सामान्य माणूस आणि साक्षात्कारी सत्पुरुष यांच्या मनामध्ये नेमका काय भेद असतो, हे आपण पू. बाबा बेलसरे यांच्या ग्रंथातून पाहिलं. हा भेद किंवा फरक स्पष्ट झाल्याशिवाय ‘माझं आणि तुझं मन एक कर’ हे जे भगवंत सांगतात त्याचाही अर्थ समजणार नाही. तुझं-माझं मन एक कर, याचाच अर्थ तुझं मन माझ्या मनासारखं कर! आपण पू. बाबांच्या सांगण्यातून जाणलं की, आपलं मन अखंड अशांत आणि अतृप्त असतं. त्याचं कारण ज्यांची कधीच पूर्ती होऊ शकत नाही, तृप्ती होऊ शकत नाही अशा वासनांच्या पूर्तीसाठी हे मन धडपडत असतं. अशा अतृप्त व अशांत मनाची साम्यावस्था भंग पावते. साम्यावस्था भंगल्यानं मनाचं समाधान लोपतं. सत्पुरुषही याच जगात राहतात, देहातच वावरतात मात्र त्यांच्या मनावर जगाचा आणि देहगत प्रेरणांचा प्रभाव कधीच नसतो. जग आणि देह हे दोन्ही अशाश्वत आहे. त्यातही देह आहे तोवरच ‘मी’ आहे आणि ‘मी’ आहे तोवरच ‘माझं’ जगही आहे. ‘मी’ मावळताच ‘माझं’ जगही मावळतं. हा देह तरी कुठवर आहे? जोवर याच्यात चैतन्यशक्ती आहे तोवरच देह आहे. पू. बाबांनी सांगितलेली विराट जीवनशक्ती ही या चैतन्याचंच एक अंग आहे. या चैतन्याचा अंश जोवर माझ्यात आहे तोवरच हा देह जिवंत आहे. तो अंश लोपताच देहाचा खेळही आटोपतो. तेव्हा हा देह ज्या चैतन्यावर आधारित आहे ते शाश्वत आहे. देह आणि जग दोन्ही अशाश्वत आहेत. सत्पुरुषांच्या मनावर त्या अशाश्वताचा लेशमात्रही ठसा नसतो. त्यांचं सर्व अवधान त्या चैतन्यानं व्यापून असतं. चैतन्य व्यापक आहे. व्यापक आणि शाश्वताच्या अखंड अवधानानं सत्पुरुषांचं मनही व्यापक आणि शाश्वत सत्यानं भरून जातं. शाश्वत सत्याचा अखंड प्रवाहच जणू त्यांच्या रूपानं जगात वाहत असतो. त्यामुळे त्यांचं वागणं, बोलणं सारं काही त्या सत्याचंच प्रकटन असतं. अशा मनाला भय, काळजी, चिंता यांचा स्पर्शही होत नाही. असा सत्पुरुष ज्याला जवळ करतो, त्याला आपल्यासारखं शाश्वत आणि अखंड असं परमसुख कसं लाभेल, या एकमात्र कळकळीनं कार्यरत होतो. ते अखंड सुख लाभण्यासाठी शिष्याचं मन आणि आपलं मन एकच व्हावं, ही एकच आस त्यांना उरते. जो सद्गुरूंच्या मनात आपलं मन मिसळून टाकतो अर्थात समस्त अहंकार विसर्जित करतो तो अध्यात्मातलं जणू मोठं शिखर गाठतो! श्रीनिसर्गदत्त महाराज यांना एका शिष्यानं विचारलं की, सद्गुरू जगात असूनही या जगाचा त्यांच्यावर काहीच प्रभाव नसतो. अशा मिथ्या जगातल्या कोणत्या गोष्टीनं त्यांना आनंद होतो? महाराज उद्गारले, कुणी अध्यात्मातलं सर्वोच्च शिखर गाठलं तरच त्यांना आनंद होतो! अर्जुनाला आत्मकल्याणाची ओढ निर्माण झाल्याचे पाहून भगवंताचेच अष्टसात्त्विक भाव जागे झाले, असं हृदयंगम वर्णन माऊलीही करतात. म्हणजे आजवर जगाच्या मोहात भरकटत असलेल्या शिष्याला आत्मकल्याणाकडे पाऊल टाकावंसं वाटलं, एवढय़ानंही सद्गुरूंचं मन आनंदानं भरून जातं. मग शिष्याचं मन आपल्यासारखं करण्याची प्रक्रिया ते वेगानं सुरू करतात.