व्यक्तीमुळे व्यवस्था रसातळाला गेली असे आपण म्हणतो, तेव्हा आपण नेमके काय म्हणत असतो? व्यवस्था महत्त्वाच्या होत्या आणि भक्कमसुद्धा होत्या, पण व्यक्ती त्याहीपेक्षा महत्त्वाची ठरली आणि मग व्यक्तीच्या कलाने अन्य व्यक्ती वागल्यामुळे व्यवस्था गडगडल्या, असे आपल्याला म्हणायचे असते का? मग , व्यवस्था पुरेशा बुलंद असत्या तर व्यक्तिस्तोम वाढले कशाला असते? हे कूटप्रश्न दिएगो मायोरानो यांचे ‘ऑटम ऑफ द मॅट्रिआर्क : इंदिरा गांधीज् फायनल टर्म इन ऑफिस’ हे पुस्तक वाचणाऱ्यांना पडतील. इंदिरा गांधी यांच्या काळात व्यवस्थांचे अवमूल्यन कसे झाले, याचा पाढा या पुस्तकाने वाचला आहे. लेखक इटालियन असले, तरी अमेरिकेत अधिक असतात आणि भारतीय राजकारण हाच त्यांचा विद्यापिठीय अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे राजकीय अजेंडय़ानिशी, केवळ दोषारोप करण्याच्या हेतूने लिहिले गेलेले पुस्तक, अशी या पुस्तकाची बोळवण करता येणार नाही.
उपशीर्षकानुसार हे पुस्तक इंदिरा गांधींच्या अखेरच्या कार्यकाळाची- म्हणजे १९८० ते १९८४ – चिकित्सा करणारे हवे, पण समर्पक उत्तरे देण्याच्या प्रयत्नामुळे पुस्तकाची व्याप्ती वाढली आहे. अगदी १९६९ पासूनच हे पुस्तक सुरू होते. म्हणजे, इंदिरा यांच्या समग्रच राजकीय कारकीर्दीची चिकित्सा लेखक करू पाहातो. यासाठी कालानुक्रमे अभ्यास करण्याचा धोपटमार्ग मात्र लेखकाने नाकारला आहे. त्याऐवजी, पहिले प्रकरण १९७० च्या दशकातील भारतीय राजकारण/समाजकारण यांच्या परिचयासाठी देऊन, पुढल्या तीन प्रकरणांत ‘काम न करणारा काँग्रेस पक्ष’, ‘१९८०च्या सुरुवातीच्या (सर्वपक्षीय) राजकीय हालचाली’ आणि ‘व्यवस्थांचे खच्चीकरण’ किंवा लेखकाच्या शब्दांत: ‘राजकीयीकरण, धूप व अनौपचारिकीकरण’ यांचा आढावा घेतला आहे. यासाठी शंभरहून अधिक तज्ज्ञांच्या मुलाखती, प्रामुख्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ व ‘द हिंदू’ या वृत्तपत्रांसह १५ नियतकालिकांची हजारो कात्रणे आणि बरीच पुस्तके यांचा आधार घेण्यात आला आहे.
या पुस्तकातील ‘खुणेची पाने’ आहेत, ती याच तीन (दुसरे ते चौथे) प्रकरणांत.
पान क्रमांक ६८ व ६९ ही दुसऱ्या प्रकरणातील पाने मराठी वाचकांसाठी विशेष आहेत. ज्येष्ठ अभ्यासक जयंत लेले यांच्या विश्लेषणाचा आधार घेऊन इथे ‘मराठा लॉबी’ची शक्ती गटा-तटांमुळे कशी क्षीण झाली, हे वर्णिले आहे. एकही तपशील नवा नसला, तरी उमेदवार निवडीत अंतुले यांनी रामराव आदिक आणि वसंतदादा पाटील तसेच प्रेमलाकाकी चव्हाण यांना झुंज देताना स्वतचे समर्थक जोडण्याऐवजी इंदिरा गांधी यांच्या नावाचा वापर करून, संजय गांधींनी बळ दिलेल्या ‘युवक काँग्रेस’चा वापर करून कशी बाजी मारली, हे लेखक अभ्यासूपणे सांगतो. आधीच शकले झालेल्या काँग्रेसचे उरलेसुरले अस्तित्व कसे गटांत विभागले गेले होते, हे यातून स्पष्ट होते.
