‘टु सर विथ लव्ह’ या गाजलेल्या कादंबरीचे कर्ते ई आर ब्रेथवेट हे अलीकडेच कालवश झाले. त्यांना ही ‘बुकमार्क’ची आदरांजली..
लेखकानं लिहितं असावं की ‘कर्तेपणा’सुद्धा लेखकात असावा, हा प्रश्न निव्वळ समीक्षकी काथ्याकुटाचा भाग म्हणून सोडून देता येणार नाही.. कार्यरत असणं, कर्तृत्व दाखवून देणं आणि मग लिहिणं असा क्रम ज्या अनेकांच्या जगण्यातून दिसला, त्यापैकी एक ई. आर. ब्रेथवेट हे होते. होते म्हणजे, अगदी परवाच्या १२ डिसेंबपर्यंत या जगात होते. ‘टु सर विथ लव्ह’ हा १९६७ चित्रपट अनेकांना माहीत असेल. यूटय़ूब किंवा टोरेंटवरून डाउनलोड करून तो अनेक तरुणांनीही पाहिला असेल. तो ज्या पुस्तकावरून बेतलेला आहे, त्या- त्याच नावाच्या – पुस्तकाचे ब्रेथवेट हे लेखक. त्या पुस्तकासाठीच ते अधिक ओळखले जातात. ते साहजिकही आहे, कारण पुस्तकातले ‘सर’ जरी निराळय़ा नावाचे असले, तरी प्रत्यक्षात ते हे ब्रेथवेटच. शिक्षक म्हणून केलेल्या कामापेक्षा ब्रेथवेट यांचं जगाकडे पाहणं अधिक महत्त्वाचं होतं, हे खरं तर नंतरच्या काळात दिसत राहिलं. ते एका अर्थानं संस्कृतीचे भाष्यकार ठरले. पण तोवर ब्रेथवेट यांची ‘टु सर विथ लव्ह चे लेखक’ ही प्रतिमा कायमची कोरली गेली होती.
ब्रेथवेट यांचं आयुष्य तब्बल १०४ वर्षांचं. अखेरची काही र्वष ते जर्जर अवस्थेत होते, पण त्याआधी अगदी २०१३ पर्यंत जगाबद्दलचं त्यांचं मत ते कुठे ना कुठे व्यक्त करत होते. त्यांचा तो अधिकारही होता. हा अधिकार कुठून आला? कोणी दिला?
याच्या उत्तरांसाठी ब्रेथवेट यांच्या आयुष्याकडे पाहावं लागेल. ब्रिटिश गयानात २७ जून १९१२ या दिवशी जन्मलेले ब्रेथवेट गयानातच मॅट्रिकपर्यंत शिकले, पुढे न्यूयॉर्कच्या महाविद्यालयात गेले. ते वर्ष होतं १९४०. अमेरिकी तरुण दुसऱ्या महायुद्धासाठी सेनादलांमध्ये दाखल होत होते. ब्रेथवेटदेखील हवाईदलात भरती झाले. प्रशिक्षणानंतर रीतसर वैमानिकही झाले. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर, विज्ञानाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये- केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. तिथंच जगण्याची धडपडही सुरू झाली. तिशी उलटत आलेली असताना पुन्हा नव्यानं आयुष्याची उभारणी करणाऱ्या ब्रेथवेट यांनी शिक्षक म्हणून अनुभव घेतला. घडण्याच्या प्रक्रियेवर, जगण्यातल्या सकारात्मकतेवर त्यांचा दृढविश्वास होता. आज त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहाताना लक्षात येतं की, कदाचित आधुनिकतावादाचं जे गोंदण वसाहतवादानं अनेकांच्या मनावर केलं, त्यालाच वेदना विसरून डागांऐवजी दागिना मानणाऱ्यांपैकी ब्रेथवेट होते. पण तसे तर आपले व्ही. एस. नायपॉलदेखील होते. परंतु नायपॉल प्रचंड निराळे. जगावर विश्वास असण्यापेक्षा, जगाकडे संशयानं पाहण्याची आणि जगातली माणसं नेमकी अशीच का वागतात याचं कुतूहल शमवण्याची वृत्ती नायपॉल यांच्याकडे अधिक होती.
