अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या ‘ट्विन टॉवर्स’चे दोन्ही मनोरे विमानं घुसवून उद्ध्वस्त करण्याच्या घटनेला येत्या रविवारी १५ र्वष होतील. ही अमेरिकेला हादरवणारीच नव्हे तर बदलून टाकणारी घटना होती. इंग्रजी साहित्यावरही तिचा प्रभाव पडणारच होता. तो कसा पडला?

‘साहित्यातली ‘अद्वितीय शोकात्म घटना’ जशी असावी, तशीच ‘९/११’ ही घटना’ असं निरीक्षण प्रख्यात तत्त्वचिंतक होमी के. भाभा  यांनी २०१३ सालच्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जाहीरपणे नोंदवलं होतं! मात्र ‘असं घडलं ९/११’ किंवा ‘का घडलं ९/११?’ या प्रकारातली पुस्तकं म्हणजे काही ‘साहित्य’ नव्हेत असं इराणी-अमेरिकी लेखक रेझा अस्लन यांनी याच व्यासपीठावरून सांगितलं होतं.  ‘साध्या’ माणसांबद्दल, माणसांच्या समूहांबद्दल, त्यांच्या एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टीबद्दल जे लिहिलं जातं तेच ललितसाहित्य, यावर या दोघांचंही सुरुवातीलाच एकमत कसं झालं, हे आजही ‘यूटय़ूब’मुळे पाहता येतं.  मात्र त्या संवादानंतर तीन वर्षांनी जे दिसतं आहे, त्यातून ‘९/११च्या साहित्या’चे विविधांगी आयाम लक्षात येईल. अशा तीन आयामांची किंवा मितींची इथं चर्चा करू : (१) लेखकांनी घेतलेला पुनशरेध, (२) अमेरिकी विद्यापीठांत ‘९/११ नंतरचं साहित्य’ या विषयाच्या विशेष अभ्यासासाठी अभ्यासक्रम सुरू होणं आणि त्यांवर प्रसंगी वादही उद्भवणं, (३) ९/११चं साहित्य म्हणजे केवळ ललित साहित्य असं मानणं वा न मानणं.

‘९/११ घडल्यानंतर, ललितलेखनात काहीच अर्थ नाही, असं जगभरच्या अनेक लेखकांना वाटलं असेल.. मला तरी वाटलं. लेखन सोडून द्यावं, असंही वाटलं..’ असं मार्टिन अ‍ॅमिस या ब्रिटिश लेखकानं ‘द व्हॉइस ऑफ द लोनली क्राऊड’ या लेखात (‘द गार्डियन’, १ जून २००२) लिहिलं होतं. मात्र याच लेखाचा शेवट,  ‘९/११नं लेखकांपुढे गुणात्मक आव्हान उभं केलेलं नाही, कारण लेखक अद्यापही आपापला- व्यक्तिगत- सूर जपताहेत. मुक्या गर्दीत सामील होणं नाकारताहेत’ असा होता! हे खरं ठरलं. पुढे अनेक लेखकांनी ‘९/११’ नंतरच्या दुभंगलेल्या समाजाकडे आरपार पाहून नवा शोध घेण्याचा प्रयत्न केला.. हा शोध माणसातल्या माणूसपणाचा होता, त्यामुळे साहित्य बहरलं! इयान मॅकयूनची ‘सॅटरडे’ ही कादंबरी ९/११चा थेट उल्लेख न करताही वाचकाला केवळ त्याच घटनेची आठवण देत राहते. ही कादंबरी ९/११ मुळे झालेले सांस्कृतिक बदल टिपणारा दस्तावेज मानली जाते. मूळचे अल्जेरियन लेखक यास्मिना खद्रा यांनी फ्रेंच भाषेत लिहिलेलं कादंबरीत्रय ‘द स्वॅलोज ऑफ काबूल’, ‘द अ‍ॅटॅक’ आणि ‘द सायरन्स ऑफ बगदाद’ या नावांनी इंग्रजीत आलं. त्याहीनंतर (२००७) मोहसिन हमीद यांची ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ ही कादंबरी आली. त्यावर मीरा नायर यांनी त्याच नावाचा चित्रपटही (२०१२) बनवला. ‘नेदरलॅण्ड’ ही जोसेफ ओ’नील यांची २००८ सालची कादंबरी ९/११ पासून सुरू होते, पण ती फक्त ९/११ बद्दलची कादंबरी नव्हे असं समीक्षक म्हणतात. अशा कादंबऱ्या बऱ्याच आहेत.. जे मॅकइनर्नी यांची ‘द गुड लाइफ’, डॉन डेलिलो यांची ‘फॉलिंग मॅन’ यांत कुटुंबांवरला परिणाम टिपला आहे, तर कामिला शम्सी यांची ‘बन्र्ट श्डोज’ ही कादंबरी ९/११च्या घटनेनं, स्वप्नांचा भुगा घडवून संपते.

