एरवी हे पुस्तक डॉक्टरी पेशातले अनुभव सांगणारे.. पण या मेंदू-शल्यचिकित्सक डॉ. पॉल कलानिथींना स्वत:च्या कर्करोगाविषयी कळते आणि त्यांचे मृत्यूला सामोरे जाणे सुरू होते.. बाकी पुस्तकाबद्दल मतभेद कितीही असोत, स्वत:चा मृत्यू जवळ येत असताना कलानिथींनी लिहिलेली पाने ही डोस्टोव्हस्कीच्या तोडीची वाटतात.. असे का होते? मृत्यू समोर सयंत्र येतो तेव्हा वाचकही का ओढला जातो, याचं हे ‘निदान’ ..
आपला स्वत:चा मृत्यू हे मानवी विचारक्षमतेला पडलेले एक सार्वकालिक आणि न सुटलेले कोडे आहे. अनेक प्रतिभावंतांच्या विविध प्रकारच्या साहित्यांतील (आणि इतर कलाप्रकारांतील) वर्णने वाचून आपण ही तहान भागवण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ, ‘मरणारच आहे ना गं मी आता गौरी’ या दिनकर कर्वे यांनी गौरी देशपांडे यांना विचारलेल्या प्रश्नाची गोष्ट किंवा टॉलस्टॉयचे ‘डेथ ऑफ इव्हान इलीच’. ओरहान पामुकने ‘माय नेम इज रेड’ या त्याच्या कादंबरीत त्यातील एका पात्राच्या स्वत:च्या मृत्यूकडे होणाऱ्या वाटचालीदरम्यान मनात उठणाऱ्या भावभावनांचे अतिशय संवेदनशील चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या स्वत:च्या निश्चितपणे जवळ येत जाणाऱ्या मृत्यूच्या अगदी नजीकच्या काळातील मानसिक आणि शारीरिक परिस्थितीचे सर्वात जिवंत आणि ऑथेंटिक वर्णन दिवंगत डॉ. पॉल कलानिथी यांच्या ‘व्हेन ब्रेथ बिकम्स एअर’ या पुस्तकात वाचायला मिळते. याची तुलना डोस्टोव्हस्की यांच्या ‘द हाऊस ऑफ डेड’ या पुस्तकातील वर्णनांशी करता येईल.
पॉल कलानिथी यांचे वडील हृदयविकारतज्ज्ञ असतात. ते आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित होतात. पॉल अमेरिकेत साहित्य हा विषय घेऊन पदवी मिळवतात आणि नंतर फिलॉसॉफी या विषयात पदव्युत्तर पदवीही घेतात. त्यामुळे अनेक कवी, लेखक, तत्त्वचिंतक यांच्या साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होतो आणि हे सगळे उल्लेख पुस्तकात सतत येत राहतात. नंतर पॉल वैद्यकीय क्षेत्राकडे वळून न्यूरोसर्जरी (मेंदूच्या शल्यक्रिया करणारे डॉक्टर) या विषयात रेसिडेंट होतात आणि अत्यंत कर्तबगारपणे हा कोर्स संपवत आणून आता प्रचंड मानाची आणि पगाराची कन्सल्टंट ही पोस्ट मिळविण्याच्या बेतात असतानाच त्यांना खूप पुढे गेलेला, पसरलेला, फुप्फुसाचा आणि मणक्याचा कॅन्सर झाल्याचे समजते. बोरकरांच्या कविकल्पनेतील ‘सयंत्र’ मृत्यू त्यांच्यासमोर आपली सगळी जीवघेणी शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय (होय! वैद्यकीयसुद्धा-) शस्त्रे घेऊन उभा ठाकतो. या आजाराशी केलेली जीवघेणी झटापट, या दरम्यानच्या काळातील पत्नी (ल्यूसी), आई, वडील, भाऊ, मित्र यांची अस्वस्थ घालमेल, अत्यंत मर्यादित असणाऱ्या आयुष्याच्या प्राधान्यक्रमांचे यक्षप्रश्न, स्वत: डॉक्टर असल्याने निश्चित आणि अगदी नजीक असणाऱ्या मृत्यूच्या काळातील डोळस विचार, समाधान अंतत: कशात असते याचे अगदी अखेपर्यंत केलेले विश्लेषण आणि शेवटी त्यांच्या मृत्यूचा त्यांच्या पत्नीने लिहिलेला टवटवीत आणि हृद्य रिपोर्ताज असे या पुस्तकाचे जनरल स्वरूप आहे.
