डिजिटल भांडवलशाही देखील तिचे  आहे रेआणि नाही रेवर्ग निर्माण करते, हे मुंबईच्या रिक्षासंपाने दाखवून दिले नसेल, तर ते आपल्याला दिसले नाहीअसेच म्हणायला हवे.. विशेषतडग्लस रश्कॉफ  यांचे ‘‘थ्रोईंग रॉक्स अ‍ॅट गुगल बसहे पुस्तक वाचल्यावर या डिजिटल विषमतांचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांचा उलगडा होऊ लागतो.  भांडवलशाही डिजिटल झाली, पण असंतोष रस्त्यावरच असणार, हेही कळते. हे या पुस्तकाचे परीक्षण नव्हे..

त्या पुस्तकातून ‘आजच्या भारतीय  वाचका’ला जे मिळेल.. किंवा मिळावे, त्याचे हे एक आकलन आहे..

गुगलसारख्या एका बुद्धिनिष्ठतेने आणि सहानुभूतीनेही वागणाऱ्या कंपनीच्या बसवर कुणी दगडफेक का करेल या प्रश्नाचे उत्तर शोधताना, डग्लस रश्कॉफ यांना झालेले आकलन सद्य:स्थितीतल्या डिजिटल भांडवलशाहीने निर्माण केलेल्या किचकट प्रश्नांचे उत्तर आहे. या संदर्भात चिंतन करताना रश्कॉफ हे उबर आणि एअरबीएनबी या दोन नवउद्यमी कंपन्यांचे उदाहरण देतात. पैकी उबर ही कंपनी ‘राइड शेअरिंग’ या संकल्पनेवर तर एअरबीएनबी ही ‘होम शेअरिंग’ या संकल्पनेवर आधारित आहे. सुरुवातीला आपण कारने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असू आणि कारमध्ये इतर कुणी नसे; याउलट समांतर काळात कार नसलेल्या एखाद्या माणसाचे गंतव्यस्थान आणि आपले गंतव्यस्थान एकच असेल तर सॉफ्टवेअर आणि इंटरनेटच्या मदतीने अशा दोन माणसांना एकमेकांशी संपर्कात आणून कार नसलेल्या माणसाला वाहतुकीचे साधन मिळवून देणे आणि बदल्यात एकटय़ानेच कार चालविणाऱ्याला सोप्या पद्धतीने पैसे मिळवून देणे हा उबरचा मूळ उद्देश होता. एअरबीएनबी संकल्पनेत कारऐवजी घरात जास्त वापरात नसलेली एखादी खोली वा शयनगृह पर्यटकांना स्वस्त दरात राहण्यासाठी देण्याची कल्पना होती. अल्पावधीत या संकल्पना लोकप्रिय झाल्यानंतर लोकांनी जाता-येता फक्त पैसे घेऊन अधूनमधून लिफ्ट देण्याऐवजी सरळसरळ उबरच्या अ‍ॅपचा वापर करून लोकांना रीतसर टॅक्सीप्रमाणे सेवा देण्यास सुरुवात केली. सामान्य टॅक्सीपेक्षा जास्त आधुनिक आणि अ‍ॅपवर बटन दाबल्यावर काही मिनिटांतच आपल्याला घ्यायला येणारी गाडी पाहून लोकांनी साहजिकच टॅक्सीपेक्षा उबरला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. लवकरच टॅक्सीव्यवस्थेला समांतर अशी खासगी परिवहन सेवा उबरने सुरू केली. वरवर पाहता उबर ही टॅक्सीसेवा वाटत असली तरी तिच्या ताफ्यात असणारी वाहने उबरच्या मालकीची नाहीत, याचप्रमाणे एअरबीएनबीच्या प्रणालीतली हॉटेले वा घरे त्यांच्या मालकीची नाहीत. या अर्थाने उबर किंवा एअरबीएनबी फक्त सॉफ्टवेअर आहेत आणि सोपी चलनपद्धती व संगणकीय परिभाषेतून आलेला शास्त्रशुद्धपणा या प्रणालींना व्यापाराचे स्वरूप देत पारंपरिक रीतीने चालणाऱ्या टॅक्सी व्यवसाय व हॉटेल व्यवसायाला प्रभावी टक्कर देतो. या अटीतटीच्या लढाईत उबर जिंकत जाते आणि स्थानिक परिवहन सेवेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

