श्रीमंत बापाचा रंगेल दिवटा, त्याचा नोकर आणि कमालीचे कुतूहल असूनही वाहावत गेलेली एक पत्रकार तरुणी यांच्यासह, दिल्ली शहर हेदेखील ‘एज ऑफ व्हाइस’ या कादंबरीतील एक पात्र ठरते..
हिरो, व्हिलन, टोकाची श्रीमंती आणि गरिबी, गुन्हेगारी, मारधाड, भरधाव जाणाऱ्या आलिशान मोटारी, राजकारण, अर्थकारण, शारीरिक आकर्षण, त्यातून घडणाऱ्या चुका.. एखादी तुफान लोकप्रिय होऊ शकेल अशी वेबसीरिज तयार करण्यासाठी यापेक्षा वेगळे काय लागते?
दीप्ती कपूर यांची नवी कादंबरी ‘एज ऑफ व्हाइस’मध्ये हा सारा मसाला ठासून भरलेला आहे. म्हणूनच ती प्रकाशनापूर्वीपासूनच प्रचंड चर्चेत होती. ‘एफएक्स स्टुडिओज’ने वेबसीरिजसाठीचे हक्क विकतही घेतले आहेत. जानेवारीत प्रकाशित झालेल्या या कादंबरीची तुलना ‘द गॉडफादर’ आणि ज्यावर ‘स्लमडॉग मिलियनेअर’ आधारित आहे त्या ‘क्यू अँड ए’ या प्रसिद्ध कादंबऱ्यांशी करण्यात येत आहे. पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क २०हून अधिक देशांतील प्रकाशकांना विकण्यात आले आहेत.
‘एज ऑफ व्हाइस’मध्ये गुन्हेगारीचा थरार आणि राजकारणाचे नाटय़मय मिश्रण आहे. वरवर पाहता ही अजय नावाच्या एक दलित तरुणाची कथा आहे. त्याचे आई-वडील मजूर आहेत. एका घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. वडिलांचा खून होतो. बहिणीला वेश्या व्यवसायात ढकलले जाते. कुटुंबावरील कर्जाची परतफेड म्हणून अजयला नोकर म्हणून ‘विकले’ जाते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो भल्या माणसांमध्ये वाढतो. त्याला शिक्षणही मिळते. प्राप्त परिस्थितीत शक्य तेवढी प्रगती करत तो मोठा होतो. पुढे तो एक अतिश्रीमंत, रगेल-रंगेल (प्लेबॉय) असलेल्या सनी वाडियाचा अंगरक्षक आणि व्यवस्थापक असे अजब स्वरूपाचे काम करू लागतो. या सनीची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. आपण आपल्या वडिलांपेक्षा वरचढ आहोत, हे सिद्ध करून दाखवण्याची त्याची धडपड सुरू आहे. त्याचे शौक अतिशय उंची आहेत, आकांक्षा आवाक्याबाहेरच्या आहेत.
सनी रंगेल आहे. त्याची रात्रीची चैन करून झाली की सकाळी त्याची खोली स्वच्छ करणे, त्याच्या हाती वृत्तपत्र आणून देणे, त्याच्या खाण्या-पिण्याच्या आवडीनिवडी सांभाळणे अशी सर्व कामे अजय करतो. सनीचे रक्षण करणे, त्यासाठी थरारक मारामाऱ्या करणे यातही तो पारंगत झाला आहे. कथा पूर्णपणे रक्तरंजित आहे. नायक सतत कोणाची तरी हाडे मोडताना, डोकी फोडताना आणि निर्घृणपणे गळे चिरताना दिसतो.
तिसरे महत्त्वाचे पात्र आहे नेडा. ही एक पत्रकार आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा आणि तत्त्वांच्या कात्रीत सापडली आहे. तिचे वृत्तपत्र सनीच्या कुटुंबीयांविषयी, त्यांच्या कृष्णकृत्यांविषयी वृत्तलेख प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आवश्यक माहिती गोळा करता करता नेडा सनीच्या आणि त्याच्या ऐषारामी जीवनशैलीच्या प्रेमात पडते. या तीन मुख्य पात्रांची हाव, बदला घेण्याची वृत्ती यातून कादंबरी उलगडत जाते.
उत्तर भारतात वाढलेल्या दीप्ती यांनी काही काळ दिल्लीत पत्रकारिता केली आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचे कथानक दिल्लीत उलगडते आणि दिल्लीतील जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटते. कादंबरी वाचताना हे पदोपदी जाणवते की दीप्ती यांच्याकडे आजच्या काळातल्या दिल्लीविषयी सांगण्यासारखे बरेच काही आहे. दिल्ली हे या कादंबरीला व्यापून उरलेले एक पात्रच आहे, असे म्हणता येईल, एवढा त्या शहराचा प्रभाव कथेवर जाणवतो. ही बदलत्या दिल्लीची कथा आहे. एका विस्कळीत, जुनाट शहराचा बदलत गेलेला चेहरा, जागतिकीकरणाचे आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे तिथल्या जीवनात उमटलेले पडसाद यात ऐकू येतात. तिथल्या रहिवाशांच्या बदलत गेलेल्या आशा-आकांक्षा यात प्रतिबिंबित होतात.
कथा प्रवाही आणि उत्सुकतावर्धक असली तरीही ५००हून अधिक पानांचे हे पुस्तक जरा जास्तच लांबल्यासारखे वाटते, लांबी थोडी कमी असती तर कथा अधिक रंगतदार झाली असती, असे काही समीक्षकांचे म्हणणे आहे.‘एज ऑफ व्हाइस’ ही दीप्ती यांची दुसरी कादंबरी. याआधीची २०१४ मध्ये प्रकाशित झालेली ‘अ बॅड कॅरॅक्टर’सुद्धा अशीच लक्षवेधी ठरली होती; पण ‘एज ऑफ व्हाइस’ची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरही होत आहे. ही तीन कादंबऱ्यांच्या मालिकेतील पहिली आहे. एखाद्या नवख्या भारतीय कादंबरीकाराकडे अशा प्रकारे लक्ष वेधले जाणे, हे विशेष आहे. या कादंबरीचा जानेवारी महिन्यात ‘गुड मॉर्निग अमेरिका’च्या ‘बुक क्लब सिलेक्शन’मध्ये समावेश करण्यात आला होता.
सुरुवातीला ही अजयची कथा आहे असे वाटते, पण कथानक पुढे सरकते तशी ती गरिबी, राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, विकास, त्याचे विविध स्तरांत उमटणारे पडसाद असे अनेक कंगोरे उलगडून दाखवणारी कथा असल्याचे जाणवते. ओळखीची वाटू लागते. आपण रोज जे पाहतो, वृत्तपत्रांतून वाचतो, ज्या घटना पाहून चिंताक्रांत होतो, चिडतो, त्याचेच हे एका सूत्रात गुंफलेले कथानक आहे, याची जाणीव होऊ लागते. यावरील वेबसीरिज ही भारतात तुफान गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’च्या तोडीची होईल, असा विश्वास अमेरिकी दैनिकांतून व्यक्त केला जात आहे. कादंबरीत भरलेला मसाला पाहता, त्यात तथ्य आहे, असे म्हणता येईल.
