‘बुकर’ पुरस्काराची लघुयादी या आठवड्यात जाहीर झाली आणि एकसमान वैशिष्ट्य असलेल्या लेखकांची पुस्तके त्यात समाविष्ट होण्याचा योग जुळून आला. ते वैशिष्ट्य म्हणजे जन्माने कुठल्याही राष्ट्राचे ते प्रतिनिधित्व करीत असले, तरी त्यांच्याबाबत देशांच्या सीमाच पुसल्या गेल्यात.
लघुयादीतील ‘लॅण्ड इन द विंटर’ या कादंबरीचे लेखक अॅण्ड्रू मिलर जन्माने ब्रिटिश. पण जडण-घडणीची वर्षे त्यांनी घालविली ती स्पेन,जपान, आयर्लंड आणि फ्रान्स या देशांत. आपली बारावी कादंबरी ‘द रेस्ट ऑफ अवर लाइव्ह्ज’ बुकरच्या स्पर्धेत पोहोचविणाऱ्या बेन मार्कोविट्झ यांचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा. पण शिक्षण झाले इंग्लंड आणि जर्मनी या देशांत. तरुणपणीचा बराच काळ वास्तव्य टेक्सास या अमेरिकी शहरात.
‘फ्लेश’ कादंबरी लिहिणाऱ्या डेव्हिड सलॉय या हंगेरी-ब्रिटनमधील नागरिकत्व असलेल्या लेखकाचा जन्म कॅनडाचा मात्र वडिलांच्या नोकरीमुळे शैक्षणिक तसेच भाषिक वाढ झाली ती लेबनॉन आणि लंडन शहरांत. ‘ऑडिशन’ कादंबरीवाल्या केटी किटमुरा या नावाने आणि चेहऱ्याने पुरत्या जपानी दिसत असल्या, तरी जन्म कॅलिफोर्नियाचा. पीएचडीपर्यंत शिक्षण लंडनमधले. वास्तव्यही ब्रिटनमधलेच. लघुयादीमधील ‘फ्लॅशलाइट’ कादंबरीच्या लेखिका सुझन चॉय यांचा जन्म अमेरिकेत कोरियन पिता आणि रशियन आईच्या पोटी.
कोरियन वडिलांच्या जपानशी असलेल्या संबंधांमुळे त्यांचेही जपानप्रेम कादंबरीभर उफाळून आलेय. अजूनही भारतीय नागरिकत्व जपलेल्या किरण देसाई यांचे वास्तव्य किंवा जडण-घडण युरोप-अमेरिकेतले. त्यांच्या ‘द लोन्लीनेस ऑफ सोनिया अॅण्ड सनी’ या कादंबरीने बुकरच्या लघुयादीत धडक दिली. ब्रिटिश-अमेरिकी मासिके आणि रविवारच्या पुरवण्यांत दीर्घयादी ते लघुयादी काळात त्यांच्या जितक्या मुलाखती झाल्यात, तितका प्रसिद्धीचा लाभ यंदाच्या बुकरयादीमधील कोणत्याच स्पर्धकाला झालेला नाही. यादीतील हे सारे स्पर्धक बहुराष्ट्रांतील जगण्याचा बृहद अनुभव घेतलेले म्हणून या लघुयादीचे महत्त्व इतर कोणत्याही वर्षापेक्षा भिन्न ठरावे.
निवड मंडळाचे अध्यक्ष लेखक रॉडी डॉयल यांनी लघुयादीमध्ये दाखल झालेल्या कादंबऱ्यांतील मानवतावादी दृष्टिकोनाचे कौतुक केले. कथा भिन्न असल्या तरी हा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्तीच्या देशसीमा पुसल्यानंतर येत असावा काय, असा प्रश्न यादीतील लेखकांकडे पाहिल्यावर येतो. म्हणजे किरण देसाई यांच्या कादंबरीत भारतातील मध्यमवर्गी कुटुंबाचे दैनंदिन व्यवहारही आहेत आणि अमेरिकेतील उच्चभ्रू जगण्याचे तपशीलदेखील आहेत. पण कादंबरी सामूहिक गराड्यातील दोन व्यक्तींच्या एकटेपणाच्या गोष्टीवर केंद्रित केलीय.