पॉल कलानिथी यांचे ऐन तारुण्यात अकाली दु:खद निधन झाल्यामुळे आपण या पुस्तकाचे परीक्षण उगीचच कृत्रिम, कळवळ्याने, सहानुभूतीपूर्वक करता कामा नये (त्यांना न्यूरोसर्जन ही डिग्री देण्यासाठी त्या हॉस्पिटलमधील सीनियर डॉक्टरांनीसुद्धा अशी अनुकंपा नाकारली, हा पुस्तकात उल्लेख आहे.).
साहित्याचा अभ्यास असल्यामुळे आणि लिखाणाचे तंत्र माहीत असल्यामुळे सुरुवातीचे बरेचसे लेखन परिणामाकडे दृष्टी ठेवून केलेले (गोळीबंद/पर्ट) असे झाले आहे. वैद्यकीय शिक्षणातील गमतीजमती, ताणतणाव, ऑपरेशनची वर्णने, रात्रंदिवसचे काम, पेशंटची मजेदार वर्णने इ. मसालेदार गोष्टी असल्याने हे पुस्तक खूपच वाचनीय झाले आहे. अर्थात, वैद्यकीय क्षेत्रातील अशी अनेक पुस्तके आहेत. मनुष्य स्वभावाच्या अंतर्मनातील खोल कप्प्यांवर झगझगीत प्रकाशझोत पाडणारे मूल्ययुक्त अभिजात साहित्य वाचताना होते, तसे काही या पुस्तकात होत नाही. अनुभवाचे सार्वत्रिकीकरण होऊन काही तरी मानवतेचे सार हाती लागते, तसे येथे काही होत नाही. हे लिखाण बरेचसे किस्सेवजा (अनेक्डोटल) राहते. अत्यंत सोप्या िहदुस्थानी इंग्रजीत हे पुस्तक असल्यामुळे ते पटकन वाचून होते. गळा भरून येणारे, डोळ्यात पाणी तरळवणारे प्रसंग सतत येत राहतात.. आणि पुस्तक सोडवत नाही! अमेरिकेतील ‘टॉप टेन खपाच्या’ पुस्तकात याचा समावेश बराच काळ आहे. यावर एक छान हॉलीवूड सिनेमा नक्की येईल असे वाटते.
पान क्र.१८४ ते १९९ या पंधरा पानांत जेव्हा पॉल आयसीयूत अ‍ॅडमिट होतो आणि प्रत्यक्ष जन्म-मृत्यूच्या सीमारेषेवर घुटमळत राहतो, तेव्हा त्या परिस्थितीत त्याचे आपल्या परिस्थितीचे वर्णन आणि विचार एकदम प्रांजळ आणि जिवंत उतरतात आणि ते डोस्टोव्हस्कीच्या उंचीला जाऊन पोहोचतात हे आपण सुरुवातीला म्हटलेच आहे. स्वत:च प्रत्यक्ष नक्की लवकरच मरत आहोत याची सुस्पष्ट जाणीव लेखकाला प्राणिज सुगमतेकडे घेऊन जाते. हे प्रत्यक्ष वाचलेच पाहिजे. आणखी एक, मृत्यू समोर दिसू लागला की माणूस ज्याचा आधार घेतो त्यात देव-धर्म, पुनर्जन्म या गोष्टी सहसा महत्त्वाच्या असाव्यात. मराठीतील काही थोर लेखकांनी, समाजसुधारकांनी आपल्या अंतकाळात काही अंशी देवाच्या कल्पनेची भलावण केल्याचे आपल्याला वाचायला ऐकायला मिळते. चर्चच्या भेटीचा एक तुरळक प्रसंग सोडता हा आधार लेखकाने कोठेही घेतलेला दिसत नाही. स्वच्छ, विवेकी, डोळसपणे लेखक आपल्या अंतकाळात वावरतो. आपले मातीचे पाय न लपवता, येईल तसे मृत्यूचे वास्तव समजूतदारपणे स्वीकारणे आपल्या मनात घर करून राहते.
