एकीकडे कमालीचा तिरस्कार तर त्याच वेळी कणव व आपुलकी अशा दुहेरी स्तरावर जर्मन लेखक ग्युंटर ग्रास यांनी भारताशी आपले नाते जपले. त्यांच्या लिखाणातून हे दिसून येतेच. ‘द फ्लाउंडर’, ‘हेडबर्थस्- ऑर, द जर्मन्स आर डाइंग आऊट’ या कादंबऱ्यांतून भारताचे प्रतिबिंब उमटले आहेच, पण त्यानंतर आलेले ‘शो युवर टंग’ हे पुस्तक त्यांच्या कोलकात्यातील सुमारे सहा महिन्यांच्या वास्तव्यावर आधारित आहे. त्यात त्यांनी कोलकाता शहरातील विषमतेचे, गरिबीचे चित्रण केले होते.. येत्या १३ एप्रिलला ग्रास यांच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या या पुस्तकाविषयी..
जे बोललं जायलाच हवं!
मी का गप्प बसतो, का झाकून ठेवतो दीर्घकाळ
जे निखळ वास्तव आहे आणि वापरलं जातं
खेळात युद्धाच्या, ज्याच्या अखेरी आपण जगले-वाचलेले लोक
उरतो फार तर तळटिपांइतपत..
२०१२ साली इस्रायलमध्ये ग्युंटर ग्रास यांच्या एका परखड कवितेवरून प्रचंड वादळ उठलं. या कवितेत इस्रायलवर झंझावाती टीका करण्यात आली होती. इस्रायल हे इराणइतकंच सत्तापिपासू आणि धर्माध आहे असा सूर या कवितेत आहे आणि हे दिसत असताना जर्मनीने मानवतावादी दृष्टिकोनातून इस्रायलला अणुशक्ती-पाणबुडय़ा पुरवणं बंद करावं, अशी भूमिका ग्रास यांनी घेतली होती. ही कविता वाचनात आली आणि गेली काही र्वष वेगवेगळ्या देशांतील घटनाक्रमांच्या निमित्तानं पुन:पुन्हा भेटत राहिली, तिचं औचित्य, साहित्यिक मूल्य आणि कवीची सामाजिक बांधिलकी हा एका दुसऱ्या लेखाचा विषय होऊ शकतो. १३ एप्रिलला ग्युंटर ग्रास यांच्या मृत्यूला दोन र्वष पूर्ण होतील. साहित्य आणि कलांच्या विविध प्रांतांत त्यांचा लीलया वावर होताच, पण एक विचक्षक तत्त्ववेत्ता, गाढा विद्वान, विचारवंत आणि मानवतावादी म्हणूनही त्यांचा लौकिक होता. ग्रास यांच्या समग्र साहित्य आणि कलानिर्मितीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या पदरांचं लख्ख प्रतििबब पडलेलं आढळतं. या सगळ्याचा परामर्श एका लेखात घेणं शक्यच नाही. हा एक लहानसा प्रयत्न आहे, त्यांच्या साहित्यिक दृष्टिकोनाचा परिचय करून देण्याचा, भारताशी, कोलकात्याशी असलेल्या त्यांच्या नात्याचा मागोवा घेण्याचा.
कॅट अॅण्ड माऊस, डॉग इयर्स, द मीटिंग अॅट टेल्गटं, द रॅट, माय सेंच्युरी, क्रॅबवॉक, द फ्लाउंडर, पीिलग द अनियन या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. या कादंबऱ्यांमध्ये वर्तमानातल्या राजकीय घटना आणि सामाजिक बदल यांचं चित्रण दिसून आलं. पूर्व जर्मनीमधला १९५३ सालचा विद्रोही लढा आणि बुद्धिजीवी जनांची त्यातली भूमिका असो किंवा १९६८ सालचं विद्यार्थ्यांचं आंदोलन, संसदीय निवडणुकांसाठीचा चाललेला प्रचार किंवा जर्मन जनतेच्या भविष्याशी निगडित मुद्दे असोत, फार काय, अगदी बाल्टिक समुद्रात बुडलेल्या शरणागत निर्वासितांच्या जहाजाचा विषय असो- ग्युंटर ग्रास यांची लेखणी या सगळ्या घटनांचं विश्लेषण करीत निर्भीडपणे तळपत राहिली.
