राजेश बोबडे

राष्ट्राच्या विनाशाचे कारण मालक, मजूर व मुनीमजी मनोवृत्तीच्या दृष्टचक्राशी जोडताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, शेतीवाडीच्या कामापासून मोठमोठय़ा कारखान्यांच्या किंबहुना सरकारी योजनांच्या कामापर्यंत सर्व ठिकाणी कामचुकारपणा व एकमेकांच्या शोषणाचा प्रकार आज सर्रास दिसून येतो. सरकारी यंत्रणेतही हा प्रकार आहे. जिथे तिथे स्वार्थ. सर्वाच्या वागणुकीला व मनोवृत्तीला आज अशा अभद्र ग्रहांनी झपाटले असल्याचे पावलोपावली निदर्शनास येते. अर्थात मालक, मुनीम व मजूर यांच्या या मनोवृत्तीमुळे व बिघडलेल्या परस्पर संबंधांमुळे कामाची योजना अपुरी ठरते व विकृत होते आणि त्याचा परिणाम राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या मोठमोठय़ा योजनांवर होऊन राष्ट्रीय संपत्तीचा भयंकर ऱ्हास व नाश होतो. यासाठी शेतीचे उदाहरण देताना महाराज सांगतात, शेतीच्या बाबतीत मालक, मुनीम व मजूर यांच्याकडून जर असाच प्रकार होत असेल तर, शेतीचे उत्पन्न साहजिकच कमी होणार आणि त्यामुळे जेवढे लोक त्या शेतीवर जगवावयाचे ते जगवले जाणार नाहीत.

अर्थात त्यासाठी परदेशातून धान्य मागवण्याचा प्रसंग येऊन देशाचा खजिना रिकामा करावा लागणार, ‘‘अधिक धान्य पिकवा’’ यासारख्या मोहिमा काढून त्या मोहिमांसाठीच भरमसाट खर्च करावा लागणार. गुरांच्या आधीच कमी असलेल्या कुरणांच्या जागेत शेती करावी लागणार. ती पैसा आणि शिफारस पाहून पुन्हा त्याच चैनी लोकांकडे द्यावी लागणार. जंगले अशा रीतीने कमी होऊ लागून पावसावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून जंगले वाढविण्याची खर्चीक मोहीम उभारावी लागणार त्या आणि कुरणांच्या उणिवेमुळे गायी कसायाकडे जाणार आणि गायी- बैल कमी होत असलेले पाहून शेतीसाठी परदेशी यंत्रांची मदत घ्यावी लागणार. या साऱ्या उलटसुलट धडपडीत भरमसाट खर्च करावा लागणार. सरकारी खजिना संपुष्टात आलेला पाहून, ती उणीव कशीतरी भरून काढावी म्हणून, सरकार अनेक प्रकारच्या करांच्या व महागाईच्या रूपाने शेतकरी-मजुरांनाच पिळून काढणार! धान्याच्या तुटवडय़ामुळे अपुरे धान्यवाटप करण्याची पद्धती सरकारला सुरू करावी लागणार. बाजारात कमी भावाने द्यावे लागते म्हणून व्यापारी आडून भरमसाट भाव घेऊन गरिबांना वस्तू पुरविणार आणि वजनात पाप करण्यासाठी त्या मालात वाटेल तो खराब माल मिसळणार!

अन्नाप्रमाणेच वस्त्रे आणि अन्य सर्वच जीवनोपयोगी वस्तू दुर्मीळ व महाग होऊन त्यात अखेर गरीब शेतकरी मजुरांचेच भूकबळी पडणार! निकस व अपुरे अन्न मिळाल्याने प्रजा दुबळी, रोगी व भिकार- बेकार होणार आणि पोटातील अग्नीच्या ज्वाळा पेट घेत कदाचित अराजकतेकडे धाव घेऊन राष्ट्रात अनर्थ उत्पन्न करणार! या एवढय़ा मोठय़ा राष्ट्रविनाशाचे मूळ पाहू गेल्यास ते मालक-मुनिमांच्या अधिकारांच्या दुरुपयोगात व त्यामुळे निर्माण झालेल्या कामगारांच्या चुकार मनोवृत्तीतच सापडणार नाही का?

rajesh772@gmail.com