उबर वा ओलाकॅबसारखी कंपनी कुठल्याही देशात प्रवेश करताना पहिल्या दिवसापासून काही कोटींचे भांडवल हाताशी घेऊन प्रवेश करते. प्रवेशानंतर लगेच नफा कमाविण्याचे तिच्यावर कसलेही बंधन नसते.. व्यापक जाहिराततंत्र आणि आपल्या सेवा पाण्याच्या भावाने विकून बाजारपेठेवर कब्जा मिळविणे हे या कंपन्यांचे प्राथमिक ध्येय असते. स्वस्तात मिळणाऱ्या कुठल्याही सेवेचा मग अर्थात तोंडी प्रचार सुरू होतो आणि अधिकाधिक लोक या सेवांकडे वळू लागतात. सुरुवातीच्या काळातले अशा सेवांचे ध्येय हे पैसा कमावण्याचे नसून एकाधिकारशाही निर्माण करण्याचे असल्याने या कंपन्या जगभरात जिथे कुठे म्हणून जातात तिथे स्थानिक टॅक्सी व्यवस्थेचे कंबरडे मोडतात. याची परिणती मग टॅक्सीचालकांच्या संपात आणि निदर्शनांत होते. या निदर्शनांमुळे अमेरिकेतल्या नेवाडा प्रांतात उबरवर पूर्णत: बंदी आहे. भारतातही कर्नाटक आणि मध्य प्रदेशात त्यावर पूर्णत: बंदी आहे. थायलंड, जर्मनी, तैवान, न्यूझीलंड या देशांमध्ये उबरवर बरीच सरकारी नियंत्रणे आहेत.

या अनेक ठिकाणी र्निबध वा बंदी असूनही, तिथल्या टॅक्सीचालकांनी याआधी केलेल्या संपांत आणि मुंबईच्या रिक्षाचालकांच्या संपात एक मोठा भावनिक फरक जाणवतो. सर्वप्रथम या प्रकरणात रिक्षावाल्यांची नेमकी बाजू समजावून सांगण्यात त्यांच्या संघटनांना बरेचसे अपयश आले आहे. शिवाय त्यांच्या काही संघटना या मुख्य राजकारणातल्या राजकीय लोकांच्या हातात आहेत. जिथे महाराष्ट्रातले मुख्य राजकारणच फार प्रगल्भतेने चालले आहे असे म्हणवत नाही; तिथे रिक्षाचालकांच्या संघटनेचा प्रश्न किती व्यवस्थित मांडला जाईल याबद्दल शंका घेण्यास बराच वाव आहे. या राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास या संपाला केला गेलेला सामान्य लोकांचा विरोध मात्र आश्चर्यकारक वाटतो. रिक्षाचालकांच्या नेमक्या समस्या समजावून न घेता त्यांच्यावर समाजमाध्यमांतून अश्लाघ्य भाषेत टीका करणे, व्यक्तिगत अनुभवांतून सर्व रिक्षाचालकांचे सरसकटीकरण करून त्यांना नालायक ठरविणे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ओला आणि उबरसारख्या चेहरा नसलेल्या भांडवलवादी कंपन्यांच्या सेवेबद्दल भरभरून बोलत याच सेवा कशा राहाव्यात आणि रिक्षांचे कसे निर्दालन व्हावे यासंबंधी वल्गना करणे. कदाचित हे तेच लोक असावेत जे रस्त्यावर भाजी घेताना दोन रुपयांसाठी घासाघीस करतात, पण तीच भाजी मॉलमध्ये घेताना निमूटपणे ज्या किमतीत मिळतेय त्याच किमतीला विकत घेतात. रिक्षावाल्यांच्या संपाविरोधात सामान्यांची अनेक खरीखोटी मते असतील आणि सर्व रिक्षावाले चांगले आहेत वा त्यांच्या व्यवस्थेत सारे आलबेल आहे असे इथे अजिबात म्हणायचे नाही. रिक्षावाल्यांबद्दल इतके विवेचनही फक्त रिक्षासंदर्भात नसून एक उदाहरण मात्र आहे.

जसजशी संगणकीय प्रगती वाढत जाईल तसतसे अनेक क्षेत्रांतले रोजगार कमी होत जातील. डिजिटल भांडवलशाहीत चेहरा नसलेल्या या मोठमोठय़ा कंपन्या नोकरकपातीच्या वेळी आज ‘आहेरे’ वर्गातल्या लोकांना उद्या ‘नाहीरे’ वर्गात ढकलतील तेव्हा प्रभावितांच्या अलीकडे उभे राहून सगळ्यांना हे चित्र असेच दिसत राहील का? ते असेच दिसत राहणार असेल तर बेरोजगारीची समस्या अतितीव्र असलेल्या देशाचे भवितव्य कसे असेल, याची साधी कल्पनाही केली जाऊ शकत नाही.