याउलट ब्रेथवेट. त्यांच्याकडे माणसं बदलण्याचा आत्मविश्वास होता. त्यातून अख्ख्या जगावरच विश्वास ठेवण्याची वृत्तीही आपसूकच उमलली. त्यामुळेच, महायुद्धोत्तर काळातल्या गरीब – पण गौरवर्णीय- मुलांची आयुष्यं बदलण्याची आणि त्यांचा लाडका शिक्षक होण्याची कुवत त्यांच्यात आली. शिक्षक म्हणून न राहाता ते पुढे जात राहिले. ‘टु सर विथ लव्ह’ हे कादंबरी म्हणून लिहिलेलं आत्मपर पुस्तक (पहिली आवृत्ती : १९५९) , ही या बदलाची जगाला दिसलेली सुरुवात. पुढल्याच वर्षी ते पॅरिसच्या ‘व्हेटेरन्स फाउंडेशन’ या संस्थेत मानवाधिकार अधिकारी म्हणून रुजू झाले.
हे काम त्यांनी तीन र्वष केलं. तर पुढली तीन र्वष, पॅरिसमध्येच मुख्यालय असलेल्या युनेस्कोत व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या मायदेशाला- गयानाला २६ मे १९६६ या दिवशी स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून गयानाचं नागरिकत्व तर त्यांनी स्वीकारलंच, पण संयुक्त राष्ट्रांतले गयानाचे राजदूत म्हणून त्यांनी वर्ष-सव्वा वर्ष कामही केलं. मग १९६८-६९ मध्ये गयानाचे व्हेनेझुएला या देशातील राजदूत म्हणून त्यांची रीतसर नियुक्ती झाली.
संस्कृतींचा हा संवाद घडवून आणता-आणता, ब्रेथवेट लिहीतही राहिले होते. ‘पेड सर्व्हट’ ही मालक-नोकर, काळे-गोरे, गरीब-श्रीमंत संबंधांबद्दलची त्यांची कादंबरी १९६२ सालीच आली होती. पण १९६९ मध्ये वयाचं ५८ वं वर्ष जवळ येत असताना, इथून पुढे मात्र लेखक म्हणूनच जगायचं. असं त्यांनी ठरवलं. दक्षिण आफ्रिकेतून त्यांना ‘आमच्या देशावर लिहा’ असं निमंत्रण १९७३ साली आलं. पण त्या देशात टिपेला पोहोचलेल्या वर्णद्वेषाचं काहीसं सौम्यच चित्र ‘ऑनररी व्हाइट’ या पुस्तकात (पहिली आवृत्ती : १९७५) रंगवून, ते टीकेचे धनी झाले. मात्र १९६७ सालच्या ‘टु सर विथ लव्ह’ या सिनेमानं त्यांना दिलेली कीर्ती जगभर पसरलेली असताना, अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठानंच त्यांना लेखक-शिक्षक म्हणून राहण्याचं निमंत्रण दिल्यामुळे ते अमेरिकावासी झाले. फ्लोरिडा विद्यापीठ सोडल्यावरही अमेरिकेतच राहिले.
‘रिलक्टन्ट नेबर्स’ हे ब्रेथवेट यांचं पुस्तक अमेरिकेत कायमच्या वास्तव्याच्याही आधीचं- १९७२ सालचं आहे. त्यात रेल्वेप्रवासात एकमेकांशेजारी बसलेल्या कृष्णवर्णीय- गौरवर्णीय माणसांचा संवाद आहे. हे दोघेही पुरुष, विशेषत गौरवर्णीय- अहंगंड सोडत नाहीत, हे ब्रेथवेट यांनी या पुस्तकातून मांडलं. त्यांचा जग बदलण्यावरला विश्वास कमी झाला की काय, असा प्रश्न समीक्षकांनाही पडला. खूप नंतर, अगदी १९९० च्या दशकात ब्रेथवेट यांनी एका मुलाखतीत कबुली दिली- ‘हो, तसं झालं होतं खरं!’
तरीही ब्रेथवेट ओळखले जातात, ते कर्तृत्वाच्या शिखरावर असताना त्यांनी लिहिलेल्या ‘टु सर विथ लव्ह’ या पुस्तकामुळे! या पुस्तकाचे अनुवाद जगभरच्या २५ हून अधिक भाषांत झाले आहेत आणि त्यात लीना सोहोनी यांनी केलेल्या मराठी (प्रकाशक : मुक्तांगण प्रकाशन) अनुवादाचाही समावेश आहे.