जन्मापासून एका निर्वासिताचा आत्मा या लेखकाच्या देहात होता. नाझी भूतकाळाशी त्याचं टाळता न येण्याजोगं नातं होतं. वयाच्या सतराव्या वर्षी दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी राजवटीत त्यांना सक्तीनं वाफेन् एस एसमध्ये शस्त्र धारण करावं लागलं हे धक्कादायक वास्तव जगासमोर आलं २००६ साली. त्यांच्या विवेकवादी प्रतिमेला मोठा तडा गेला. पण याचा त्यांना पश्चात्ताप वाटला असावा असं कुठे जाणवत नाही. उलट, दुसऱ्या महायुद्धानंतर जे जर्मन लेखक एका आंतरराष्ट्रीय पातळीवर लिहिते झाले, त्यात ग्रास यांचा समावेश होतो. जागतिक पातळीवरचे घटनाक्रम, त्यामुळे घडून येणारे अपरिहार्य सामाजिक बदल, वेगवेगळ्या प्रतलांवरील राजकीय घडामोडी या सर्वाचे परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर होत असतातच, पण एखाद्या शोभादर्शकाप्रमाणे या सर्व घटकांचे एकमेकांशी नाते जुळत असते, बदलत असते, संस्कृतीच्या पायवाटा राजमार्गात परिवíतत होतात, व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्परावलंबी बंध वेगवेगळ्या विणीत खुलत असतात, कधी काचतात, कधी रुततात, कधी जीवघेणे फास बनतात, पण यातून एक जीवनेच्छा, एक लढाऊ वृत्ती आणि आयुष्याशी डोळा भिडविण्याची शक्ती माणसाला तारून नेत असते. ती कधी एक प्रखर आत्मीय जाणीव असते, तर कधी एक अपार श्रद्धा बनून जीवन िशपून टाकते आणि आयुष्यभराच्या रखरखीत वाळवंटात काही हिरवे अप्रूप शोधायला उद्युक्त करते. असा संवेदनाक्षम लेखक कायम विचक्षक दृष्टीने आणि तत्त्ववेत्त्याच्या तटस्थपणे जगाकडे पाहतो, म्हणूनच त्याला आयुष्याचे नवे नवे अर्थ कळत जातात.
ग्युंटर ग्रास यांच्या पुस्तकांची अनेक भाषांत रूपांतरे झाली, त्यावर चित्रपट निघाले. ‘द टिन ड्रम’ ही त्यांची अतिशय लोकप्रिय कादंबरी तुम्हाला ठाऊक असेलच, त्यावर श्लोन्डोर्फ यांनी केलेला चित्रपट तितकाच उच्च प्रतीचा. त्यांच्या प्रतिभाविष्काराचा यथोचित गौरव करणारी अनेक पारितोषिके त्यांना लाभली आणि नोबेल पारितोषिकाने त्यावर कळस चढवला. सारे काही एका प्रतिभावंताच्या प्रवासास साजेसेच. कवी, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिल्पकार – सर्जनाच्या विविध दालनांत लीलया विहार करणारी ग्रास यांची प्रतिभा. केवळ सौंदर्याचे उदात्तीकरण आणि मानवी भावनांचे भोळे अलंकारिक, पारंपरिक चित्रण करण्यात ती अडकून पडलेली नाही. एक निर्मम आशावाद त्यांच्या साहित्यातून निर्वविादपणे प्रत्ययास येतो, पण तो एका नश्वर आणि क्षणभंगुर जगातले विनाशाचे, विध्वंसाचे सुरुंग चुकवत, वाट शोधत पृष्ठभागावर येत असतो.
