अमेरिकी लोकांनी भारताकडून शिकण्यासारखे पुष्कळ काही आहे आणि अशा शिकण्यासारख्या भारतीय गोष्टी फक्त जुन्या नव्हेत, तर अगदी आत्ताच्या भारतानेही जगाला भरपूर देऊ केल्या आहेत..  ‘हा वाद निव्वळ प्रसारमाध्यमांनी वाढवलेला आहे.. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.’ असे ठणकावून सांगण्याची पद्धत ही त्यातीलच एक. एखाद्याचा तथाकथित ‘व्यक्तिगत प्रश्न’ प्रसारमाध्यमांनी सार्वजनिक जीवनातील नैतिकतेच्या पातळीवर धसाला लावला, तर ती प्रसारमाध्यमे खोटारडी -किंवा त्या माध्यमांचा बोलविता धनी कुणी तरी गलिच्छ राजकारणी- आणि माध्यमांनी लावून धरलेला प्रश्न मात्र व्यक्तिगतच, त्यामुळे संबंधित व्यक्ती सुखरूप असे चित्र भारतात दिसू शकते, अमेरिकेत नाही. बिल क्लिंटन यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी असताना मोनिका ल्युइन्स्की प्रकरण भोवलेच. त्यांना शिक्षा नैतिक अध:पतनाबद्दल नसून ल्युइन्स्कीशी असलेल्या संबंधांविषयी शपथेवर खोटे बोलल्याबद्दल झाली होती; पण आमच्या साहेबांचे खासगी जीवन वेशीवर टांगणारे तुम्ही कोण, असा प्रश्न तेव्हाही क्लिंटनसमर्थकांनी विचारला नव्हता. प्रसारमाध्यमांना सोयीपुरते जवळ करायचे आणि गैरसोयीचे प्रश्न आले की माध्यमांनी नसत्या भानगडी करू नयेत असे दरडावायचे, ही पद्धत अमेरिकनांनी समकालीन भारताकडून वेळीच शिकून घेतली असती तर अमेरिकेत आजची घडामोड घडलीच नसती आणि मग अमेरिकेत आजही वर्णभेदाची पाळेमुळे कशी तगून आहेत हेही कधी पुढे आले नसते.. ‘एकदिला’चा देखावाच कायम राहू शकला असता. तसे झाले नाही. भारतातील आयपीएल क्रिकेटपेक्षाही अधिक पैसा व लोकप्रियता असलेल्या ‘एनबीए’ या बास्केटबॉल स्पर्धामधील ‘लॉस एंजलिस क्लिपर्स’ या संघाचे मालक डोनाल्ड स्टर्लिग यांनी त्यांची मैत्रीण व्ही. स्टिव्हियानो हिला दूरध्वनीवर, कृष्णवर्णीयांशी तिने खासगीत कितीही सलगी केली तरी चालेल पण जाहीरपणे या ‘काळ्यां’ना अजिबात जवळ करू नये, असे सुनावले. जाहीर जवळिकीमुळे आपल्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो आणि आपल्याला खरे तर काळे खेळाडूही नको आहेत, असे त्यांचे म्हणणे. हे संभाषण त्या मैत्रिणीनेच एका क्रीडा-संकेतस्थळाकडे पोहोचवले आणि वाद वाढला. वास्तविक डोनाल्ड स्टर्लिग यांच्यावर यापूर्वीही वंशभेदमूलक वर्तनाचे दोन खटले दाखल झाले होते. मात्र या संभाषणात एनबीएसारख्या अतिलोकप्रिय स्पर्धेतील एका संघाचा, त्यातील विशिष्ट वर्णाच्या खेळाडूंचाही नावासकट उल्लेख झाल्याने, स्टर्लिग यांचे पितळ उघडे पडले. त्यांचा निषेध होऊ लागला. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही निषेध केल्याने या वादाला राजकीय, पक्षीय रंगही आला. म्हणजे वादानंतरच्या वावदूकपणात अमेरिकी प्रसारमाध्यमेही वाहवलीच. तरीही, केवळ प्रसारमाध्यमे चुकली म्हणून वादच निष्प्रभ, असे न मानता त्याचे पडसाद वाढत गेले. व्यक्तींनी केलेल्या निषेधापासून प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या, त्या कॉपरेरेट प्रतिमेतून आलेल्या थेट आर्थिक निर्णयांपर्यंत पोहोचल्या. स्टर्लिग यांच्या मालकीच्या संघाला पैसा पुरविणाऱ्या ‘मर्सिडीज’, व्हर्जिन विमानसेवा आदी चार बडय़ा प्रायोजकांनी आम्ही या संघाचा अर्थपुरवठा थांबवतो आहोत, असे जाहीर केले; ते आपापली व्यावसायिक प्रतिमा जपण्यासाठीच. एव्हाना स्टर्लिग यांनी आपल्या मालकीच्या संघातील खेळाडूंमार्फत ‘खेळासाठी’ सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, स्वत: खुलासेही केले, त्याचा काहीही परिणाम न होता एनबीएने हा एका संघाकडून झालेला नैतिकतेचा भंगच असल्याने चौकशी व कारवाईही होणारच, असे ठरवले. कारवाई सौम्य की कठोर यापेक्षा, खासगी संभाषणात एक आणि समाजात दुसरी, अशा दुहेरी नैतिकतेचा फुगा एनबीएने फोडला, हे महत्त्वाचे आहे.