दोन गोष्टींनी मला फार विचारप्रवृत्त केले. त्यांची पत्नी ल्यूसी (ही बहुधा पूर्णपणे अमेरिकन असावी. पॉल यांच्या लेखनानंतर तिने अगदी अमेरिकन ‘मॅटर ऑफ फॅक्ट’, ‘नो नॉनसेन्स’ पद्धतीने पॉलचा मृत्यू आणि त्याचे दफन याचा उपोद्घात लिहिला आहे. माझ्यासारख्या कोरडय़ा माणसाचा सुद्धा ते वाचत असताना गळा भरून आला.) आणि त्यांच्यात कडवट दुरावा येत असताना (ब्रेकअप होत असताना) पॉल यांना कॅन्सर झाल्याचे लक्षात येते. आणि मग ही मुलगी त्यांना अखेपर्यंत निष्ठेने साथ देते. पॉल यांचे शुक्रजंतू (स्पर्म) वापरून ल्यूसी यांना टेस्ट टय़ूब बेबी तंत्रज्ञानाने मुलगी होते. आपल्या मृत्यूनंतर आपले कन्टिन्यूएशन या जगात आपल्या मुलीद्वारे सुरू राहील हे त्यांचे अंतिम समाधान (सोलेस) असते. अगदी मरण्याआधी काही तास व्हेंटिलेटरसदृश मशीनवर असताना ते आपल्या काही महिन्यांच्या मुलीला आपल्या कुशीत खेळण्याचे सुख भोगून धर्याने इच्छामरण पत्करतात. ही प्रेग्नन्सी टाळण्याचा एक क्षीण प्रयत्न ल्यूसीने केल्याचे जाणवते. मुलाबाळांद्वारा जगात मृत्यूनंतर जिवंत राहण्याची संकल्पना भारतीय आहे की सर्व समाजांत ती तशीच असते? त्यातूनही अमेरिकेसारख्या कोरडय़ा संस्कृतीत मरताना बायकोच्या गळ्यात मुलीची धोंड बांधायची (याचा उल्लेख पुस्तकात आहे) आणि दुसरे म्हणजे आपल्याला लहान वयात कॅन्सर झाला म्हणजे ही त्रासदायक जनुके आपल्या शुक्रजंतूत असण्याची शक्यता असताना मूल होऊ द्यायचा (?) हट्ट करायचा का, हा मोठाच नतिक प्रश्न मला भेडसावला.
या पुस्तकात असे अनेक विचारदुवे आपल्याला सतत मिळत राहतात. लिटरेचर सोडून मेडिकलला जाण्याचे कारण सांगताना लेखक लिहितो की, साहित्याभ्यासाचे क्षेत्र आज राजकीय जाणिवांमध्येच अधिक अडकल्यासारखे झाले आहे (आजच्या आपल्या विद्यापीठीय शैक्षणिक व्यवस्थेत हे भलत्याच अर्थाने खरे आहे – जाणिवा नव्हे, थेट राजकारणच) किंवा एका तरुण उच्चशिक्षित न्यूरोसर्जनच्या ट्रीटमेंटमध्येसुद्धा विमा कंपन्यांच्या धोरणाचे अडसर मधूनमधून डोकावत राहतात (आपणही घाईघाईने त्या दिशेने वाटचाल करीत आहोत.). वगरे अक्षरश: अनेक.
अशा अनेक खूप रसपूर्ण गोष्टी मी मुद्दाम इथे सांगितल्या नाहीत, कारण लोकांनी हे पुस्तक वाचावे असे मला वाटते.
प्रत्येक प्रकारच्या वाचकाला वेगवेगळ्या प्रकारचा आंनद देण्याची क्षमता असलेले हे पुस्तक, ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर वाचावे अशी मनापासून शिफारस करूनच हे लिखाण थांबवतो!

‘व्हेन ब्रेथ बिकम्स एअर’
– पॉल कलानिथी
प्रकाशक : बोड्ली हेड,
पृष्ठे : २५६ , किंमत : ४१९ रु.

डॉ. आशुतोष दिवाण