१९९९ सालचे नोबेल पारितोषिक विजेत्या ग्रासचे भारतीय मानसिकतेशी, संस्कृतीशी, इथल्या सामाजिक जडणघडणीशी एक अंतरंग नाते जुळत गेलेले आहे. ते त्यांच्या साहित्यातून प्रकर्षांने उमटत गेले आहे. १९७५ साली ग्रास पहिल्यांदा भारतात आले ते भारतीय सरकारच्या निमंत्रणावरून आणि त्यानंतर एका धारदार संवेदनेने त्यांना या देशाशी, विशेषत: कोलकाता या शहराशी कायमचं बांधून टाकलं. ‘द फ्लाउंडर’ या पुस्तकात त्यांनी कोलकाता शहराचं केलेलं वर्णन केवळ निर्भर्त्सना, घृणा आणि किळस यांनी भरलेलं आहे. एकीकडे कमालीचा तिरस्कार आणि दुसरीकडे कणव आणि आपुलकी असा हा अनाकलनीय ऋणानुबंध! १९८६-८७ साली तत्कालीन जर्मनीत घडू पाहणाऱ्या सामाजिक आणि राजकीय उलथापालथीच्या चाहुलीने उद्विग्न होऊन त्यांनी जर्मनीपासून जरा दूर राहणं पसंत केलं, तेव्हा ते परत कोलकात्याला आले. १९८७-८८ मध्ये त्यांनी सहा महिने कोलकाता येथे राहून जे काही अनुभवलं, ते त्यांच्या साहित्यात पडसाद उमटवत गेलेले आहेच, पण साहित्यविश्वात विशेष महत्त्वाचे ठरले ते त्यांचे या अनुभवावरचे लेखन ‘शो युवर टंग’. एकीकडे हे शीर्षक ‘जीभ काढणे’ अशा अर्थाचे आहे, भारतीय संदर्भात आपली काही चूक झाली, कसली शरम वाटली, तर आपण जीभ काढतो; तर दुसरीकडे सर्वसंहारक कालीमातेच्या जिव्हेशी हा संदर्भ जाऊन भिडतो. लालभडक लवलवती जीभ आणि गळ्याभोवती नररुंडमाला अशा स्वरूपातल्या कालीमातेचे बंगाली संस्कृतीत काय स्थान आहे हे येथे वेगळे सांगायला नकोच. १९८७-८८ साली त्यांच्या ‘द प्लेबिअन’ या नाटकाचे बंगाली भाषेत सादरीकरण होणार होते म्हणून, ग्रास आणि त्यांची पत्नी ऊटं यांनी कोलकाता येथे दीर्घकाल वास्तव्य केले. त्या काळात त्यांच्या प्रतिभेला हे शापित तरीही एका अंधूक परीकथेच्या सीमारेषेवर रेंगाळणारे शहर जसे दिसले, भावले आणि जाणवले, त्याचा हा प्रामाणिक आणि उत्कट आविष्कार आहे. त्यात रोजनिशीच्या धर्तीवर त्या सहा महिन्यांतल्या वास्तव्यातील दैनंदिन व्यवहारांचे तपशीलवार वर्णन, विवेचन आणि विश्लेषण आहे, एक बारा कडव्यांची कविता आहे आणि ११२ अभिव्यंजनावादी (एक्सप्रेशनिस्ट) पेन-इंक रेखाटने.
कोलकाता हे शहर आहे मदर तेरेसांचे, सुभाषचंद्र बोस यांचे, कििप्लगला येथे भयानक रात्रीचे काळे विवर दिसते, डॉमिनिक लापीएरसाठी हे आनंदानुभवाचे शहर – सिटी ऑफ जॉय – आहे. ग्रासला हे शहर कशा रीतीने भेटले हे या पुस्तकातून सामोरे येते. कराल कालीमाता- रक्ताळलेली जिव्हा बाहेर काढून संहाराचा शंख फुंकणारे या देवीचे रूप, हे या पुस्तकाचे शीर्षक आहे. पुस्तकाच्या विषयाचा आवाका जरी व्यापक असला तरी त्याचे कथाबीजरूप अगदी साधेसुधे, वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. ग्रास यांचा एका परदेशातील वास्तव्यात, तेथील अनुभूतींच्या विश्वात स्वत:पासून स्वत:कडे झालेला एक मूलभूत प्रवास आणि त्या वाटेत भेटणारे कलात्मक प्रगतीचे िबदू हे या पुस्तकाचे वैशिष्टय़.
