‘पुस्तक जगतातील ऑस्कर’ ही ओळख असलेल्या यंदाच्या बुकर पारितोषिकाची घोषणा येत्या मंगळवारी होणार आहे. गेल्या आठवडय़ातील ‘बुकमार्क’ पानामध्ये चिगोझी ओबिओमा यांच्या ‘फिशरमेन’ या संभाव्य विजेत्या कादंबरीवर विस्ताराने चर्चा करण्यात आली होती. उर्वरित पाच स्पर्धकांची माहिती देणारा हा लेख..
बुकर पुरस्कार हा आंग्ल साहित्य जगतातला सर्वोत्तम सन्मान असला, तरी त्याची माळ पडणारे लेखक आणि त्यांची वाचकप्रियता यांच्यामध्ये समप्रमाण असतेच असे नाही. वाचक ज्या लेखकांची आतुरतेने वाट पाहतात किंवा ज्यांच्या पुस्तकांच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीसाठी दुकानाबाहेर रांगा लावतात त्या ‘बेस्ट सेलर्स’ लेखकांची या पुरस्कारांसाठीच्या यादीत वर्णी नसते. मात्र बुकरच्या दीर्घयादीपासून त्या यादीतील लेखकांची गणना काही अंशी ‘बेस्ट सेलर’ करावी इतका यादीतील पुस्तकांना उठाव लाभतो. त्या पुस्तकांची चर्चा घडते आणि गंभीररीत्या (‘प्युअर लिटररी’) वाचनव्यवहार वाढतो. अंदाज आणि सट्टेबाजीचीही मोठी स्पर्धा आंतरराष्ट्रीय पुस्तकजगतात वर्षांतल्या या काळात घडू लागते. पुरस्कारप्राप्त लेखक-लेखिका वर्षभर गाजतात, पण मोजकेच पुढे सातत्याने आपल्या लेखणीला धार काढीत लेखनव्यवहाराच्या आंतरराष्ट्रीय पटलावर सक्रिय राहतात. काही उचित कादंबऱ्यांचे पुढे सिनेमे तयार होतात. त्या बळावरही लेखक आजीवन प्रसिद्धीशी करार करतात.
बुकर पुरस्कार त्याच्या बक्षिसाच्या मोठय़ा रकमेच्या आणि लेखकाला झळकत राहण्याच्या संधीसाठी सर्वोत्तम असला तरी त्याचे आणखीही मोठे कार्य आहे; दीर्घयादीपासून ते पुरस्कारानंतरची काही महिने जगभरात वाचनसंस्कृती उभी करण्याचे.
इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या राष्ट्रकुल देशांमधील कादंबरीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. २०१३ सालापासून सीमा शिथिल केल्याने आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कादंबरी प्रकाराचा या स्पर्धेत समावेश होतो. यंदा लघुयादीत दोन ब्रिटिश, दोन अमेरिकी, एक जमैकन आणि एक नायजेरियन अशी लेखकांची वैविध्यपूर्ण अनुभवांची, मांडणीची स्पर्धा पुरस्कारांसाठी होणार आहे. सट्टेबाजी, ऑनलाइन अंदाज, वाचकांच्या प्रतिक्रिया, प्रकाशन संस्थांचे प्रसिद्धी तंत्र यांची वेगळी यंत्रणा पुरस्काराच्या आधी एखाद्या पुस्तकाचा मोठा अप्रत्यक्ष दबाव तयार करते. यंदा जगभरातील वाचकांकडून नावाजली जात असलेली कादंबरी नायजेरियाची ‘फिशरमेन’ आहे. मात्र युरोपातील स्थलांतराच्या प्रश्नांनी जगभराचे लक्ष वेधून घेतलेले असताना संजीव सहोटा या ब्रिटिश-भारतीय लेखकाची भारतीय तरुणांच्या स्थलांतरावरच बेतलेली ‘द इयर ऑफ रनअवेज’ हीदेखील कादंबरी चर्चेत आहे. त्यात सट्टेबाजांनी या कादंबरीवर सर्वाधिक बोली लावली असून, अमेरिकी लेखिका हान्या यानागिहारा यांची ‘लिटिल लाइफ’ ही ७२० पानांची कादंबरीही सट्टेबाजांचे लक्ष्य बनली आहे. पुलित्झर विजेत्या दिग्गज आणि बुजुर्ग लेखिका अॅन टेलर यांच्या ‘ए स्पूल ऑफ ब्लू थ्रेड’ कादंबरीतील कुटुंबड्रामा अमेरिकी म्हणून डावलला जाण्याची शक्यता आहे, पण अपारंपरिक निर्णय द्यायचे निवड समितीने ठरविल्यास त्यांच्याच नावावर पुरस्कार जाण्याची शक्यता आहे. जमैकातील मॅरिअन जेम्स या लेखकाची ‘ब्रीफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग’, ब्रिटिश लेखक टॉम मक्कार्थी यांची ‘सॅटिन आयलंड’ या दोन्ही कादंबऱ्यांचा पुरस्कारांपर्यंत पोहोचावा इतका बोलबाला झालेला नाही.
