‘द स्टिमसन सेंटर’ ही अमेरिकेच्या राजधानीत १९८९ पासून ‘आंतरराष्ट्रीय शांततेसाठी’ स्थापन झालेली संस्था. हेच शांततेला प्रोत्साहन देण्याचं काम अनेक देशांतल्या अनेक संस्था करत असूनसुद्धा शांतता प्रस्थापित का होत नाही आणि जागतिक शस्त्रास्त्रस्पर्धा सुरूच कशी राहाते, याचे अभ्यास अर्थातच जगभरात होत असतात. पण यापैकी ताजा, ‘स्टिमसन सेंटर’नं गेल्याच आठवडय़ात प्रकाशित केलेला अभ्यास हा निव्वळ अहवालासारखा नसून विश्लेषणपर पुस्तकासारखा असल्यामुळे सध्या चर्चेत आहे.
‘द ल्युअर अँड द पिटफॉल्स ऑफ एमआयआरव्हीज- फ्रॉम द फर्स्ट टु द सेकंड न्यूक्लिअर एज’ हे त्या पुस्तकाचं नाव. यातलं ‘एमआयआरव्ही’ म्हणजे ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हेइकल’ – म्हणजेच अंतराळातून पुन्हा वातावरणात येऊन, अनेक लक्ष्यांवर एकाच वेळी मारा करू शकणारी अस्त्रं. या बहुमारा अस्त्रांमुळे एकाच वेळी अनेक गावांवर मारा करता येईल अशी क्षमता आता अमेरिका- रशियाखेरीज अन्य देशांकडेही आली आहे. त्यापैकी भारत- चीन- पाकिस्तान या तीन देशांकडे हे तंत्रज्ञान असल्याची चिंता पाश्चात्त्य जगाला अधिक वाटते आहे आणि अमेरिका तर चीनला याबाबतीत खलनायक ठरवण्याची एकही संधी सोडत नाही, हे जगजाहीर आहे. चीनसोबत भारतावरही संहारप्रियतेचा जो आरोप पाश्चात्त्य तज्ज्ञमंडळी करत असतात, ते आपल्यासाठी अर्थातच धार्जिणं नाही. मात्र या पुस्तकाच्या सारांशात, चीनमुळे नव्या स्पर्धेची सुरुवात होईल आणि भारत त्यात उतरेलच, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अर्थात, ही प्रलयघंटा वाजवणं किंवा ठपके ठेवणं हा पुस्तकाचा हेतू नसून, बहुमारा क्षेपणास्त्रांची स्पर्धा वाढत जाते आहे ती कशी आणि का? भारतासारखे देशही यात का ओढले जाताहेत? या प्रश्नांचा वेधही पुस्तकात आहे.
या पुस्तकातलं भारत-विषयक प्रकरण सिंगापूरच्या नानयांग तंत्रविद्यापीठाशी संबंधित असलेले तज्ज्ञ राजेश बसरूर आणि अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातले अभ्यासक जगन्नाथ शंकरन यांनी लिहिलं आहे. त्यात ‘अग्नी-६’ या बहुमारा क्षमतेच्या क्षेपणास्त्राचा उल्लेखही नाही. पण त्याआधीच्या क्षेपणास्त्रांतून भारतानं ही स्पर्धा कशी ओळखली होती, याचा आढावा या प्रकरणानं घेतला आहे. टीकेचा सूर अर्थातच अमेरिकेबद्दलही आहे.
भारतीय विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्यासाठी चांगली बातमी ही की, हे अख्खं २०४ पानांचं पुस्तक पीडीएफ स्वरूपात, ँhttp:// stimson.org/ sites/ default/ files/ fileattachments/Lure_and_Pitfalls_of_MIRV s
.pdf ¹FF या संकेतस्थळावर संपूर्ण उपलब्ध आहे. तिथून ते डाउनलोड करून संगणकावरच वाचता येईल!