच्या मूळ कारणांकडे लक्ष वेधणे हाच या पुस्तकाचा हेतू असावा.