|| डॉ. अजय ब्रह्मनाळकर
मेंदूत जाणीव कशी निर्माण होते? या प्रश्नाची निरनिराळी उत्तरं आजवर दिली गेली आहेत. त्या साऱ्यांचा आढावा हे पुस्तक घेतंच; शिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, अभियांत्रिकी, मानसशास्त्र, मेंदूविज्ञान आणि तत्त्वज्ञान अशा ज्ञानशाखांच्या आधारे मानवी जाणिवेचा उद्बोधक रहस्यभेदही करतं..
मन कसे निर्माण होते? त्यात जाणीव कुठून निर्माण होते? हे छळणारे प्रश्न आहेत. तत्त्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान अशा अनेक मार्गानी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. ‘मनाचे शरीरातील स्थान हृदयात असावे’ इथपासून ‘शरीर पार्थिव आहे, परंतु मन दैवी आहे’ अशा कार्टेशियन द्वैतापर्यंत अनेक तर्क मानवाने आजवर लढवले आहेत. परंतु मेंदूच्या विशिष्ट कार्यपद्धतीतून मन नावाची चीज निर्माण होते; जिवंत शरीराचे पार्थिव झाले, की मन नावाची गोष्टही नष्ट होते याबाबत आधुनिक विज्ञानाला शंका नाही. तरीही मोठा गुंतागुंतीचा गणिती कंस सोडवताना जसे एखादा अंक कंसाबाहेर राहतो तेव्हाच कंस सुटतो, तसे ‘जाणीव’ ही गोष्ट मेंदूविज्ञानातही आजवर कंसाबाहेर राहत आली आहे.
‘एफ.एम.आर.आय’, ‘ट्रान्सकॉर्टिकल स्टिम्युलेशन’ (कवटीबाहेरून मेंदूचा विशिष्ट भाग उद्दिपित करणे), ‘सिंगल न्यूरॉन स्टिम्युलेशन’ (एक मज्जापेशी उद्दिपित करणे) अशा अत्यंत आधुनिक तंत्रांनी ‘जाणीव’ आणि ‘जाणिवेची जाणीव’ यांचे गूढ उकलण्याचा निकराचा प्रयत्न मानवाने चालवलेला आहे.
संगणकीय उत्क्रांतीचा वेग प्रचंड असल्याने १०-२० वर्षांतच ‘यंत्रमानव’ हा यंत्र न राहता मानवाप्रमाणेच भावना असलेला, भोग घेणारा (सेन्टिएन्ट) आणि स्वतंत्र इच्छा असणारा बनणार की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. कृत्रिम प्रज्ञेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) निर्मितीत गुंतलेल्या अनेकांना तर तशी खात्रीच वाटते.
मेंदू व जाणीव यांचा अभ्यास करणारे मेंदूविज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा निर्मितीत गुंतलेले तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ यांच्यात ‘जीवात जाणीव येते कुठून?’ हा मोठा गुंतागुंतीचा गणिती कंस सोडवण्याची स्पर्धा चाललेली आहे. कंसाबाहेर राहणारे काहीही नाही आणि जाणीव कंसाबाहेरच राहते- असे दोन तट या शास्त्रज्ञांत पडलेले आहेत.
जाणीव आणि जाणिवेची जाणीव या बाबी मेंदू या शरीरातील सर्वात रहस्यमय अवयवात कशा निर्माण होत असाव्यात? तर, हा अवघड कंस गूढवादाच्या आश्रयाला न जाता केवळ वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे कसा सोडवता येईल, हे सांगणारे आणि जाणिवेच्या स्वरूपाबद्दल र्सवकष सिद्धांत मांडणारे मायकेल एस. गाझानिगा यांचे नवे पुस्तक आले आहे. ‘द कॉन्शस्नेस इन्स्टिंक्ट’ हे त्याचे शीर्षक!
ज्या व्यक्तींमध्ये काही कारणाने डावा आणि उजवा मेंदू विभक्त करावा लागला, त्यांच्यात जाणीव नावाची (तोवर एक सलग भासणारी) गोष्ट मेंदू विभक्त केल्याक्षणी विभक्त होते आणि ती व्यक्ती दोन विलग जाणिवा घेऊन काहीही न घडल्याप्रमाणे जगते. परंतु तिच्या डाव्या मेंदूला जाणवणारे उजव्या मेंदूच्या जाणिवेत नसते आणि उजव्याला जाणवणारे डाव्याच्या! चलाख प्रयोग रचून हे जगाला सप्रमाण प्रथम ज्यांनी दाखवून दिले ते हे गाझानिगा. बुजुर्ग मेंदूविज्ञान शास्त्रज्ञ. त्यामुळे त्यांचे ‘द कॉन्शस्नेस इन्स्टिंक्ट’ हे पुस्तक म्हणजे ‘जाणीव’ या रहस्यमय गोष्टीची ‘इनसायडर्स स्टोरी’ सांगणारे अतिशय रंजक आणि उद्बोधक कथन झाले आहे.
