डाव्या विचारांनी भारलेला पंचविशीचा ब्राझिलियन तरुण, १९६८ च्या डिसेंबरात उरल्यासुरल्या नागरी स्वातंत्र्यावरही गदा आणणाऱ्या आदेशानंतर वैतागतो. अर्थशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीसाठी पुढल्याच वर्षी पॅरिसमध्ये जातो, पदवीही मिळवतो आणि बायकोपोरांना पॅरिसमध्ये आणून लगेच नोकरीलाही लागतो. आफ्रिकेतल्या नव-स्वतंत्र देशांसाठी फ्रान्स आदी देशांकडून मिळणारा निधी योग्यरीत्या खर्च होतो की नाही, याच्या पडताळणीसाठी (म्हणजे भांडवलशाही देशांचा प्रतिनिधी या नात्याने!) आफ्रिकेत अनेकदा जातो. मात्र त्याने सोबत नेलेल्या कॅमेऱ्यातून त्याने टिपलेली छायाचित्रेच जणू काही महिन्यांत तगादा लावतात- नोकरीसाठी तू केलेल्या अहवालांपेक्षा तुझा कॅमेराच जगाला गरिबीकडे पाहायला लावेल, जगाचे डोळे उघडेल… पत्नीचा दुजोरा मिळल्याने नोकरी सोडून तो फोटोग्राफर होतो. पुढल्या अवघ्या २० वर्षांत, सेबास्तिओ साल्गादो हा जगभरच्या अनेक छायाचित्रकारांचा आदर्श ठरतो आणि परवाच्या शुक्रवारी त्यांची निधनवार्ता कळल्यावर फक्त छायाचित्रकार नव्हे, तर विकास अर्थशास्त्राचे अभ्यास, पर्यावरणवादी… ज्यांना ज्यांना आर्थिक विषमतेमुळे जगावर होणारे अत्याचार पाहावत नाहीत ते सारेच, हळहळतात.
सेबास्तिओ साल्गादोंची गोष्ट इथे संपते. पण त्यांनी टिपलेल्या काळाच्या गोष्टी सांगणारी छायाचित्रे हा यापुढेही जगाचा अमूल्य ठेवा ठरणार आहे. ‘चर्चगेट स्थानकात एकाच वेळी दोन लोकलगाड्या शिरताहेत- चेंगराचेंगरीच होणार की काय इतकी प्रचंड आणि वेगाने हलणारी झुंबड फलाटावर असूनही, सर्व माणसे स्वत:ला सांभाळताहेत- फलाट झाकणारी सळसळती झुंबडझूल, येणाऱ्या गाड्या- यांत केवळ स्थानकाची कमान आणि जाहिरातींचे फलकच तेवढे स्तब्ध’ अशा छायाचित्रातून मुंबईचा प्राण ज्यांनी टिपला, झारखंडच्या खाणीत माखलेल्या कामगाराची जगाकडे अविश्वासाने पाहणारी नजर ज्यांनी टिपली, ते सेबास्तिओ साल्गादो! त्यांच्या एकंदर कामापैकी भारतातले काम दोन टक्केही नसेल. अॅमेझॉनचे जंगल आणि त्यातले (बोल्सोनारोंनी पुढे हुसकूनच लावलेले) लोक, आफ्रिकेतल्या सुदान, चाड, इथिओपिया आणि माली इथल्या सत्तापिपासू धुमश्चक्रीला दुष्काळाचीही जोड मिळाल्याने उद्ध्वस्त होणारी माणसे, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतले ढासळते पर्यावरण, ब्राझीलच्या ‘सेरा पेलाडा’ सुवर्णखाणीत किडामुंगीइतकीच जिवाची खात्री असलेले कामगार… हे विषय त्यांनी अधिक टिपले. त्यांची अर्थातच पुस्तके झाली. छायाचित्रांच्या प्रती युरोप/ अमेरिकेतील समकालीन कला-संग्रहालयांनी विकत घेतल्या. आंतरराष्ट्रीय लिलावांतही छायाचित्रांना चांगली बोली मिळू लागली… थोडक्यात, गरिबांची छायाचित्रे टिपणारे सेबास्तिओ साल्गादो मालामाल झाले. पण या मालामाल साल्गादोंनी पैशाचे काय केले? ब्राझीलमधल्या वडिलार्जित जमिनीला आणखी काही एकरांची जोड देऊन त्यांनी अॅमेझॉनच्या पर्जन्यवनातली झाडे लावून, पुन्हा जंगल निर्माण केले! पर्यावरण रक्षणाचे काम करणारी ‘इन्स्टिट्यूटो टेरा’ स्थापून लोकांच्यात जागृती सुरू केली. गेली सहा-सात वर्षे, म्हणजे वयाच्या पंच्याहत्तरीनंतर ते याच कामात पूर्णत: गढले होते. दरम्यान त्यांच्या मुलाने त्यांच्या कारकीर्दीवर केलेल्या ‘साल्ट ऑफ द अर्थ’ या लघुपटाला ‘ऑस्कर’चे नामांकन मिळाले होते.
अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या सर्वोच्च कला संस्थांनी (अकॅडमी ऑफ आर्ट्स) त्यांना मानद सदस्यपद दिले, ‘मॅग्नम’ या प्रख्यात छायाचित्र-समूहाचे ते अध्यक्ष झाले, त्यांना अनेकानेक पुरस्कार मिळाले… पण ‘मी फोटोग्राफरच आहे’ असे सेबास्तिओ साल्गादो सांगत राहिले. हल्ली आपापलेच फोटो काढणाऱ्या मोबाइल फोनमधून साल्गादोंची छायाचित्रे शोधून ती नेटाने पाहणे, ही तरी त्यांना अल्पशी आदरांजली ठरो!