प्रत्येक काळाची एक संकल्पना असते, असे म्हणतात. तसा सध्याच्या काळ ‘राष्ट्रवाद’ या संकल्पनेचा आहे. विद्यार्थी संघटनांमधील वादांपासून समाजमाध्यमांवरील चर्चापर्यंत ती पसरली आहे, परंतु त्याने ही संकल्पना स्पष्ट होण्याऐवजी गोंधळच अधिक वाढतो आहे. गेल्या वर्षभरात ते दिसून आलेच. अशा वेळी ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना नेमकी काय आहे, ते हे पुस्तक सांगते..

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जे.एन.यू.) कन्हैया कुमार प्रकरण आणि हैदराबादेतील रोहित वेमुला प्रकरणानंतर देशभर सर्वत्र राष्ट्रवाद या विषयावर चर्चा सुरू झाली. कन्हैयाच्या अटकेनंतर जेएनयूमध्ये प्रक्षोभ उसळला. या प्रक्षोभाचं रूप अिहसात्मक आणि रचनात्मकसुद्धा होतं असं म्हणावं लागेल, कारण धरणं धरणे, उपोषण आदी मार्गानी व्यक्त न होता हा प्रक्षोभ एका व्याख्यानमालेच्या रूपानं व्यक्त करण्यात आला. १७ फेब्रुवारी ते १७ मार्च (२०१६) अशी सलग महिनाभर ही व्याख्यानमाला झाली, तीही केवळ ‘राष्ट्रवाद’ या विषयाला वाहिलेली. या मालेत देशभरातील डाव्या विचारांच्या अग्रगण्य अशा एकूण चोवीस विचारवंतांची व्याख्यानं झाली. त्या सर्व व्याख्यानांचा लिखित संग्रह म्हणजे ‘व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो’ (अर्थात ‘देशानं खरोखर काय जाणून घेण्याची गरज आहे’) हे इंग्रजी पुस्तक. यातील पाच लेख िहदीतून आहेत. एकूण ३३९ पानांचा हा दस्तावेज म्हणजे राष्ट्रवाद या विषयावरचा समकालीन माहिती-कोष आहे. विशेषत: सोशल मीडियावर राष्ट्रवाद-राष्ट्रीयता-राष्ट्रप्रेम याची चर्चा करणाऱ्या आणि रा. स्व. संघप्रणीत तथाकथित ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ म्हणजेच भारतीय राष्ट्रवाद असा गरसमज बाळगणाऱ्या तरुणांनी वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे.

या पुस्तकाला जानकी नायर यांची सटीक प्रस्तावना असून सर्वच्या सर्व २४ भाषणांना पुस्तकात संग्रहित केलंय. गोपाल गुरू, निवेदिता मेनन, आयेशा किडवई, मृदुला मुखर्जी, लॉरेन्स लीआंग, जयती घोष, रोमिला थापर, मकरंद परांजपे, प्रभात पटनायक, सतीश देशपांडे, सत्यजीत रथ, आनंदकुमार यांसारख्या प्रसिद्ध बुद्धिजीवी-कार्यकर्ता, विचारवंतांचे लेख (म्हणजे भाषणं) यात आहेत. कोणत्या लेखकानं काय म्हटलंय हे व्यक्तिश: मूल्यमापन करून सांगणं (विस्तारभयास्तव) व्यवहार्य नसल्यानं पुस्तकातील काही महत्त्वाच्या प्रकरणांचा गोषवारा इथं देत आहे. अर्थात; सगळीच प्रकरणं दर्जेदार आणि सकस असून त्यामुळं हे पुस्तक एक उत्तम बौद्धिक मेजवानी ठरतं. राष्ट्रवादाचं सत्तालक्ष्यी प्रयोजन, युरोपात उदय झालेल्या या कल्पनेचा जगभरातील आविष्कार, राष्ट्रवादाचं भाषिक, प्रादेशिक, वांशिक, धर्मीय, जातीय अभिसरण; राष्ट्रवादाच्या आडून आणला जात असलेला सांस्कृतिक दहशतवाद-सत्तावाद, राष्ट्रवादाचा राज्यघटनेच्या दृष्टीतून असलेला फोलपणा, राष्ट्रवादाचे प्रकार आणि परिणाम या सर्वावर हे पुस्तक प्रभावी आणि सुसंगत भाष्य करतं.

काय सांगतं हे पुस्तक?

