गांधीजींच्या रेल्वे प्रवासात, त्यांना अभिवादन करण्याची संधी साधण्यासाठी मद्रास प्रांतातल्या (आजचे तमिळनाडू) चेन्नलपट्टीच्या लोकांनी, पंचक्रोशीत रेल्वे स्थानक नसूनही एक युक्ती लढवली. ही गोष्ट १९४६ सालची. रेल्वेचा त्या वेळी यांत्रिकपणे वरखाली सिग्नलच त्यांनी हाताने फिरवला. गाडी थांबताच गांधीजींच्या डब्यासमोर या भागातल्या आबालवृद्धांचे मोहोळ जमले. गांधीजीही गाडीतून उतरले. ‘संस्था उभारून कार्य करा’ हा गांधीजींचा संदेश शिरोधार्य मानून या गावकऱ्यांनी मग, गांधीजींचे पाय जिथे लागले त्याच भूमीवर अवघ्या २० महिन्यांत ‘गांधीग्राम’ वसवले! ‘नई तालीम’ने सुरुवात झालेल्या या ‘गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूट’चा पसारा गावकऱ्यांनीच दान केलेल्या सुमारे २७० एकरांवर आज वाढला आहे आणि त्यातही, इथल्या कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाची ख्याती डिंडिगुल जिल्ह्यासह, लगतच्या मदुरै, शिवगंगा आणि तिरुचिरापल्लीपर्यंत पसरली आहे. हे रुग्णालय स्थापन केले गांधीवादी कार्यकर्ते जी. रामचंद्रन यांच्या पत्नी डॉ. सौंदरम यांनी, पण १९६९ पासून त्याची धुरा वाहिली ती डॉ. आर. कौसल्यादेवी यांनीच. या रुग्णालयासह गांधीग्राम परिसरातील अनेक संस्थांच्या प्रमुख आणि गांधीग्रामच्या आजीव विश्वस्त म्हणून समर्पित जीवन जगलेल्या डॉ. कौसल्यादेवी २५ एप्रिल रोजी निवर्तल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर लिहिलेला मजकूर खुद्द कौसल्यादेवींनी वाचला असता तर, ‘आता आणखी काही लिहिण्याची गरजच नाही- रुग्णालय २२ खाटांपासून आज ३५० खाटांचे झाले, एवढा उल्लेख झाला तर पाहा’ असा अभिप्राय त्यांनी दिला असता… इतके त्यांना स्वत:पेक्षा संस्थेचे महत्त्व वाटे. त्यामुळेच अनेक पुरस्कारही त्यांनी नाकारले, त्यात २०१६ सालच्या ‘पद्माश्री’चाही समावेश असल्याची बातमी ‘द हिंदू’ने त्या वेळी दिली होती. पण कस्तुरबा रुग्णालयाला मात्र राज्य सरकारचे १४ आणि केंद्र सरकारतर्फे दोनदा पुरस्कार त्यांनी मिळवून दिले.

कौसल्यादेवी यांचा जन्म १९३१ मधला. शिक्षणाची आवड होती, म्हणून बीएपर्यंत शिकल्या तेव्हाच मुलींनीही डॉक्टर झाले पाहिजे असे नवमतवादी विचार आणि ‘लेडी डॉक्टर’चाच आग्रह धरणाऱ्या पारंपरिक तमिळ महिला या दोन्ही कारणांमुळे त्यांनी डॉक्टर – त्यातही प्रसूतीतज्ज्ञ- होण्याचे ठरवले. एमबीबीएस पदवी मिळवल्यानंतर त्यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीविद्योची पदविकाही घेतली.

सन १९६० पासून सरकारी रुग्णालयात त्या रुजू झाल्या. तिथे बढत्यांची शक्यता असूनही ही सरकारी नोकरी त्यांनी सोडली आणि आरोग्यसेवेसाठी आयुष्य समर्पित करायचे, असे ठरवूनच त्या गांधीग्रामात आल्या. दक्षिण भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी आणि गांधीग्रामात रुग्णालय उभारणाऱ्या डॉ. सौंदरम रामचंद्रन यांचा आदर्श त्यांच्यापुढे होता. यापैकी सौंदरम यांचे मागैदर्शनच कौसल्यादेवी यांना मिळाले, पण मुथुलक्ष्मी यांचे प्रागतिक विचार (‘स्त्री आणि पुरुष यांना निरनिराळ्या नैतिक मोजपट्ट्या लावू नका… तीही सामाजिक न्यायाची हक्कदार आहे’ हा मुथुलक्ष्मींचा मंत्रच) पथदर्शी होते. स्वत: अविवाहित राहण्याचे ठरवून त्यांनी गांधीग्राम आणि कस्तुरबा रुग्णालयासाठी स्वत:ला वाहून घेतले. कुतूहल म्हणून घेतलेले ‘जयपूर फूट’चे प्रशिक्षण आणि स्वत:ला स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर ऑन्कॉलॉजीचे (कर्करोगशास्त्राचे) घेतलेले शिक्षण एवढाच त्यांनी, या संस्थेत आल्यानंतर ‘स्वत:साठी दिलेला वेळ’! वीस वर्षे त्या कर्करोगाशी झगडल्या. बऱ्याही झाल्या. अखेर वृद्धापकाळाने, समाधानानेच त्यांनी डोळे मिटले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about renowned gynaecologist dr kousalya devi life journey zws