अन्वयार्थ : सामाजिक नेतृत्व..

महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.

अन्वयार्थ : सामाजिक नेतृत्व..
विनायक मेटे

विनायक मेटे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार आणि आग्रही होते, राजकारणात पाच वर्षे विधान परिषदेचे सदस्य राहता येण्यासाठी मेटे यांनी फक्त राजकारण केले नाही. समाजकारणात राहून सामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सतत प्रयत्न करत, त्यांनी प्रत्येक राजकीय पक्षाची ताकद आणि कमकुवतपणा यांचा अभ्यास केला. राज्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाच्या मनात आरक्षणाचा मुद्दा फुंकून त्याला धारदार आंदोलनापर्यंत नेण्यासाठी मेटे यांनी समाजातील सगळय़ा नेत्यांची मोट बांधली आणि सामान्य मराठा समाजाचे अराजकीय असे सामाजिक आंदोलन उभारण्यासाठी मदत केली. असे करताना, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा सतत खुणावत राहिल्या. कदाचित त्यामुळेच त्यांनी आपला राजकीय प्रवास ‘भाजप ते भाजप – मार्गे राष्ट्रवादी काँग्रेस’ असा केला असावा. सत्ताधीशांच्या अतिशय जवळच्या वर्तुळात प्रवेश मिळूनही त्यांना मंत्रीपदाने मात्र प्रत्येक वेळी हुलकावणी दिली. राजकारणात कोणी फार वरचढ ठरू लागताच, नव्या डावपेचांची आखणी सुरू होते. मेटे यांच्या नेतृत्वाला असे आव्हान देण्यासाठी अशाच खेळी खेळल्या गेल्या, मात्र मेटे यांनी कंबर कसून आपले अस्तित्व सतत नजरेसमोर राहील, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी ‘शिवसंग्राम’ आणि ‘लोकविकास मंच’ असे दोन राजकीय पक्षही स्थापन केले. मग काळाची गरज म्हणून ते विलीन किंवा विसर्जितही केले. अशा राजकारणात टिकून राहणे आणि आपली आवश्यकता सतत वाढवत नेणे अतिशय महत्त्वाचे असते, याची जाणीव मेटे यांना होती. बीड जिल्ह्यातील राजेगावसारख्या छोटय़ा गावातून मुंबईपर्यंत पोहोचताना होणारी दमछाक अनेकांना ध्येयपूर्तीसाठी अडचणीची ठरते. विनायक मेटे यांनी हा प्रवास पूर्ण करत मुंबईच्या राजकीय वर्तुळात आपले बस्तान बसवले. समाजाचे नेतृत्व करताना, त्या समाजाच्या मनात विश्वास निर्माण करणे अधिक महत्त्वाचे असते. असा विश्वास संपादन केल्याशिवाय समाज नेतृत्व मानत नाही. मेटे यांनी फार कमी वयात ही लढाई जिंकली आणि राज्यातील राजकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सध्याच्या राजकीय घडामोडीत प्रथमच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली गेली, तरी १२ सदस्यांच्या यादीत त्यांचे नाव घेऊन त्यांना सत्तापदी घेतले जाईल, अशी खात्री त्यांच्या समर्थकांना वाटत होती. गेल्या तीन दशकांत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाचा उपयोग सत्ताधाऱ्यांनी पुरेपूर करून घेतला. समाजाच्या विकास प्रक्रियेत आर्थिक मुद्दा अधिक महत्त्वाचा असून तो सोडवण्यासाठी आरक्षण हा विषय अधिक गंभीरपणे हाताळण्याची गरज आहे, अशी भूमिका मांडणारे ते पहिले नेते होते. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. राजकारणाबरोबरच समाजकारणात रस असलेल्या मेटे यांनी सामूहिक विवाह प्रथेला चालना देण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांचा स्वत:चा विवाहदेखील अशाच पद्धतीने झाला होता. दुष्काळी भागातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत मिळावी, हा त्यांच्या समाजकारणातील अग्रक्रमाचा विषय होता. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून मेटे यांच्या दुर्दैवी निधनाने तो पुन्हा एकदा सामोरा आला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लालकिल्ला : नितीशकुमारांची केविलवाणी धडपड
फोटो गॅलरी