‘प्रकाशवाणी’ हा पुलंचा शब्द मराठीत वापरात आला तो ‘नाइन्टीन एटी फोर’ या कादंबरीच्या अनुवादात! पण ऑर्वेलच्या लेखणीतील निबंधप्रकाश मराठीत फारसा झिरपलाच नाही. ती उणीव सशक्तपणे भरून काढणारे हे नवे पाक्षिक सदर..

जॉर्ज ऑर्वेल म्हटले, की डोळ्यासमोर उभी राहतात रायफलमधून लक्ष्याकडे झेपावणाऱ्या गोळीसारखी त्याची खणखणीत वाक्ये – ‘सर्व जण समान आहेत, पण काही जण जास्त समान आहेत’.. ‘जो भूतकाळाचे नियंत्रण करतो तो भविष्याचेही नियंत्रण करतो’.. ‘जो वर्तमानाचे नियंत्रण करतो तो भूतकाळाचेही नियंत्रण करतो’.. ‘युद्ध म्हणजेच शांतता, स्वातंत्र्य म्हणजेच गुलामी, अज्ञान हीच शक्ती’.. ‘स्वातंत्र्याचा काही अर्थ असलाच तर तो म्हणजे लोकांना जे ऐकण्याची इच्छा नाही ते त्यांना सांगण्याचा अधिकार’ – मानवी समाजाबद्दल थोडक्यात पण नेमके भाष्य करणारी.. अर्थात, एखादा विशिष्ट मुद्दा अचूकपणे मांडणारी ही विधाने विचारपूर्वक विश्लेषणाला पर्याय नसून चिकित्सेची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणारी संप्रेरके आहेत. त्यांच्यामागे अनेक विरोधाभास आणि विचारधारांची (आयडियालॉजी) आडवळणे लपलेली आहेत.

ऑर्वेलचे (म्हणजेच एरिक ब्लेअरचे, जॉर्ज ऑर्वेल हे त्याचे टोपणनाव) आयुष्यच अनेक विरोधाभासांनी आणि संघर्षांने भरलेले होते. बर्मीज पोलीस दलात ब्रिटिश साम्राज्याची चाकरी करताना कराव्या लागणाऱ्या साम्राज्यवादाच्या ‘डर्टी वर्क’ला, म्हणजेच ‘स्थानिकांवरील अत्याचारां’ना कंटाळून ऑर्वेलने नोकरीचा राजीनामा दिला आणि लेखक-पत्रकार होण्याच्या इराद्याने तो इंग्लंडला परतला. १९३० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या ‘डाऊन अ‍ॅण्ड आऊट इन पॅरिस अ‍ॅण्ड लंडन’, ‘रोड टू वायगन पिअर’ आणि ‘होमेज टू कॅटालोनिया’ या तीन पुस्तकांतून ऑर्वेलने आपल्यातील लेखकाला मानवणारा ‘रिपोर्ताज’चा फॉर्म सिद्ध केला. या पुस्तकांच्या निमित्ताने त्याला जसे सामाजिक उतरंडीच्या तळाशी असलेल्यांचे अनुभव जगता आले, तसेच १९२९ च्या आर्थिक महामंदीत उद्ध्वस्त झालेल्या कामगारांची वाताहतही जवळून पाहता आली. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धाची नांदी ठरलेल्या स्पेनमधील यादवी युद्धातल्या समाजवादी क्रांतिकारी गटांमधील संघर्षांचा साक्षीदार होता आले. या प्रक्रियेत एटॉनच्या उच्चभ्रू परंपरेत तयार झालेल्या एरिक ब्लेअरचा बंडखोर ‘जॉर्ज ऑर्वेल’ झाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बीबीसीसाठी काम करताना ऑर्वेलचे लक्ष ‘प्रसारमाध्यमे आणि प्रचारतंत्र’ (propaganda) या विसाव्या शतकातील महत्त्वाच्या घडामोडीकडे वेधले गेले, ज्यातून ‘अ‍ॅनिमल फार्म’ आणि ‘नाइन्टीन एटी फोर’ या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांनी आकार घेतला. मात्र समाजवादाच्या एकाधिकारशाहीत होणाऱ्या रूपांतराला विरोध करतानाच ऑर्वेल खुल्या लोकशाही समाजवादाचा समर्थक होता, हे लक्षात न घेता बऱ्याचदा त्यांचा वापर कोणत्याही परिवर्तनवादी विचारांविषयी घबराट निर्माण करण्यासाठी केला गेला. ऑर्वेलच्या कादंबऱ्यांच्या अशा वापराची छाया त्याचे निबंध आणि वृत्तपत्रीय लेखनावरही पडली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पत्रकार आणि कादंबरीकार म्हणून ऑर्वेलचा कोणत्या दिशेने प्रवास झाला असता याचा फक्त अंदाज बांधला जाऊ  शकतो. कारण १९५० साली वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी त्याचा क्षयाने अकाली अंत झाला.