रिक्षाचालकांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर उबरसारखेच अ‍ॅप बनवले आणि चांगली सेवा दिली तरच यापुढे त्यांना सार्वत्रिक वाहतुकीच्या स्पर्धेत टिकून राहता येईल असे काही लोकांचे म्हणणे आहे. या एकदिवसीय प्रासंगिकाच्या समांतरकाळात भारतातील नवतंत्रज्ञान उद्योगांमध्ये घटत चाललेली गुंतवणूक व त्यामुळे त्यांनी केलेली कामगार कपात, डिजिटल भांडवलवादामुळे वाढत चाललेली बेरोजगारीची समस्या, या समस्यांची आतून उकल करणारे व एमआयटीने ‘जगातल्या दहा बुद्धिवंतांपैकी एक’ अशी उपाधी दिलेले विचारवंत डग्लस रश्कॉफ यांचे ‘थ्रोईंग रॉक्स अ‍ॅट गुगल बस’ यांच्या एकत्रित परिणामातून विश्लेषण करायला घेतल्यास समोर येणारी तथ्ये ही काही गंभीर गोष्टी आपल्यासमोर आणतात.

‘थ्रोईंग रॉक्स अ‍ॅट गुगल बस- हाऊ ग्रोथ बिकम्स द एनिमी ऑफ प्रॉस्पेरिटी’ या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणात डग्लस रश्कॉफ हे अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरातल्या एका घटनेविषयी बोलतात. अवघ्या २० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गुगल या कंपनीने इंटरनेटवर दिसणाऱ्या संकेतस्थळांची माहिती नियोजनपूर्वक पद्धतीने जगाला पुरविण्यास सुरुवात केली आणि सामान्य माणसाचे इंटरनेटशी असलेले नाते अधिकाधिक घट्ट होऊ लागले. लवकरच गुगलने सर्च, ईमेल सेवा, चॅटिंग क्षेत्रात आपले बस्तान बसविले आणि जाहिरातदारांच्या पाठिंब्याने हा हा म्हणता माहितीचा चेहरामोहराच बदलून टाकला. या व्यवसायात कमाविलेल्या अब्जावधी डॉलर्समुळे गुगल जगातल्या सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक बनली आणि सॅन फ्रान्सिस्को या तिचे प्रधान कार्यालय असणाऱ्या शहराचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाली.

यातून अल्पावधीत हजारो नवश्रीमंतांचा नवा वर्ग उभा राहिला आणि शहरात आहेरे आणि नाहीरे या दोन वर्गामधली आर्थिक दरी स्पष्टपणे वाढायला लागली. एकीकडे गुगलशी संबंधित नसलेले लोक रोजगार मिळविण्यासाठी संघर्ष करीत असताना दुसरीकडे गुगलच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयापर्यंत घेऊन जाणाऱ्या सर्व सोयींनी सुसज्ज वातानुकूलित बस सॅन फ्रान्सिस्को शहराच्या रस्त्यावरून धावू लागल्या, विनापरवाना सार्वजनिक बसस्टॉपवर थांबून तिथून आपल्या कर्मचाऱ्यांना बसमध्ये घेऊ लागल्या. ऑफिसला जायचा वेळ वाचतो म्हणून मग आहेरे वर्गातल्या लोकांनी बसस्टॉपजवळ घरे घेणे पसंत केले आणि रातोरात अशा जागांच्या किमती आकाशाला भिडल्या. यातून मग नाहीरे वर्गाला मध्यवर्ती भागात घरे मिळणे मुश्कील होऊ लागले, ज्याची परिणती गुगलच्या बससमोर निदर्शने करण्यात झाली आणि अशातच एकाने चिडून जाऊन गुगलच्या वातानुकूलित बसच्या खिडकीला दगड फेकून मारला. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी एरवी सार्वजनिक सभ्यतेसाठी नावाजलेल्या शहराचे नाव दंगल करणाऱ्या शहरांच्या नावात आले.

डग्लस रश्कॉफ यांचं हे पुस्तक पोर्टफोलिओ’- पेंग्विन यांनी जुलै २०१६ मध्ये प्रकाशित केलं.

 

– राहुल बनसोडे

rahulbaba@gmail.com