‘द अग्ली गेम’ हे पुस्तक सुमारे सात-आठ महिन्यांपूर्वी बाजारात आले आणि गाजले. मात्र या पुस्तकातही काही उणे जाणवत राहाते. ‘स्पॉटलाइट’सारख्या फुटबॉलशी काहीही संबंध नसलेल्या चित्रपटाच्या निमित्ताने या पुस्तकातील ते ‘उणे’ काय, याचाही एक उलगडा झाला, त्या निमित्ताने..
मुलांवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर विषय पुराव्यांनिशी अभ्यास करून समाजाला पचेल आणि पटेल अशा प्रकारे ‘स्पॉटलाइट’ या चित्रपटातून मांडण्यात आलेला आहे. त्यात काही कृत्रिमपणा नाही, बटबटीतपणा नाही. ‘जे आहे ते असे आहे आणि त्यात सत्य आहे’ इतकेच. एरवी चित्रपटाचा खप वाढवण्यासाठी सर्रास लावण्यात येणारी मसालेदार फोडणी यात नाही. त्यामुळेच या चित्रपटाने ‘ऑस्कर’वर मोहोर उमटवली. पण, अशी सत्यता लोकांसमोर मांडताना सर्वानाच असे जमणे कठीण आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफा यांच्यातील भ्रष्टाचार उकरून काढण्यात महत्त्वाचा हात असलेले पत्रकार हायडी ब्लेक आणि जोनाथन काल्व्हर्ट यांनी त्यांचा अनुभव ‘दि अग्ली गेम’ या पुस्तकरूपाने आपल्यासमोर मांडला. पण, यातील काही गोष्टी विनाकारण आपल्या समोर मांडल्या जात आहेत, असे वारंवार वाटते. फिफामधील भ्रष्टाचार मुळापासून उपटून टाकण्याचे श्रेय ब्लेक आणि काल्व्हर्ट या दोघांना द्यायला हवे. ‘दी सण्डे टाइम्स’ या ब्रिटिश वृत्तपत्रातील ब्लेक आणि काल्व्हर्ट या वरिष्ठ पत्रकारांनी अत्यंत सखोल अभ्यास करून फिफामधील भ्रष्टाचार जगासमोर आणला. विशेष करून २०२२च्या विश्वचषक स्पध्रेचे यजमानपद कतारला मिळाल्याने निर्माण झालेल्या वादाला आणि त्यासाठी पडद्यामागे घडलेल्या अनेक घटनांना त्यांनी जगासमोर आणले. फिफामध्ये झालेले सत्तांतर, अमेरिका आणि स्वित्र्झलड पोलिसांनी केलेली कारवाई हे या पत्रकारांचेच यश म्हणावे लागेल. आपला स्रोत कितीही खात्रीचा असला किंवा त्यावर कितीही विश्वास असला तरी पत्रकाराने अभ्यासपूर्वक, तटस्थपणे आपली भूमिका मांडणे गरजेचे आहे आणि हे ब्लेक व काल्व्हर्ट जोडीच्या शोधपत्रकारितेतून दिसून येते.
‘अग्ली गेम’ या पुस्तकात कतारचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे प्रमुख मोहम्मद बिन हम्माम यांना केंद्रस्थानी ठेवूनच लिहिले गेले आहे. मुळात या घटनेतील मुख्य भूमिका ही बिन हम्माम यांचीच आहे. त्यांचे फुटबॉल प्रेम, फिफाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा, सेप ब्लाटर यांच्याकडून झालेला दगाफटका आणि त्यांच्यामुळेच कतारमध्ये विश्वचषक स्पध्रेचे आयोजन करण्याची मिळालेली संधी या सर्व मुद्दय़ांवर लेखकद्वयाने टिप्पणी केलेली आहे. मात्र, हे सर्व करताना उगाचच हम्माम यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. उदा. फुटबॉलचा आगापीछा नसताना कतारमधील बिन हम्मामला फुटबॉलची ओढ लागलीच कशी, हे अगदी रंगवून सांगितले गेले आहे. मात्र या वर्णनांतून ‘कतारमध्ये केवळ एकाच व्यक्तीला हा खेळ आवडतो आणि इतरांना या खेळाबाबत काहीच माहीत नसते,’ असे चित्र निर्माण होते, ते आकलन क्षमतेच्या पलीकडचे आहे. कतारमध्ये फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्याचे स्वप्न साकारण्यासाठी बिन हम्माम यांचा राष्ट्रीय फुटबॉल संघटनेपासून फिफापर्यंतचा प्रवास पुढल्या प्रकरणात मांडण्यात आलेला आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेवर हुकूमत हवी, याची जाण ठेवून तत्कालीन अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्या मागेपुढे करण्याची एकही संधी बिन हम्माम यांनी दवडलेली नाही.