ब्रेथवेट यांच्या ‘टु सर..’ विषयी ‘लोकप्रभा’च्या गेल्या वर्षीच्या ‘गुरुपौर्णिमा विशेषांका’मध्ये ओंकार पिंपळे यांनी विस्तारानं लिहिलं होतं. पुस्तकांतून भेटलेले शिक्षक, असा तो दीर्घ लेख होता. त्यापैकी ब्रेथवेट यांच्याविषयीचा उतारा असा :
‘‘दुसऱ्या महायुद्घात रॉयल एअरफोर्समध्ये यशस्वी कामगिरी बजावलेल्या त्यांना युद्धानंतर नोकरी मिळवण्यासाठी लंडनमध्ये वणवण भटकावं लागलं. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असूनही कातडीच्या काळ्या रंगामुळे त्यांना नकार पचवावे लागले. हताश झालेल्या त्यांना शेवटी लंडनमधील एका गलिच्छ, दरिद्री वसाहतीतील शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करावी लागते आणि मग सुरू होतो त्यांचा विद्यर्थीप्रिय शिक्षक होण्याकडे प्रवास. लंडनमधील या शाळेत विद्यर्थी ज्या सामाजिक, आर्थिक पाश्र्वभूमीतून येतात, ते पाहता त्यांच्याकडून सभ्य, सुसंस्कृत वागण्याची अपेक्षा करणंच मूर्खपणाचं ठरेल. वयाने थोराड, वांड असलेल्या या मुलांना मुळात ‘विद्यार्थी’ का म्हणायचं तेच कळत नाही. ते उर्मट, बेफिकीर, अर्वाच्य बोलणारे, आयुष्यात ध्येय वगैरे काय असतं, याची अजिबात कल्पना नसलेले असतात. त्यात त्यांचीही चूक नसते. या पाश्र्वभूमीवर ब्रेथवेट यांचं कर्तृत्व साहजिकच उठून दिसतं. त्यांना या मुलांना सुजाण, सुसंस्कृत, संवेदनशील माणूस म्हणून घडवायचं असतं.
क्रमिक शिक्षणाची गोडी लावणं, अभ्यासाला असलेल्या पुस्तकांच्या मदतीने परस्परांना, जगाला समजावून घेणं, साहित्य-कला यांचा आस्वाद घ्यायला शिकवणं, त्याविषयी चर्चा करणं, हे सगळं ब्रेथवेट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसं साध्य केलं, हे वाचणं रोचक ठरतं.
ब्रेथवेट यांनी मुलांशी सुसंवाद केला, जाणीवपूर्वक वाढवत नेला. त्यांच्यातील रागाचे रूपांतर प्रेमात, बंडखोरीचे रूपांतर नेतृत्वाच्या दिशेने कसे जाईल, याची काळजी घेतली. मुलांची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक पाश्र्वभूमी लक्षात घेत, प्रसंगी त्यांच्या आई-वडिलांशी बोलून मुलांमध्ये चांगले बदल घडवले. म्हणूनच आपल्या बिघडलेल्या किंवा बिघडू लागलेल्या मुलांना घडवणाऱ्या या सरांबद्दल पालकांच्या डोळ्यांत कृतज्ञता आणि आपुलकी तरळायची. हे सगळं करताना ‘मी केलं’ हा अहंकार त्यांच्यापाशी नव्हता तर रोज नव्याने येणाऱ्या अनुभवांतून मी शिकलो, हे ते मान्य करतात. सैन्यदलात असूनही करडय़ा शिस्तीचा बडगा न उगारणारे, वर्णद्वेषाचे मानहानीकारक अनुभव घेऊनही मनात किंचित कटुता न ठेवणारे ब्रेथवेट हे समंजस, संवेदनशील शिक्षक असल्याचं कळतं. ’’
.. पुढे कुठेतरी ब्रेथवेट यांच्याकडे अहंकार आला असावा.. कुठे ते माहीत नाही. कदाचित गयानाचे राजदूत असताना असेल.. पण आलाच असणार.. ज्या गंडांवर मात करण्याची ईर्षां त्यांनी दाखवली होती, ते आता बदलणार नाहीत हे ‘सत्य’ त्यांना कसं माहीत झालं? उतारवयात जगाकडे पाहाताना थोडीफार हताशाच त्यांना आली, ती का?
कदाचित उतारवय एवढंच कारण असेल. कदाचित नसेल. पण ब्रेथवेट आवडतात. पुन्हापुन्हा वाचावेसे वाटतात. संवेदनशील शिक्षक, समीक्षक यांच्यापासून ते फक्त ‘हाउ टू..’ किंवा छान कसं जगायचं हेच सांगणारी पुस्तकं वाचणाऱ्या तरुणांना सुद्धा त्यांचं ‘टु सर..’ हे पुस्तक हवंसं वाटतं..
एवढंसुद्धा, ब्रेथवेट यांना ‘ग्रंथमानव’ म्हणण्यासाठी पुरेसं आहे!