राष्ट्र म्हणजे नेमकं काय हे चर्चिल्याशिवाय राष्ट्रवादाची चर्चा होऊ शकत नाही. गोपाल गुरू यांच्या लेखात ती चर्चा आली आहे. राष्ट्र-राष्ट्रीयता-राष्ट्रप्रेम-राष्ट्रवाद या संपूर्ण वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्या कोणी कोणावर लादू शकत नाही. राष्ट्र आणि राष्ट्रीयता माणसाला जन्मानं मिळते. राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नाही, त्यात राहणारी जिवंत माणसं म्हणजे राष्ट्र. देश, राष्ट्र, राष्ट्रीयता यांना संकुचित करतो तो राष्ट्रवाद. राष्ट्रावर निष्ठा म्हणजे सरकारवर निष्ठा असा सर्रास चुकीचा अर्थ राष्ट्रवादाच्या नावावर सांगितला जात आहे. राष्ट्र म्हणजे सरकार नव्हे. ‘नेशन’ ते ‘नेशन-स्टेट’ या संकल्पनांचा या पुस्तकानं केलेला ऊहापोह वाचकांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. मुळात भारतात ‘राष्ट्र’ किंवा ‘देश’ म्हणजे स्वत:चा जन्म-प्रांत असतो. महाराष्ट्रात राहणारे मारवाडी लोक राजस्थानात जात असतील तर ‘देशावर जातोय’ असं म्हणतात. ज्या गावात आपण जन्मतो ते गावच आपला ‘देश’ असते ही अस्सल भारतीय कल्पना आहे. (प्रसिद्ध नाटककार अतमजीतसिंग यांनी ही कल्पना त्यांच्या तब्बल १९ नाटकांमधून आधीही फार सकसरीत्या, सेंद्रिय स्वरूपात मांडली आहे). राष्ट्रप्रेम हा सहजभाव असायला हवा, तो सक्तीचा विषय असू शकत नाही.

भारत हे ‘राष्ट्र’ म्हणून इंग्रज आमदनीत उदयास आलं. त्यापूर्वी ५०० स्वतंत्र संस्थानांचा हा सलग भूप्रदेश होता. साहजिकच राष्ट्र ही ओळखच नसल्यानं ‘राष्ट्रवाद’ अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. अगणित भाषा, जगभरातले सगळे धर्म, असंख्य जाती, शेकडो संस्कृती आणि सर्व प्रकारच्या वैविध्यांसह सर्वाना सामावून घेणारी भूमी ही भारताची ओळख कुठल्याही संकुचित राष्ट्रवादापेक्षा व्यापक होती. टोकाच्या विसंवादी जीवनशैली इथं गुण्यागोिवदानं, एकमेकांच्या संस्कृतीत हस्तक्षेप न करता राहिल्या आहेत. ‘राष्ट्रवाद’ ही भारतीय कल्पना, संकल्पना नाही. युरोपात जन्मलेली ही कल्पना आहे. तिचं सर्वात टोकाचं उदाहरण म्हणजे क्रूरकर्मा हिटलर. या हिटलरनं ज्यू नागरिकांवर अनन्वित अत्याचार करण्यासाठी, त्यांना गॅस चेंबरमध्ये घालून मारण्याची स्वत:ची क्रूर मनीषा पूर्ण करण्यासाठी ‘जर्मन राष्ट्रवाद अर्थात नाझीवाद’ या आभासी संकल्पनेचा वापर केला आणि जगाला हादरवून सोडलं. राष्ट्रवादाचं हे वरकरणी गोंडस दिसणारं विषारी पिल्लू युरोपात जन्माला आलं आणि जगभर वाढलं. अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या महान तत्त्ववेत्त्यानं ज्याला ‘गोवराची साथ’ म्हटलं, ती साथ जगभरातील सत्ताधीशांनी आपल्या सत्ता राखण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी हेतुत: पसरवली. आज भारतात नेमकं हेच होताना दिसतंय.

