निशांत, अंकुर यांसारखे हिंदी चित्रपट जेव्हा तयार होत होते अशा १९७० च्या दशकात अरुणा वासुदेव यांनी या चित्रपटांना जगभरात का पाहिले जावे, हे विशद करणारी उत्तम समीक्षा लिहिली. त्याआधी १९६० च्या दशकात न्यू यॉर्कमध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतल्यावर, पॅरिसच्या ‘सोऱ्बाँ’ विद्यापीठातून त्यांनी ‘चित्रपट आणि सेन्सॉर’ या विषयावर डॉक्टरेट मिळवली होती. दिल्लीत परतल्यानंतर काही काळ त्या अन्य प्रकाशनांसाठी लिहीत राहिल्या, ‘दूरदर्शन’ या तेव्हाच्या एकमेव चित्रवाणी वाहिनीसाठी काम करत राहिल्या, पण १९८८ मध्ये ‘सिनेमाया’ हे नियतकालिक त्यांनी स्थापन केले. फक्त भारतीय चित्रपटच नव्हे तर आशियाई देशांतल्या चित्रपटांची चर्चा हे ‘सिनेमाया’चे वैशिष्ट्य होते. याहीनंतर ११ वर्षांनी, १९९९ मध्ये आशियाई चित्रपटांचा ‘सिनेमाया फेस्टिव्हल’ त्यांनी सुरू केला. पहिल्या खेपेला अवघे २५ चित्रपट या महोत्सवात होते, पण दहा वर्षांच्या आत ही संख्या १२० वर पोहोचली.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: डॉ. अविनाश आवलगावकर

गेल्या तीन-चार वर्षांत मात्र वयपरत्वे त्या थकल्या होत्या. अखेर तीन आठवडे रुग्णालयात राहून, शुक्रवारी (६ सप्टेंबर) त्या निवर्तल्या. चित्रपटप्रेमी असूनही बॉलिवुड वा दक्षिण भारतीय लोकप्रिय चित्रपटसृष्टींशी त्यांचा संबंध कमीच होता. परंतु चित्रपटांतून होणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक अभिव्यक्तीची नेमकी जाण त्यांना होती. कलात्म चित्रपटांतील बदल त्यांनी हेरले, हे चित्रपट योग्य ठिकाणच्या महोत्सवांमध्ये जातील, तेथे ते साकल्याने पाहिले जातील यासाठी त्यांनी लेखणी परजली आणि त्याचा प्रभावही दिसून आला. पुढल्या काळात लोकार्नो, कार्लो व्हि व्हेरी, कान अशा नावाजलेल्या चित्रपट महोत्सवांत ज्युरी म्हणून त्यांना स्थान मिळाले होते. फ्रान्सच्या ‘ऑफिसर ऑफ आर्ट लेटर्स’ आणि इटलीच्या ‘स्टार ऑफ इटालियन सॉलिडॅरिटी’ या प्रतिष्ठेच्या किताबांसह कोरिया, फिलिपाइन्स या देशांचे चित्रपट-समीक्षा पुरस्कार त्यांना मिळाले होते. ‘लिबर्टी अॅण्ड लायसन्स इन द इंडियन सिनेमा’ हे त्यांच्या पीएच.डी. प्रबंधावर आधारित पुस्तक १९७८ मधले, पण त्याच्या आगेमागे जवळपास पाच पुस्तकांवर सहलेखिका म्हणून त्यांचे नाव. त्यांनी फ्रेंचमधून इंग्रजीत अनुवादित केलेले ‘बिग भीष्मा इन मद्रास- इन सर्च ऑफ महाभारत विथ पीटर ब्रूक्स’ हे (मूळ लेखक : ज्याँ क्लॉद करेर) पुस्तकही महत्त्वाचे ठरले. त्यांनी स्वत: काही लघुपटांची निर्मिती केली होतीच पण ‘पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग ट्रस्ट’ या न्यासातर्फे वेगळ्या वाटेचे चित्रपट आणि लघुपट यांना त्यांनी साहाय्य केले. लेखिका- दिग्दर्शिका सुप्रिया सुरी यांचा ‘अरुणा वासुदेव : द मदर ऑफ इंडियन सिनेमा’ हा त्यांच्यावरील लघुपटही १३ चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित झाला होता.