साहित्यिकदृष्टय़ा हे पुस्तक फार मोलाचे नसेल कदाचित, पण आयुष्याच्या फार जवळ जाणारे आहे. ग्रासचे भारतावर आंधळे प्रेम नाही आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे उमाळे फुटून त्याचे जयकीर्तन करण्याचा त्यांचा साहित्यिक स्वभाव नव्हता. कोलकात्यासमोर एक अंतर्वक्र आरसा धरून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांचा स्थायिभाव होता- जसे वाटते तसे लिहिणे. या पुस्तकातील वर्णन किती तटस्थ आणि वास्तववादी आहे याची एक छोटीशी झलक :
कचरा आणि काली
घरच्या वाटेवरचा नेहमीचा प्रवास. दाटीवाटीच्या घरांतून वाट काढत, कचऱ्याचे अजस्र ढिगारे, त्यांवर चढाई करून कचरा चिवडणारी मुले, डाव्या आणि उजव्या बाजूला बजबजलेल्या झोपडपट्टय़ा.. आज रविवारचा मूड आहे इथे. खोपटांवर कपडे वाळत आहेत, दात घासण्याचा एक सार्वजनिक कार्यक्रमच चालू आहे, रेल्वेच्या रुळांवर प्रातर्वधिी उरकायला उकिडवे बसलेल्या लोकांच्या तशातही गप्पा चालूच आहेत. अगदी नखभर मोकळी जागा दिसली रे दिसली, की लगेच तिथे प्रकट होतात वाळत घातलेले काथ्याचे दोरखंड. घाणेरडय़ा वासापासून असह्य़ दरुगधीपर्यंतचा न विसरता येणारा हा त्रिकोण. डावीकडे िभतीत चिणल्यासारखे चायना टाऊन, त्यातले लेदरचे कारखाने, उजवीकडे कलकत्त्याचा बोटिंग रेझोर्ट, तळ्यामध्ये पडेल बोटी, इतर करमणुकीची साधने आणि जणू हाक मारून बोलावणारे सुबक लाकडी कठडे.. आणि त्याच तळ्याच्या दुसऱ्या काठाला एक अवाढव्य भट्टी पेटलेली. त्या विस्तवावर चिंध्या-चिरगुटे उकळली जात आहेत, कचरा चिवडून मिळवलेले धन आहे ते. तळ्यापलीकडे धापा या वसाहतीची हद्द सुरू होते. सुरुवातीला समतल जमीन, थोडीफार सपाट केलेली. मग नुकत्याच गोळा केलेल्या कचऱ्याचे वाहणारे ढीग, डोंगर होत साठत गेलेले. कुठे काही गोलाकार, कुठे तीक्ष्ण कडांचे काही, कुठे खोल खड्डे, त्यावर घिरटय़ा घालणारी गिधाडे, कावळे आणि या साऱ्या नरकप्राय कचऱ्यात वावरणारे लोक. त्यांना रविवार माहीत नाही.. उजवीकडे नवी बांधकामे चालू आहेत.. दोन गाई जणू एकमेकींशी बोलत असाव्यात अशा थाटात पहुडल्या आहेत. झोपडपट्टीमधली मुले त्यांच्या तकलादू छतांवरून पतंग उडवीत आहेत. काली बाजारात निघाली आहे, तिच्या डोईवर टोपली आहे, त्यात नुकतेच काढून आणलेले नारळ भरलेले आहेत.
कोलकाता – बघावे तिकडे दारिद्रय़, दरुगधी, घाणीचे साम्राज्य. भुकेचे थमान, गुन्हेगारीचा बळावलेला बकासुर, बकाल वस्त्या, साथीचे रोग, तुंबलेले पाणी, कचरा, त्यातच वळवळणाऱ्या अमिबासारखे क:पदार्थ मानवी अस्तित्व – पूर्वी ‘द फ्लाउंडर’ (देअर बुट) या पुस्तकात कोलकात्यावर लिहिताना ग्रासने कोलकात्याचे वर्णन ‘स्वत:चीच विष्ठा भक्षण करणारे शहर’ असे केले होते. ‘शो युवर टंग’ हे पुस्तकही त्यांच्या डोळस, जागृत कथनपद्धतीला अपवाद नाही, पण या पुस्तकात आहे ती कोलकात्याची कथा नाही, तर त्या पाश्र्वभूमीवर लेखकाचा स्वत:ला माणूस म्हणून भेटण्याचा एक प्रयत्न. म्हणूनच त्या जुगुप्सेमध्येसुद्धा त्यांना जाणवली एक भयावह सुंदरतेची किनार. या कमालीच्या कुरूप, बेडौल आणि घृणास्पद पसाऱ्यातही इथल्या माणसांत एक ठाम झुंज देण्याची वृत्ती आहे. (कारण त्याशिवाय पर्यायच नाही.) वेदना, दु:ख, विपत्ती आणि अनावस्था यांचा अतिरेक होतो तेव्हा त्याला हसून तोंड देणे हेच क्रमप्राप्त असते, तरच आयुष्यात सकारात्मकता टिकून राहू शकते.