ही उदाहरणं ‘९/११ नंतरचं साहित्य’ स्थापित होण्याची आहेतच; पण लेखकांनी आपल्या आणि एकंदर समाजाच्या ‘भीती’चा पुनशरेध घेतलेला यातून स्पष्टपणे दिसतो. हा पुनशरेध शोधपत्रकारितेसारखा नाही. झटितिप्रत्यय न देता, अगदी माणसाचा शोध घेणारी पुस्तकं कालरेटा गालनं काबूलमध्ये वर्षांनुर्वष राहून किंवा राजीव चंद्रशेखर यांनी बगदादमधल्या अमेरिकी ‘ग्रीन झोन’मध्ये वास्तव्य करून लिहिलीच होती, तशीदेखील ही नाहीत. ‘या स्थितीत असतात तर तुम्हीही तसेच झाला असतात’ असं सांगण्याचं जे सामथ्र्य ललितसाहित्यात असतं, ते कायम ठेवून नव्या शक्यतांकडे पाहणारं हे साहित्य आहे. अर्थात ही दोन पुस्तकं किंवा पत्रकारांनी थेट ‘९/११’च्या घटनेबद्दल लिहिलेली पुस्तकं, नोम चॉम्स्की यांची ९/११ नंतरच्या ‘वॉर ऑन टेरर’वरली टीका हे सारं साहित्यच आहे. किंबहुना, काही जणांचा मुद्दा असा आहे की ९/११ बद्दलचं खरं साहित्य अद्याप निर्माणच झालेलं नाही.. शोकात्म घटनेवरील साहित्यनिर्मितीसाठी त्या घटनेपासून अंतर राखण्यासाठी काळ आवश्यकच असतो, म्हणून ते निर्माण झालेलं नाही! आणि याच काही जणांचा पुढला मुद्दा असा की, तोवर ‘९/११’चं प्रतिबिंब ललितेतर गद्यातच व्यवस्थित दिसेल.

अमेरिकेत अनेक विद्यापीठांनी ‘९/११ नंतरचं साहित्य’ असे अभ्यासक्रमच सुरू केले आहेत. त्यापैकी काही विद्यापीठांमध्ये ९/११ नंतरचं साहित्य हेच समकालीन साहित्य, असं गृहीत धरणारे अभ्यासक्रम शिकवले जाताहेत. पण ज्या विद्यापीठांतले साहित्य-अभ्यासक्रम ९/११च्या सामाजिक-सांस्कृतिक परिणामांचाही विचार करतात त्यांनी कादंबऱ्या, कविता, यांसोबतच ललितेतर गद्य आणि चित्रपट यांचाही समावेश ‘साहित्या’त केला आहे. इंग्रजी साहित्यातील पदवी-शिक्षणाचा एक भाग (मोडय़ूल) म्हणून, किंवा हा अभ्यासक्रम शिकता येतो. बफेलो, मेरीलॅण्ड, ब्राऊन, बर्कले आदी विद्यापीठांत हे अभ्यासक्रम बिनबोभाट सुरू आहेत. मात्र नील आहुजा या भारतीय वंशाच्या तरुण प्राध्यापकानं नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात सुरू केलेला याच प्रकारचा अभ्यासक्रम, मोहसिन हमीद यांचं पुस्तक तसंच अबू घरेबबद्दलच्या लेखाचं वाचन अनिवार्य करणारा असल्यानं एका विद्यार्थ्यांनं ‘यात जे बळी पडले त्यांच्याऐवजी दहशतवाद्यांचीच बाजू घेतलीय’ अशी हाकाटी सुरू केली. हा विद्यार्थी अमेरिकेत आजही बहुसंख्याक मानल्या जाणाऱ्या समाजगटातला असल्यानंही असेल, पण त्याला पाठिंबा देऊनआहुजांवर टीका करणं हा उद्योग गेल्या वर्षी अनेकांनी आरंभला होता. त्या वादाला आहुजांनी उत्तरही दिलं. पण वाद शमवणारं हे उत्तर बरंचसं तांत्रिक होतं. विद्याशाखीय शिस्तीनं एखाद्या विषयाचा विस्तार करायचा असेल, तर याची बाजू घेतली आणि त्याची नाही घेतली, हे आक्षेप पूर्णत: फजूल/ अर्थहीन ठरतात असा युक्तिवाद न करताच आहुजांनी बाजू मांडली. या वादाखाली दडलेली, ‘आम्ही आमच्यावर अन्याय कसा झाला आणि तो करणारे किती वाईट होते हे न विसरण्यासाठीच हा अभ्यासक्रम शिकतोय’ अशी अस्मितावादी भूमिका होती, ती पुढे ट्रम्प यांच्या उमेदवारीतून उघड झाली आहेच.

पंधरा वर्षांनंतर, त्या वेळी अबोध असलेली पिढी आता या घटनेकडे पुन्हा पाहू लागेल.. नवं साहित्य यातून उगवेल. ९/११ घटनेच्या विसाव्या वर्षी कदाचित, हाच मजकूर निराळ्या तपशिलांनिशी लिहिला जाईल!