पुस्तकात एकूण तीन विभाग आहेत. पहिला विभाग आहे- ‘गेटिंग रेडी फॉर मॉडर्न थॉट’! नाईल नदीच्या किनारी वसत असलेल्या इजिप्शियन आदिमानवाच्या जाणिवेत ‘आपण’ आणि ‘निसर्ग’ असे द्वैत नव्हतेच. ‘नाईल दुथडी भरून वाहते, कारण तिच्या मनात आले’- एवढेच त्या आदिमानवाच्या मनात येत असे; ‘वर पाऊस पडला त्याने पाणी आले’ हा कार्यकारणभाव त्याच्या जाणिवेचा भाग नव्हता. इजिप्शियन आदिमानवाच्या या वर्णनापासून पहिल्या विभागाची सुरुवात होते. आपण निसर्गाचा भाग असलो तरी प्रश्न विचारू शकतो ही जाणीव प्रथम ग्रीकांमुळे झाली, असे लेखक म्हणतो.
पुढे या विभागात देकार्त, लॉक, ह्य़ूम, शॉपेनहोवर या तत्त्वज्ञांनी आपल्या प्राथमिक जाणिवेला कसे विस्तारत नेले, याचा आढावा घेऊन लेखक आपल्याला या विभागातील अखेरच्या प्रकरणात २० व्या शतकात घेऊन येतो. या शतकात ‘आकलन (बोधन) क्रांती’ (कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन) झाली. नोम चोम्स्की यांनी सर्व भाषांच्या सर्विक व्याकरणाचा खळबळजनक सिद्धांत मांडला. वर्तनवादाच्या (विशिष्ट तऱ्हेने मेंदूला डिवचले असता विशिष्ट प्रतिसाद मिळतो) अंगानेही विचार झाला. परंतु मज्जापेशीतील घटनाक्रम बदलले, त्यांच्यातील जोडण्यांचे चक्र बदलले, की भावस्थिती बदलत असली पाहिजे. सबब मज्जापेशीतील घटनाक्रम आणि त्यांच्या विशिष्ट जोडण्या ओळखता आल्या तरच जाणीवविषयक संशोधन पुढे जाऊ शकेल, या क्रीक आणि कॉक यांच्या प्रतिपादनानंतरच ‘न्यूरोसायबरनेटिक्स’ उदयाला आले आणि आकलननिष्ठ (बोधन) मेंदूविज्ञानात (कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स) क्रांती घडून आली. या साऱ्याची सफर या प्रकरणात लेखक आपल्याला घडवून आणतो आणि इथे पहिला विभाग संपतो.
‘फिजिकल सिस्टीम’ या पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात मेंदूची भौतिक रचना आणि कार्य समजावून सांगितले आहे. मेंदूची रचना स्तरीय (लेयर्ड) आहे आणि त्याचे कार्य विभागीय (मॉडय़ुलर) पद्धतीने चालते – असा मुख्य सिद्धांत! जाणिवेच्या जाणिवेत एक सलग व संपूर्णपणे एकच जाणीव आपल्याला आहे असे वाटत असते. परंतु असे नसते. मेंदूतील प्रत्येक विभागात विभागीय जाणीव निर्माण होत असते. अशा विभागीय जाणिवा-जाणिवांमध्ये एक प्रकारची स्पर्धा असते. त्यात टिकून राहणाऱ्या जाणिवा कालपटावर एकत्र आल्या, की सलग-संपूर्ण जाणीव निर्माण होते.
दिसते आहे पण उमगत नाही; श्रवण शाबूत आहे पण ऐकू येत नाही; बघून चेहरा ओळखता येत नाही, पण फोनवर आवाज ऐकल्यावर ओळखता येतो; वस्तूचे नाम विसरते पण वस्तूचा उपयोग सांगता येतो.. ही मेंदूतील विभागवार जाणीव नष्ट झाल्याने निर्माण होणाऱ्या दोषांची उदाहरणे आहेत. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये विभागीय जाणीव नष्ट झाल्याने मेंदूच्या क्षमतेत निर्माण झालेले न्यून इतरांना समजत असले तरी त्याची जाणीव खुद्द त्या व्यक्तीला असत नाही. ‘अल्झायमर’सारख्या व्यक्तिमत्त्व पुसून टाकणाऱ्या आजारात किंवा फक्त पापणीची उघडझाप करू शकणाऱ्या ‘लॉक्ड-इन-सिंड्रोम’च्या रुग्णांमध्येही जाणीव शिल्लक असतेच. जाणीव ही गोष्ट उपजत आणि भक्कम आहे. विभागवार कार्यपद्धतीने तिची समृद्धी कमी-अधिक होत जाते, पण म्हणूनच जाणीव संपूर्णपणे नष्ट करायला अवघड बाब बनते. जाणिवेचा हा कणखरपणा तिला विभागीयतेमुळे (मॉडय़ुलॅरिटी) प्राप्त होतो आणि ही विभागीयता मेंदूला त्याच्या स्तरीय रचनेमुळे (लेयर्ड आर्किटेक्चर) प्राप्त होते.