भारतीय म्हणावा असा राष्ट्रवाद कोणता आणि तो कधी सुरू झाला? इंग्रज राजवट आपलं शोषण करणारी आहे हे लक्षात आल्यावर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाची बीजं पडली. एकोणिसाव्या शतकात आपले नेते भारताच्या राष्ट्रवादावर चिंतन करू लागले. सर्वप्रथम दादाभाई नौरोजींनी तशी मांडणी त्यांच्या सुप्रसिद्ध ‘ड्रेन थेअरी’च्या स्वरूपात केली. इंग्रजी राजवट इथून स्वस्तात कच्चा माल तिकडे युरोपात नेते आणि त्यावर प्रक्रिया करून जो तयार माल विक्रीसाठी भारतात आणते. तो दामदुप्पट दराने भारतीयांना खरेदी करावा लागतो. अंतत: भारतीय भांडवल परदेशात जाऊन आपला देश गरीब होतो असा सिद्धांत त्यांनी मांडला. पुढे न्या. महादेव गोिवद रानडे यांनी त्यावर चिंतन केलं. ‘राष्ट्रवाद’ हा शब्द भारतात न्या. रानडे यांनी सर्वप्रथम वापरला, कारण त्या आधी ही संकल्पनाच भारतात नव्हती. दादाभाई नौरोजी यांच्यापासून सुरू झालेला आणि रानडे, गोखले, टिळक, गांधी यांनी पुढे विकसित केलेला भारतीय राष्ट्रवाद हा ‘आर्थिक राष्ट्रवाद’, ‘सुधारणावादी राष्ट्रवाद’ अशा स्वरूपाचा आहे. ‘स्वदेशी’चा पुरस्कार हे त्याचं एक बाह्य़रूप. हा सगळा भारतीय राष्ट्रवाद मुळात आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा आहे; तो सांस्कृतिक, जातीय किंवा धार्मिक, वांशिक, भाषिक स्वरूपाचा नाही. पंडित नेहरूंची ‘आयडिया ऑफ इंडिया’ त्याच परंपरेतून येते. एकोणिसाव्या शतकातील भारतीय (आर्थिक-राजकीय-सुधारणावादी) राष्ट्रवाद आणि युरोपातील (संकुचित) राष्ट्रवाद यातील मुख्य फरक हाच. हे पुस्तक हा फरक अनेक ठिकाणी सोदाहरण दाखवून देतं. त्याही पुढे जाऊन संकुचित राष्ट्रवादापेक्षा विश्वव्यापी मानवतावाद मोठा आहे हा मुद्दाही हे पुस्तक ठळकपणे मांडतं. दोन महायुद्धांनंतर आपण संयुक्त राष्ट्रसंघ बनवण्यापर्यंत मजल मारली असली तरी ‘वैश्विक सरकार’च्या कल्पनेला आपल्या पुढच्या पिढय़ा साकार करतील, असा आशावाद देखील या पुस्तकात व्यक्त केला गेला आहे.

राष्ट्रवादाच्या सोयीसाठी इतिहास बदलले आणि भूगोल बदलण्याचा प्रयत्न केला जातो. जगप्रसिद्ध इतिहासकार एरिक हॉब्सबॉम म्हणतो की, ‘राष्ट्रवादाच्या हाती इतिहास देणं म्हणजे जणू काही अफूचं व्यसन असलेल्याच्या हाती खसखस देणंच आहे.’ जसा अफूचा व्यसनी खसखसीतून लीलया अफू बनवून खाईल तसाच राष्ट्रवादानं पछाडलेला माणूस इतिहासाचा वापर करील. थोडक्यात, इतिहास हा राष्ट्रवादाचा स्रोत आहे आणि तो हातात पडला की त्याला तोडून-मोडून नवा राष्ट्रवाद निर्माण करता येतो. इतिहासावरची प्रतिक्रिया म्हणून आजचा राष्ट्रवाद जन्माला येतो, असा मुद्दाही रोमिला थापर यांनी मांडला आहे. एका समुदायाची ओळख म्हणजे इतिहास नसतो, तर सर्वाची करून दिलेली ओळख म्हणजे इतिहास असतो. इतिहास हा समाजातील बंध असावा, समाजात फूट पाडण्याचं साधन नसावा, हे भान आजच्या राष्ट्रवादाला नाही असा त्यांचा मुद्दा आहे. राष्ट्रवाद आणि भांडवलवाद हे एकमेकांना कसे पूरक आहेत यावरही त्या भाष्य करतात.