हिंदू राजकारणाचा उदय इंदिराकाळात कसा झाला, याचे इतकेच वेगवान (अनेक घटनांचे उल्लेख करीत, भरपूर संदर्भ देत पुढे जाणारे) विश्लेषण पान क्रमांक १३८ पासून पुढे वाचायला मिळेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘परिवारा’तील संघटना जुन्या असल्या, तरी विहिंपला राजकीय विस्ताराचे काम १९८१ मध्ये सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी दिले आणि तिथून पुढे, १९८२ ते १९८४ या काळात, ‘केंद्रीय मार्गदर्शक मंडळ’ आणि ‘साधुसंसद’ अशी द्विदल रचना होऊन विहिंपला बळकटी आली, मीनाक्षीपुरम्चे धर्मातर हा मुद्दा या संघटनेने महत्त्वाचा बनवला आणि केवळ दलित-सवर्ण सहभोजने घालून न थांबता, हिंदूधर्मात परत घेण्याचे कार्यक्रम आणि पुढे ‘एकात्मता यात्रा’ अशी उपक्रमशीलता दाखवून हिंदू मतपेढीच्या बांधणीसाठी प्रयत्न केले, हे सांगताना (पान १४१ वर) लेखकाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे : इंदिरा गांधी ‘परकीय हाता’ची भीती घालत, तर हिंदू संघटना नेहमीच मुस्लीम वा ख्रिस्त्यांना हा देश कसा गिळंकृत करायचा आहे हे सांगत.. ‘आपण वेढले गेलो आहोत’ अशी भावना लोकांत निर्माण करून त्याचा फायदा घेण्याचे हे तंत्र दोघांनीही अवलंबले, असे लेखक म्हणतो.
खुणेचे तिसरे पान शोधणे अवघडच, कारण ‘संस्था/व्यवस्थांचे अवमूल्यन’ हे अख्खे प्रकरण (पान १५३ ते २०५) वाचनीय आहे. नोकरशाही, न्यायपालिका, संसद, राष्ट्रपती भवन, राज्यघटनेला अभिप्रेत असलेले ‘कायद्याचे राज्य’ व घटनेची ‘मूळ चौकट’ यांचे पावित्र्य राखले गेले नाही, तसेच केंद्र-राज्य संबंध व्यक्तिकेंद्री (आधी नेहरू, मग इंदिरा) राजकारणाच्या दावणीला बांधले गेल्यामुळे त्यांचे ‘अनौपचारिकीकरण’ झाले, आसाम आणि पंजाब प्रश्न हाताळतेवेळी या दोन राज्यांतील व्यवस्थांच्या क्षमतांवर पूर्णत अविश्वास दाखवला गेला, यातूनच प्रादेशिक पक्षांची लाट अधिक उसळली, याची उजळणी या प्रकरणात आहे.
लेखक ‘काँग्रेसविरोधक’ नाही! पण, पडझड झालीच कशी, हे ठासून सांगण्याच्या नादात लेखकाला सारीच उदाहरणे पडझडीची दिसतात, हे मात्र खरे. ‘गरिबी हटाओ’सारख्या घोषणेमुळे राजकारणाचा नूरच बदलला, गरीब अधिक सजग झाले (आणि पुढे गरिबांना हक्क देण्याचे काम ‘यूपीए’च्या काळात झाले) हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणाही लेखकात आहेच.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2015 रोजी प्रकाशित
खुणेची पाने.. : इंदिराकालीन ‘पडझडी’चे पाढे..
व्यक्तीमुळे व्यवस्था रसातळाला गेली असे आपण म्हणतो, तेव्हा आपण नेमके काय म्हणत असतो? व्यवस्था महत्त्वाच्या होत्या आणि भक्कमसुद्धा होत्या,

First published on: 15-08-2015 at 05:00 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autumn of the matriarch indira gandhis final term in office