१९३० पासून ऑर्वेल सतत लिहीत होता. कधी निबंध, कधी अमेरिकन वृत्तपत्रांतील लेख, कधी ‘ट्रायब्यून’ या डाव्या विचारसरणीच्या ब्रिटिश नियतकालिकातील लिखाण, तर कधी कोस्लर, वुडकॉक इत्यादी लेखकमित्रांना पत्रे.. या सर्व लेखनाचे चार खंड त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी सोनिया ऑर्वेल आणि इयन आंगस यांनी संपादित करून प्रसिद्ध केले. या संग्रहातील काही निवडक निबंध आपल्या आजच्या समस्यांशीदेखील कसे भिडतात हे पाहणे उद्बोधक ठरेल. ऑर्वेलचे व्यक्तिमत्त्व, त्याची कारकीर्द आणि त्याचे लिखाण यांच्यातील विरोधाभास समजून घेतल्यास त्याचे गद्यलेखन एका संतुलित दृष्टिकोनापर्यंत पोहोचण्याचा निकराचा प्रयत्न होता, हे लक्षात येते. खरे तर हे विरोधाभास एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यांतून एकूणच आधुनिक यंत्रसंस्कृतीमधील अंतर्विरोध प्रकट होतात आणि म्हणूनच ऑर्वेल हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक ठरतो.

ऑर्वेल स्टालिनवादी कम्युनिझमचा कडवा विरोधक होता हे जितके खरे आहे तितकाच तो लोकशाही समाजवादाचा पुरस्कर्ता होता हेही खरे आहे. पण शीतयुद्धाच्या धामधुमीत हा मुद्दा लक्षात घ्यायला ना कुणाला वेळ होता, ना इच्छा. १९४५ साली ऑर्वेलला युरोपसमोर अमेरिकन वर्चस्व टाळण्याचा एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे ब्रिटनसहित ‘सोशलिस्ट युनायटेड स्टेट्स ऑफ युरोप’ स्थापन होणे. आज ऑर्वेलचा देश ब्रेक्झिटचा पर्याय स्वीकारून युरोपीय संघातून बाहेर पडत असताना ही आठवण फारच महत्त्वाची ठरते. ऑर्वेलची भूमिका भांडवलशाहीतील विषमता आणि कम्युनिझममधील एकाधिकारशाही दोन्ही टाळणाऱ्या लोकशाही समाजवाद्याची होती. येणाऱ्या काळात हा पर्यायही विरोधाभासांनी भरलेला असेल याची ऑर्वेलला कल्पनाही येणे शक्य नव्हते.

साम्राज्यवादाचा कट्टर विरोधक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ऑर्वेलने साम्राज्यवादी जोखडाखाली असलेल्या बर्मा आणि भारत या ठिकाणच्या साम्राज्यवादविरोधी चळवळींमागील राजकारणाचे खोलात जाऊन विश्लेषण केलेले दिसत नाही. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याने अशी नि:संदिग्ध मांडणी केली की- ‘ब्रिटिश कामगारवर्गाचा (proletariat) सर्वात मोठा भाग आशिया-आफ्रिकेत राहतो, ज्यामुळे हिटलरलाही साधता आला नाही इतका कमी मजुरीचा दर ब्रिटन वसाहतींवर लादू शकत होते.’ म्हणजेच ब्रिटिशांची सुबत्ता पिळवणुकीच्या व्यवस्थेवर अवलंबून होती, हे ऑर्वेलने स्पष्ट केले.

या शोषित वर्गाचा ब्रिटनमधील प्रतिनिधी म्हणून ब्रिटिश कामगारवर्गाबद्दल ऑर्वेलला सहानुभूती वाटू लागली आणि तो डाव्या विचारांकडे वळला. मात्र त्याची मांडणी समाजवादाच्या शास्त्रीय सिद्धांतांपेक्षा ‘सर्वसामान्य समज’ (common sense) आणि ‘सभ्यता’ (decency) यांवर आधारित होती. कधी कधी तो एकूणच यंत्रसंस्कृतीला विरोध करतो आहे असे दिसून येते, तर त्याच वेळी त्याला यंत्रयुगापूर्वीची परिस्थिती आणणे भोळसटपणा वाटतो हेही स्पष्ट होते. याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे, विल्यम मॉरीस या एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश समाजवादी लेखकाबद्दलची त्याची मते. ऑर्वेलची नेमकी भूमिका अशा वेळी स्पष्ट होत नाही. त्याच्या विचारांत अराजकतावादाची (anarchism) झाक दिसून येते आणि प्रस्थापितांना- मग ते भांडवलशाहीवादी असोत की समाजवादी- प्रश्न विचारण्याची वृत्ती दिसून येते.