या प्रवासवर्णनात आहे तरी काय? बरेच काही, वरवर पाहता संदर्भहीन! त्यात ग्रास यांनी कोलकात्यामधील कचरा गोळा करणाऱ्या, झोपडपट्टीत कचऱ्याचाच एक भाग होऊन राहिलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी जे सामाजिक प्रकल्प आखले गेले त्याबद्दल लिहिले आहे, कामगारवर्गाशी साधलेले संवाद, शेणाच्या गोवऱ्यांनी िभती सजविणाऱ्या मायमाउल्या, एका निर्वासित बांगलादेशी कवीला जर्मन व्हिसा मिळवून देण्यासाठी केलेली मदत, स्त्री-कामगारांना संपाचे महत्त्व पटवून देताना केलेले युक्तिवाद, कट्टर धर्मवादी, कर्मठ जातीवादी, आळशी आणि बुद्धिमांद्याने ग्रासलेला मध्यमवर्ग, राज्य आणि देशपातळीवरील लाचखोर राजकारण आणि त्यांची अनास्था- या सर्वाबद्दल लिहिताना त्यांची लेखणी योग्य वेळी तत्त्वकठोर होते, मऊ होते किंवा ठाम भूमिका घेते. त्यांची डावी विचारसरणी ठायीठायी प्रकर्षांने जाणवते.
रूढार्थाने या पुस्तकाला कथा नाही, त्याचे रूपही परंपरागत कादंबरीच्या व्याख्येनुसार अनुबंधित नाही. हे एक स्फुट सामाजिक चिंतन आहे. ग्रासला या वास्तव्यकाळात एक नवा दृष्टिकोन लाभला आहे, एका वेगळ्या साहित्यिक परिमाणाने या लेखनाकडे बघायला हवे. ही एका शहराची कथा नाही, ही विकसनशील देशातील जवळजवळ प्रत्येक शहराची कथा आहे. विकसित देशातील- युरोपातील एक लेखक या सर्व प्रतिमाघटकांकडे कसा पाहतो? त्याच्या लेखी हे वास्तवाचे अगदी अनाकलनीय रूप आहे. सुरुवातीला अचंबा आणि किळस, संताप, असहाय घृणा आणि मग हळूहळू एक प्रकारचा समंजस स्वीकार असा हा प्रवास आहे. जीभ बाहेर काढणे- एखाद्या गोष्टीची लाज, शरम वाटल्यावर ही कृती केली जाते. सर्वसंहारक कालीमातेने बाहेर काढलेली जीभ ही या विनाशाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या शहरासाठी आहे, पण एका समृद्ध देशाच्या विचारवंत प्रतिनिधीला वास्तवाचे हे भयंकर तांडव शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे, हे या शीर्षकातून अखेरीस सामोरे येते.
या सर्व लेखनाला बंगालच्या (तत्कालीन) वर्तमान सांस्कृतिक- सामाजिक- भावनिक परिस्थितीच्या अभ्यासाची, विश्लेषणाची आणि त्यावरील बहिर्गामी चिंतनाची जोड आहे. हे वाचायला सुरम्य आणि मनोवेधक नाही, पण स्वानंदवादी निद्रेतून खडबडून जागे करणारे असे ग्रास यांचे लिखाण असते आणि हे पुस्तक त्याच दिशेने जाणारे आहे. यात लेखकाने त्याच्या अंतरंगाचे पदर सोडवून आपल्यापुढे मांडले आहेत.
- ‘शो युवर टंग’
- लेखक : ग्युंटर ग्रास
- प्रकाशक : मरिनर बुक्स
- पृष्ठे : २२४, किंमत : ७५०६ रुपये
जयश्री हरि जोशी
snehjayam@gmail.com
(या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर जॉन ई. वूड्स यांनी केले आहे. तर ‘जीभ दिखाना’ या नावाने त्याचं हिंदी भाषांतर विष्णू खरे यांनी केले आहे.)