गेल्या वर्षी एका गूढ सट्टेबाजाने विविध प्रकारच्या अभ्यासाअंती ऑस्ट्रेलियाच्या रिचर्ड फ्लॅनगन यांची ‘द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ’ ही कादंबरी विजयी ठरेल असा अंदाज केला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरवणारा मध्यमवयीन सट्टेबाज सध्या वृत्तमाध्यमांमध्ये चर्चित व्यक्ती ठरला आहे. ‘टेलिग्राफ’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार हा सट्टेबाज लघुयादीतील कोणतेही पुस्तक वाचत नाही. मात्र पुस्तकांची वृत्तपत्रीय परीक्षणे, निवड समितीतील सदस्यांची विकिपीडियावरील पाने, यू टय़ूबवरील क्लिप्स यांच्या आधारे ‘शेरलॉक होम्स’च्या शैलीत या निवड समितीला कोणते पुस्तक आवडेल याचा अंदाज करतो. यंदा त्याने संजीव सहोटाची कादंबरी विजयी ठरेल असा अंदाज केल्यामुळे वाचकविश्वात या पुस्तकाच्या खरेदीसाठी रीघ लागली आहे. पुस्तकांच्या दुकानांनी या पुस्तकाच्या मिळतील तितक्या प्रती विक्रीसाठी गोळा करायला सुरुवात केली आहे.
अर्थातच सट्टेबाजीचा निवड समितीकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर परिणाम होत नसणार. तरीही निर्माण झालेल्या वातावरणाचा भला किंवा बुरा परिणाम पुस्तकावर होऊ शकतो, अशी परिस्थिती मात्र तयार झाली आहे. शेकडो पुस्तकांतून लघुयादीत येऊन गुणवत्ता सिद्ध करणारे यातील प्रत्येक पुस्तक श्रेष्ठच आहे. फक्त मंगळवारी एकुलता एक विजेता कोण ठरतो, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.
पाच चुरसपूर्ण सरस!
‘ब्रीफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग’ ही कादंबरी आहे लोकप्रिय व्यक्तींच्या हत्यांच्या कथित प्रसंगांची. गायक बॉब मार्लेच्या हत्येच्या फसलेल्या प्रसंगांपासून ती खुनी, भूत, पत्रकार आणि सुमारे ७५ व्यक्तिरेखांचा समावेश करीत सरकत जमैकातील जीवनाचा देमारपट उभा करते.
‘सॅटिन आयलंड’ ही कथाच नसलेली कादंबरी तत्त्वज्ञान, इतिहासासोबत मानवाच्या अस्तित्वाचा शोध घेणारे विचित्र प्रकरण आहे. मुखपृष्ठावरच जाहीरनामा, निबंध, कबुलीजवाब आदी शब्दांवर काट मारून ही कादंबरीच असल्याचे म्हटले आहे. यंदाची वाचनात सर्वाधिक अवघड असलेली कादंबरी म्हणून तिचा उल्लेख करावा लागेल.
‘ए स्पूल ऑफ ब्लू थ्रेड’ ही कुटुंबसंस्थेचा विस्ताराने शोध घेणारी संयत कादंबरी आहे. अमेरिकेतील विघटित कुटुंबाची इतर सदस्यांशी होणारी पुनर्भेट आणि त्यातून उलगडत जाणारे नातेसंबंध यांच्यावर ती केंद्रित आहे. नात्यांच्या गरजांवरही ती प्रकाश टाकते.
‘लिटिल लाइफ’ ही कादंबरी न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित झालेल्या चार कॉलेजवयीन मित्रांची दीर्घ कहाणी आहे. त्यातील मुख्य पात्राच्या आयुष्यात लहानपणी घडलेल्या नाटय़पूर्ण प्रसंगाचे चारही मित्रांच्या जीवनावर पडसाद उमटतात, त्याची लांब परंतु प्रवाही गोष्ट यात आहे.
‘द इअर ऑफ रनअवेज’ या कादंबरीमध्ये चार भारतीयांच्या ब्रिटनमधील स्थलांतराच्या निमित्ताने एकूणच भूत-भविष्य आणि स्थलांतरितांच्या प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे.
rajendra.yeolekar@expressindia.com