भगवंताची प्राप्ती झाली तर समस्त भवभय नष्ट होते, हे शब्दांनी कळते पण तरीही एक मुद्दा मनात येतोच की भगवंत का हवा? भगवंताशिवाय माणूस जगू शकत नाही का? जगताना भगवंताची गरज काय? श्रीमहाराज सांगतात, ‘‘माणसाच्या सर्व दु:खांवर एकच खात्रीचा तोडगा आहे. माणसाला खरोखरीच मुळात पाहिजे असलेली वस्तू एकच. ती म्हणजे परमार्थ होय. ही गोष्ट त्याचा अनुभव घेऊन संतांना नक्की कळली.’’ तेव्हा जीवनातील समस्त दु:ख दूर व्हावे, यासाठी माणसाला भगवंताच्या आधाराची गरज आहे. आता आपल्याला वाटेल, दु:ख दूर करण्याचे उपाय भौतिकातदेखील असतातच की. स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करणेच योग्य नव्हे काय? स्वत: पुरुषार्थ करण्यापेक्षा अज्ञात अशा भगवंताची आळवणी करीत राहाणे हा भेकड आणि निष्क्रिय माणसाचा मार्ग नाही का? खरे तर महाराजही सांगतातच की, ‘‘परमेश्वर प्रयत्नाला मदत देतो, आळशीपणाला नाही’’ (बोधवचने, क्र. ४२५). तेव्हा प्रयत्न हवेतच. आपण आधीही पाहिलं की स्वत:च्या भौतिक प्रगतीसाठी धडपडण्याची बुद्धी माणसात उपजतच असते. स्वत:चे हित साधण्यासाठीची धडपड तो जन्मापासूनच करीत आला आहे. फक्त खरे हित कशात आहे, याबाबत मात्र त्याला ज्ञान नाही. तेव्हा इथे महाराजांना अभिप्रेत असलेला प्रयत्न हा खऱ्या हितासाठीचा आहे. त्या प्रयत्नांची दिशा त्यांच्या एका वचनातून दिसते. ते म्हणतात, ‘‘भगवंताचे होण्यात, वृत्ती आवरण्यात खरे शूरत्व आहे. त्यात गबाळेपणा नाही’’(बोधवचने, क्र. ४२४). तेव्हा भगवंताचं होण्याचा प्रयत्न हा जीवनातला श्रेष्ठ प्रयत्न आहे. भगवंताचं होणं कधी साधेल? तर, वृत्ती आवरल्यावर! आता वृत्ती आवरणं सोपं नाही. त्यामुळेच महाराज त्याला शौर्य मानतात. आपणही पाहातो की भौतिकातील प्रयत्न करून दु:ख दूर करण्याची धडपड अविरत असतानाही दु:ख दूर होत नाही. दु:खाचं एक कारण दूर होताच दुसरं दु:ख ठाकून येतं. ज्या ज्या गोष्टींमुळे आणि व्यक्तींमुळे आपल्याला सुख लाभेल, अशी अपेक्षा असते त्या त्या गोष्टी आणि व्यक्तींचा संग मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी आपण धडपडत असतो तरी त्यातून मिळणारं सुख हे तात्पुरतं टिकतं. आजच्या सुखावर उद्याच्या अनिश्चिततेचं सावट असतंच. श्रीमहाराज सांगतात, ‘‘इतर गोष्टी तात्पुरते सुख देतात पण समाधान देत नाहीत’’ (बोधवचने, क्र. ९५). जोवर खरं समाधान लाभत नाही तोवर सुखाच्या वस्तूही सुखकारक भासत नाहीत! अत्यंत वाईट प्रसंग ओढवल्याने एखाद्याचं मन निराशेच्या खाईत असेल तर त्याला कोणत्याच गोष्टी सुखाच्या वाटत नाहीत. तसं माणसाच्या जगण्याला असमाधानाची एक किनार कायम आहे. ती जाणवते तेव्हा अतिशय तीव्रतेनं जाणवते. समस्त दु:ख दूर झालं तरच शाश्वत समाधान लाभतं आणि ती किनार दूर होते. शाश्वत समाधान भगवंताच्या आधाराशिवाय मात्र लाभूच शकत नाही, त्यामुळे भगवंतप्राप्तीचा मार्ग असलेला परमार्थ हवाच, असं संत सांगतात.