भावनांचे उगमस्थान असलेला सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू, त्यावरील मोठय़ा मेंदूचे स्तर, त्यातील संवेदनाग्रहण करणारे आणि येणाऱ्या माहितीची छाननी (प्रोसेस) करणारे विविध विभाग यांच्यात स्वतंत्रपणे काम चालते. एका विभागाचे निष्कर्ष संबंधित इतर विभागांकडे माहिती स्वरूपात पाठवले जातात. हे इतर संलग्न विभाग त्यांना स्वतंत्रपणे प्राप्त झालेली माहिती आणि अन्य विभागांकडून निष्कर्ष स्वरूपात प्राप्त झालेली माहिती या सगळ्याची छाननी करून पुढील निष्कर्ष काढतात आणि तो पुढे सरकतो. या तऱ्हेने विभागवार काम चालते. समस्तरीय, खालून वर आणि वरून खाली अशा सर्व दिशेने ही आंतरविभागीय देवाणघेवाण मेंदूत चाललेली असते. यातील प्रत्येक विभागाचे कामकाज त्याच्या-त्याच्या नियमसंचानुसार (प्रोटोकॉल) चाललेले असते. हे सारे पुस्तकाच्या या दुसऱ्या विभागात येते.
जाणीव नावाची सतत पुढे पळत राहणारी, दिसत (जाणवत) असली तरी हातातून निसटत राहणारी गोष्ट पेशींतील प्रक्रियांतून निर्माण कशी होते, हा सनातन प्रश्न अधिक परिष्कृत (सोफेस्टिकेटेड) स्वरूपात तरी शिल्लक राहतोच. याचे उत्तर ‘पुंज भौतिकशास्त्र’ (क्वांटम फिजिक्स) आणि ‘जैवचिन्हशास्त्र’ (बायोसेमिऑटिक्स) या नव्या शास्त्रशाखांमुळे मिळालेल्या नव्या दृष्टीतूनच मिळू शकते, असे गाझानिगा यांना वाटते.
‘कॉन्शस्नेस कम्स’ या अखेरच्या विभागात सुरुवातीस त्यांनी ‘श्रॉडिंजरचे मांजर’ हा सुप्रसिद्ध विचार-प्रयोग विस्ताराने समजावून सांगितला आहे. या विचारप्रयोगातील मांजर हे एकाच वेळी जिवंत आणि मेलेले आहे असे गणिताने सिद्ध होते. हे अतक्र्य आहे, अॅब्सर्ड आहे. परंतु पुंजवादाने हे दाखवून दिले, की जड ऊर्जा पुंज असताना तिचे ‘कण’ अंग आणि ‘तरंग’ अंग ही दोन्ही स्वरूपे एकाच वेळी खरी असतात. त्यातील नेमके कोणते ते बघायला गेले, की जे बघतो तेच दिसते आणि दुसरे त्याक्षणी बघणाऱ्यासाठी लुप्त होते. परंतु जड ऊर्जेच्या तरंग आणि कण या दोन्ही अंगांत परस्परपूरकता (कॉम्प्लिमेंटॅरिटी) आहे. ही उभयस्वरूपता फक्त मेंदू आणि जाणीव यांतच व्यक्त होताना दिसते असे नव्हे, तर शरीरातील प्रत्येक पेशीच्या ‘स्थूल’ आविष्कारातही हे उभयस्वरूप व्यक्त होते. असे करणारा सजीव हे जड ऊर्जेचे असाधारण उदाहरण आहे. ९१ वर्षीय भौतिक आणि जीवशास्त्रज्ञ एच. एच. पॅटी यांच्या संशोधनाचा हवाला देऊन गाझानिगा यांनी हे दाखवून दिले आहे.