ब्लेक आणि काल्व्हर्ट यांनी गुप्तता पाळून, माहीतगार सूत्राने दिलेल्या प्रत्येक पुराव्याची शहानिशा करून हे प्रकरण जगासमोर आणले. जवळपास तीन महिने एका बंद खोलीत स्वत:ला कोंडून एक एक कागदपत्र या जोडीने हाताळले. त्यासाठी विशेष तांत्रिक अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी निवडलेल्या काही मोजक्या कागदपत्रांचा ब्लेक-काल्व्हर्ट यांनी नीट अभ्यास केला. तरीही बातमीच्या खोलात जाण्याचा मार्ग दाखवणारा पुरावा त्यांना सापडेनासा झाला होता. अखेरीस काल्व्हर्टला तो मार्ग सापडला. तो पुरावा काय आणि तो धागा पकडून पुढे काय काय घडले, ही उत्सुकता लेखकाने अखेपर्यंत टिकवून ठेवली आहे. १९९८ आणि २००२च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ब्लाटर यांनी मोठय़ा प्रमाणात लाच दिल्याचा आरोप येथे करण्यात आला आहे, परंतु त्याच्या पुराव्याबाबत पुस्तकात तरी कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. पण, याही निवडणुकीत बिन हम्माम यांनी ब्लाटर यांना कशा प्रकारे मदत केली हे वारंवार समोर उभे करण्यात आले. अपघातानंतर मुलगा मृत्यूशी झुंज देत असताना बिन हम्माम यांनी ब्लाटर यांच्यासोबत राहण्याचा घेतलेला निर्णय, हा प्रसंग विनाकारण- किंवा बिन हम्माम किती खलपुरुष होते हे रंगवण्यासाठी- सांगितलेला वाटतो. ब्लाटर यांच्यानंतर फिफा अध्यक्षपदावर विराजमान होण्याची स्वप्ने बिन हम्माम यांना पडत होती आणि त्यामुळेच ते ब्लाटर यांच्या अवतीभवती घुटमळत होते. ब्लाटर यांनीही बिन हम्मामचा पुरेपूर फायदा उचलला, परंतु अध्यक्षपदाची माळ काही केल्या त्यांनी बिन हम्मामच्या गळ्यात पडू दिली नाही. त्यामुळे बिन हम्माम आणि ब्लाटर यांच्यात काही काळ दुरावा वाढला. २००९ मध्ये सिडनीमध्ये जाहीर कार्यक्रमात ब्लाटर यांनी कतार फुटबॉल विश्वचषक आयोजनासाठी उत्सुक असल्याची घोषणा करून बिन हम्माम यांना बुचकळ्यात टाकले. पण, बिन हम्माम यांनीही हा प्रतिष्ठेचा मुद्दा करून फुटबॉल विश्वचषक आयोजनाचा विडा उचलला आणि त्यानंतर झालेली सौदेबाजी पुस्तकाने समोर आणली आहे. हे पुस्तक शोधपत्रकारितेचे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवते खरे, पण वर्णने रंगविण्यात मात्र काहीसे अडकते. एरवी रंजकतेसाठी अधिक ओळखले जाणारे चित्रपट-माध्यम ‘स्पॉटलाइट’सारख्या चित्रपटांमुळे सत्यतेला प्राधान्य देत असताना, पुस्तकाने रंजकतेचा आधार घेणे अधिकच डाचणारे ठरते.

हे लेखकद्वय कोण?
हायडी ब्लेक यांना शोधपत्रकारितेचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. द सण्डे टाइम्स या वृत्तपत्रात सहायक संपादक या पदावर कार्यरत असताना त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला. त्यानंतर इंग्लंडच्या ‘बझफीड’च्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली.
जोनाथन काल्व्हेर्ट यांनी आपल्या प्रदीर्घ काळाच्या शोधपत्रकारितेच्या कारकीर्दीत विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले. द संडे टाइम्समध्ये त्यांनी सर्वाधिक काळ (दहा वर्षे) संपादकाची जबाबदारी पाहिली.

 

स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com