कामगारवर्गाच्या आवडीच्या आणि लोकप्रिय असलेल्या साहित्य आणि कला यांना त्यांचे स्थान दिलेच पाहिजे, असे म्हणणाऱ्या ऑर्वेलला स्वत: मात्र जेम्स जॉईससारख्या आधुनिकतावाद्यांप्रमाणे लिहावे असे वाटे. राजकीय लिखाणाला महत्त्वाची कला बनविणे हे उद्दिष्ट समोर ठेवतानाच, ऑर्वेलला आपण इतिहासाच्या रेटय़ामुळे रूपवादी ‘शुद्ध’ लेखक होऊ  शकत नाही ही खंतही होती. मात्र महत्त्वाची गोष्ट ही की, त्याच्या दृष्टीने साहित्य हे समाजाचा प्रवास समजून घेण्याचे, त्याला प्रतिसाद देण्याचे साधन होते. ऑर्वेलच्या मनात सुरू असलेले वेगवेगळ्या भूमिकांमधील वादविवाद त्याच्या पत्रकारितेत आणि निबंधांत स्पष्ट दिसतात. म्हणूनच हे लिखाण कुठल्या तरी एका निश्चित भूमिकेची भलामण करणारे न ठरता लेखकाने घेतलेल्या भूमिकेपलीकडे चिकित्सकपणे जाण्यासाठी वाचकाला प्रवृत्त करणारे ठरते.

रोखठोक तरीही विचारी शैलीमुळे लक्षवेधक ठरणारे ऑर्वेलचे लेख साहित्यव्यवहार आणि राजकारण यांना विविध अंगांनी स्पर्श करतात. यांत ‘साहित्यास प्रतिबंध’सारखे विचारस्वातंत्र्याशी निगडित लेख, ‘मी का लिहितो’सारखे स्वत:ची भूमिका तपासणारे लेख, ‘पुस्तकांच्या दुकानातील आठवणी’ यांसारखे अनुभवकथन, डिकन्स आणि टॉलस्टॉय यांसारख्या लेखकांबद्दलचे लेख आणि ‘सुखाची नंदनवने’सारखे चंगळवादाचे भविष्य चितारणारे लेख आदींचा समावेश होतो. यांत लक्षणीय ठरतात त्याचे ‘जेम्स बर्नहॅम आणि व्यवस्थापकीय क्रांती’ यांसारखे आर्थिक-राजकीय विश्लेषण करणारे लेख. ऑर्वेलच्या कादंबऱ्यांतील सत्य आणि कल्पित (fact and fiction) यांतील द्वंद्व त्याच्या निबंधांच्या संदर्भात पाहिल्यास अधिक चांगले समजून घेता येते.

आज ऑर्वेलच्या गद्य लिखाणाकडे वळताना त्याला ‘द्रष्टा’ ठरविणे किंवा त्याचे लिखाण ‘सत्य’ सांगणारे आणि पूर्ण ‘पारदर्शी’ होते हे दाखवून देणे हा या लेखमालेचा हेतू नाही. तसेच ऑर्वेलने केलेल्या युक्तिवादांना विचार करण्याची योग्य पद्धत म्हणून उचलून धरणे हाही उद्देश इथे नाही. ऑर्वेलचे निबंधात्मक साहित्य ही एका संघर्षमय प्रवासातून झालेली विचारप्रवर्तक निर्मिती आहे. हे साहित्य साध्या-सोप्या भाषेतून आणि कोणत्याही साहित्यिक अभिनिवेशाशिवाय आपल्या आजच्या प्रश्नांनाही कसे भिडते आणि आपल्याला स्वतंत्र विचार करायला कसे प्रवृत्त करते, हे शोधण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. ऑर्वेलच्या निबंधलेखनाचा जिवंतपणा अनुभवणे आणि आजच्या ‘प्रचारकी’ युगात आपली विचारशक्ती जागृत ठेवण्यासाठी आवश्यक असणारे वैचारिक आणि भौतिक संघर्ष समजून घेणे असा दुहेरी उद्देश या सदरामागे आहे.

डॉ. मनोज पाथरकर manojrm074@gmail.com