प्रश्न-समस्यांच्या मिती वैश्विक असलेल्या यादीतील सगळ्या कादंबऱ्या. स्पर्धकांत तीन महिला आणि तीन पुरुष लेखक असा समसमानतेचा प्रकारही पहिल्यांदाच झालाय. १५९ कादंबऱ्यांतून पुढे आलेल्या या सहा कादंबऱ्यांचा निकाल १० नोव्हेंबरला लागेल. तोवर किरण देसाई यांच्यावरील मुलाखती-लेखांचा आकडा शेकडा ओलांडलेला असेल. त्यांच्या नावावर सट्टादेखील नवा विक्रम करेल. अन् तोवर या पानात ‘बुकरायण’ हे नैमित्तिक सदर या वर्षीदेखील वाचकांना भेटत राहील.
बुक-नेट : लघुयादी तयार होताना…
लेखक ख्रिास पॉवर यंदाच्या बुकर निवड समितीमधील एक सदस्य. ‘सहा पुस्तकांच्या निवडीसाठी १५३ पुस्तकांना टोला’ अशा आशयाचे शीर्षक असलेला लेख त्यांनी ‘गार्डियन’मध्ये नुुकताच लिहिला. निवडल्या गेलेल्या पुस्तकांची महत्ता निर्विवादच असते. परीक्षक मंडळ त्यांना लघुयादीपर्यंत आणण्यापूर्वी काय विचार करते. त्यांतून निवड सर्वमताने कशी होते, याचा दाखला या लेखातून सापडू शकेल.
https://tinyurl.com/65yc4fvn
किरण देसाईंचा लेखनसोस…
परदेशी माध्यमांनी २० वर्षांपूर्वीच बुकर पारितोषिक मिळविल्यानंतर किरण देसाई यांच्या अज्ञातवासाबद्दल बऱ्याच गोष्टी मुलाखतींमधून खणून काढल्यात. भारतीय लेखिका आणि पत्रकार मेघना पंत यांनी घेतलेली ही खास मुलाखत. ‘व्होग इंडिया’साठीची. यात ‘द लोन्लीनेस ऑफ सोनिया अॅण्ड सनी’ कादंबरीच्या पहिल्या खर्ड्यातील संपादनाची छायाचित्रेदेखील पाहायला मिळतील. ट्विटरपासून समाजमाध्यमांमध्ये न झळकण्याचा किरण देसाई यांचा शिरस्ता याचबरोबर लेखनप्रक्रियेचा तपशील, असा चांगला ऐवज या मुलाखतीत आहे.
https://tinyurl.com/3j36f9my
तारांकित यूट्यूबरची टीका…
एरिक कार्ल अॅण्डरसन हा फक्त नव्या पुस्तकांची माहिती देणारा यूट्यूबर. मात्र इतर अनेक पुस्तकप्रेमी यूट्यूबर्सना हेवा वाटावा इतका त्याचा वाचनपसारा. त्याचा सर्व वयोगटांतील दर्शकवर्ग गेल्या पाच-सात वर्षांत वाढतोय. याचे पुस्तकवाचन अद्यायावत असतेच. वर त्यांवर तो करीत असलेल्या टिप्पणी आणि टीका गांभीर्याने घेतल्या जातात. बुकरची दीर्घ यादी येईपावेतो याचे बऱ्याच कादंबऱ्यांचे वाचन उरकले होते. त्याला यादीतील काही कादंबऱ्या इतक्या खटकल्या की त्यावरचा टीका-व्हिडीओच त्याने सादर केला. यात टीका केलेले एक पुस्तक आता लघुयादीतदेखील दाखल झालेय. त्यामुळे या पुस्तकांवरच्या टीकेचे मुद्दे काय आहेत, ते येथे जाणून घेता येतील. https://tinyurl.com/4xsycsf9