याखेरीज जाणिवेचे किंवा एकूणच सजीवतेचे गूढ उकलण्यासाठी चिन्हशास्त्राची मदत घ्यावी लागते. ते समजावून सांगण्यासाठी चिन्ह, चिन्हित आणि त्या दोहोंतील संबंध (अर्थ) हे त्रिकूट.. म्हणजे मूळ चिन्हशास्त्राबाबतच्या (सेमिऑटिक्स) विवेचनापासून लेखक सुरुवात करतो. भौतिक शास्त्रातील गतीनियम अविचल असतात. गुरुत्वाकर्षण हा नियम पृथ्वीवर, चंद्रावर- सगळीकडे एकच असतो. ‘वाहने डावीकडून चालवा’ हाही एक नियमच; परंतु हा नियम भारतात वेगळा, अमेरिकेत वेगळा. चिन्हशास्त्र हे नियमांप्रमाणे चालते. पेशीअंतर्गत डीएनए, आरएनए आणि प्रथिने हीदेखील चिन्हशास्त्रीय रचना आहे. ‘जैवचिन्हशास्त्रीय रचना’ हा मार्सेलो बार्बीएरी या शास्त्रज्ञाचा सिद्धांत! पेशीत असलेली जैवचिन्हशास्त्रीय रचना आणि संगणकात असलेली चिन्हशास्त्रीय रचना यांत मूलभूत फरक आहे. संगणकात वापरल्या जाणाऱ्या चिन्हव्यवस्थेत चिन्ह आणि चिन्हित यांतील संबंध ठरवणारा सूत्रधार (संगणक आज्ञावली लिहिणारा) व्यवस्थेबाहेर असतो, परंतु पेशीअंतर्गत चिन्हव्यवस्थेत चिन्ह (डीएनए) आणि चिन्हित (प्रथिन) हा संबंध ठरवणारा सूत्रधार (आरएनए) हा व्यवस्थेच्या आतच असतो. चिन्ह, चिन्हित आणि सूत्रधार हे सारेच पेशीच्या आत असतात. त्यामुळे जैवचिन्हशास्त्रीय व्यवस्था ही अर्थासहित बंदिस्त झालेली (सेमिऑटिक क्लोजर) व्यवस्था असते.
अशा तऱ्हेने सजीव हा एका बाजूस अभिजात भौतिकशास्त्रातील गतीनियमांचे पालन करणारा, पण त्याच वेळेस जैवचिन्हशास्त्रातील विधिनियमांचेही पालन करणारा अनन्यसाधारण जड वस्तू असतो. डीएनए हा बराचसा कणखर आणि थोडा लवचीक असतो. त्याच्यातील या गुणवैशिष्टय़ांमुळेच उत्क्रांतीच्या रेटय़ाने सजीवांतील गुंतागुंत वाढत गेली आहे. जाणीव ही त्यातलीच एक बाब. तिच्यातही हे सर्वव्यापी उभयस्वरूप आणि अर्थासकटच व्यक्त होणे एकवटलेले असते.
परंतु जाणीव ही मेंदूतील मज्जापेशींचे उद्दिपित जाळे (न्यूरल कोरिलेट्स ऑफ कॉन्शस्नेस) शोधत बसून हाती लागणारी बाब नाही किंवा कृत्रिम प्रज्ञेने (एआय) ओलांडली जाईल अशीही गोष्ट नाही. शेवटी लेखक यापुढील काळात आकलननिष्ठ (बोधन) मेंदूविज्ञानापुढे कोणती आव्हाने आणि प्रश्न असतील, याचे थोडक्यात विवेचन करतो आणि पुस्तक संपते.
जाणिवेचे रहस्य उकलताना गाझानिगा यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, उत्क्रांती, अभियांत्रिकी, मानसशास्त्र, मेंदूविज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व विद्याशाखांतील ज्ञान उपयोगात आणले आहे. पुस्तकाचा आवाका स्तिमित करणारा आहे. हे पुस्तक वाचल्यावर ‘कॉन्शस्नेस’ या विषयावरील सखोल ‘ट्रीटिज्’ वाचल्याचे समाधान मिळते. या सर्व विद्याशाखांतील मूळ संकल्पना पुस्तकात जिथल्या तिथे स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे पुस्तक वाचतानाबिलकूल कुठे अडत नाही. विषयाची मांडणी वाचत जाऊ तशी समजत जाणारी आणि शैली रंजक आहे. ‘जाणीव म्हणजे काय रे भाऊ ?’ हा प्रश्न ज्यांच्या जाणिवेत उद्भवला असेल त्यांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे!
ajay.brahmnalkar@gmail.com
- ‘द कॉन्शस्नेस इन्स्टिंक्ट – अनरॅव्हलिंग द मिस्टरी ऑफ हाऊ द ब्रेन मेक्स् द माइंड’
- लेखक : मायकेल गाझानिगा
- प्रकाशक : फरार, स्ट्राउस, जीरुव् (२०१८)
- पृष्ठे : २८८, किंमत : १४८६ रुपये