भारतीय राष्ट्रवादासमोर सांस्कृतिक राष्ट्रवादाचं आव्हान नेमकं कोणत्या स्वरूपात आहे यावरही या पुस्तकात थोडीफार चर्चा आहे. जीना यांचा ‘द्विराष्ट्रवाद’ आणि गोळवलकर यांचा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीना मुस्लीम राष्ट्राची मागणी करतात, तर गोळवलकर िहदू राष्ट्राची. एक विसंवाद मात्र लेखकांकडून नजरेआड झाल्यासारखा दिसतो तो हा की, आज जे सांस्कृतिक ‘राष्ट्रवाद’ हा विषय बोलत आहेत त्यांचा राष्ट्रवाद पराकोटीच्या विसंगतीतून, किंबहुना संभ्रमावस्थेतून आलेला आहे. जो राष्ट्रवाद आज प्रत्येकाला राष्ट्रभक्तीची सक्ती करत आहे तो राष्ट्रवाद स्वत: बराच मोठा काळ राष्ट्रभक्त नव्हता ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रभक्तांना घटना मान्य असण्याची अपेक्षा आहे, पण आजचे राष्ट्रभक्त घटनेला मनातून मानतात याचा पुरावा हाती लागत नाही. राष्ट्राच्या अभिमानाची जी प्रतीकं असतात त्या सर्वावर या राष्ट्रभक्तांनी स्वत:च वेळोवेळी प्रश्नचिन्ह लावलं आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रपिता अशा तीन राष्ट्रीय प्रतीकांची वर्षांनुवष्रे अवहेलना करणारेच आज सगळ्या देशाला राष्ट्रवाद शिकवत आहेत हाच मोठा विसंवाद नाही का?

या पुस्तकात केंद्रस्थानी असलेल्या ‘राष्ट्रवाद’ या विषयालाच वाहिलेलं ‘विचारवेध संमेलन’ पुण्यात नुकतंच सलग दोन दिवस पार पडलं. या संमेलनात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. हेमंत गोखले यांनी ‘राष्ट्रवाद’ हा शब्द राज्यघटनेत एकदाही आलेला नाही हे सांगत असतानाच घटना ही व्यक्तीला केंद्रस्थानी मानते, राष्ट्राला नाही, हे स्पष्ट केलं. प्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी ‘राष्ट्रवाद आणि लोकशाही’ या कशा परस्परांना छेदणाऱ्या कल्पना आहेत यावर विवेचन केलं. सदर पुस्तकातील निवेदिता मेनन यांचा ‘राष्ट्रवाद बनाम जनवाद’ हा िहदी लेख त्याच विषयावर लिहिलेला आहे. नागालॅण्ड, लडाख येथील लोकांना उत्तर भारताच्या सवर्णाच्या संस्कृतीत कोंबून सांस्कृतिक राष्ट्रवाद साधला जाऊ शकत नसतो, हेच हा लेख सांगतो.

ज्या स्वरूपाचा राष्ट्रवाद सध्या सांगितला जात आहे तो भारतात रवींद्रनाथ टागोर, जे. कृष्णमूर्ती, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी स्पष्टपणे नाकारला आहे. भारतीय परंपरावादी मनाला सध्या हा राष्ट्रवाद आपलासा वाटत असला तरी वस्तुस्थिती अशी आहे, की आपल्या परंपरेनंदेखील हा संकुचित राष्ट्रवाद नाकारलेला आहे. अगदी वेदसुद्धा आपलं वर्णन ‘पृथ्वीचे पुत्र’ असं करतात, ज्ञानेश्वरी ‘हे विश्वची माझे घर’ म्हणते, देश नव्हे. विनोबा भावे ‘जय जगत’ म्हणत असत. विविधता, बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता हेच आपलं भारतीयांचं बलस्थान आहे. ही व्यापकता कायम राखली पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर आपण हा संकुचित राष्ट्रवाद नाकारला पाहिजे हाच या पुस्तकाचाही आशय आहे. कन्हैया प्रकरणाने सुरू झालेली राष्ट्रवादाची चर्चा बरोबर एका वर्षांनंतर गुरमेहरच्या प्रकरणात आज चालू आहे. जे काही चाललंय ते उन्मादक आणि वाईट असलं, तरी प्रत्येक वाईटाला एक चांगली किनार असते. जेएनयूपासून पुण्याच्या विचारवेध संमेलनापर्यंत आपली तरुण पिढी सर्वत्र गर्दी करून राष्ट्रवादावरची चर्चा आवर्जून ऐकत आहे, जागोजागी या राष्ट्रवादाला वैचारिक विरोध करत आहे, हीच ती रुपेरी किनार. या पुस्तकानं अशा हजारो तरुणांना आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या लढय़ांना वैचारिक पाठबळ पुरवलं असं म्हणावं लागेल.

  • ‘व्हॉट द नेशन रियली नीड्स टू नो’
  • संपादन : जेएनयू टी. अ.
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे : ४०० किंमत : २९९ रुपये

 

डॉ. विश्वंभर चौधरी

dr.vishwam@gmail.com