पुठ्ठाबांधणीच्या पुस्तकांपेक्षा पेपरबॅक पुस्तके हाताळायलाही सुलभ आणि किमतीतही कमी. त्यामुळे अनेक जण पुस्तकांची पेपरबॅक आवृत्ती येण्याची वाट पाहात असतात. युरोप-अमेरिकेत ही पेपरबॅक संस्कृती रुळली होतीच, पण भारतात, गंभीर विषयावरची अनेक भारतीय पुस्तके मात्र पुठ्ठाबांधणीतच बंदिस्त राहिली. मागच्या काही वर्षांत भारतीय लेखकांच्या पुस्तकांनाही पेपरबॅकचे पंख फुटू लागले. येत्या ऑक्टोबरात ‘पेंग्विन’ प्रकाशनाकडून चार पुस्तकांच्या पेपरबॅक आवृत्ती प्रकाशित होत आहेत. मकरंद परांजपे लिखित ‘डेथ अॅण्ड अफ्टरलाइफ ऑफ महात्मा गांधी’, टी. एन. नायनन यांचे ‘टर्न ऑफ द टॉर्टाइज’, पीयूष पांडे यांचे ‘पांडेमोनियम’ आणि सॅम पित्रोदा (व डेव्हिड चनॉफ) लिखित ‘ड्रिमिंग बिग -माय जर्नी टू कनेक्ट इंडिया’ ही ती चार पुस्तके.
ही नावे वाचल्यावर बुकमार्कच्या वाचकांना एक गोष्ट ध्यानात आली असेलच, ती म्हणजे या चारपैकी तीन पुस्तकांवर ‘बुकमार्क’ने आधीच लिहिले आहे. गांधीहत्या आणि तिला गीतेच्या तत्त्वज्ञानाचा आधार देत समर्थन करणे कसे चुकीचे आहे हे दाखवून देणाऱ्या मकरंद परांजपे यांच्या पुस्तकावर डॉ. विवेक कोरडे यांनी २८ मार्च, २०१५ रोजी बुकमार्कमध्ये परीक्षण लिहिले होते. त्या परीक्षणात त्यांनी, ज्यांना गांधीहत्या घृणास्पद कृत्य वाटते, ती घृणा नेमकी कशाची करावी आणि जे गांधीहत्या हे एक परमपवित्र कृत्य समजतात, त्यांना ती कृती कशी िहदू संस्कृतीविरोधी, गीताविरोधी आहे हे समजून घेण्यासाठी ‘डेथ अॅण्ड अफ्टरलाइफ..’ या पुस्तकाची शिफारस केली होती. ५९९ रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाची आता पेपरबॅकमधील किंमत मात्र ३९९ रुपये आहे. हीच बाब टी. एन. नायनन यांच्या पुस्तकाबद्दल. भारताची आर्थिक प्रगती व तिचे राजकीय अर्थशास्त्र मांडणाऱ्या या पुस्तकाच्या २३ जानेवारी २०१६ रोजी सचिन रोहेकर यांनी केलेल्या परीक्षणात सध्याच्या अर्थव्यवस्थेची कासवगती मान्य करा, असे परखडपणे सांगून उपाय शोधणारे हे पुस्तक असल्याचे म्हटले होते. तेव्हा ६९९ रुपये इतकी किंमत असलेले हे पुस्तक आता ४९९ रुपयांत मिळणार आहे. पीयूष पांडे या अॅड मॅनच्या आत्मकथनावर ७ नोव्हेंबर २०१५ रोजी अरुंधती जोशी यांनी लिहिलेल्या परीक्षणात त्या पुस्तकाच्या रंजकपणाविषयी तर लिहिलेच आहे, पण लेखकाने केलेले कथन हे हातचे राखून असल्याचेही अधोरेखित केले होते. ७९९ रुपये किमतीचे हे पुस्तक पेपरबॅकमध्ये मात्र ४९९ रुपयांत मिळणार आहे. याशिवाय आयुष्यातील चढ-उतारांकडे सकारात्मकतेने पाहावे हे सांगणारे सॅम पित्रोदांचे ‘ड्रीमिंग बिग..’ हे आत्मकथनही पेपरबॅकमध्ये येत असून त्याची किंमत ३९९ रुपये इतकी आहे. यापैकी पहिली दोन पुस्तके ही तशी गंभीर, वैचारिक पठडीतील आहेत, तर उर्वरित दोन आत्मपर. या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांना वाचकांची पसंती मिळत असल्याचे त्यांच्या पेपरबॅक आवृत्तीच्या घोषणेने जसे अधोरेखित झाले, तसेच पेपरबॅकला भारतीय वाचक सरावत असल्याचेही.