राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वीचे ऋषी ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद देत असत. सध्या थोर व तत्त्वज्ञ लोक संतती नियमनावर जोर देतात, मात्र निसर्गाशी सतत लढत राहणे कठीण असल्यामुळे संतती नियमन अशक्यप्राय होऊन बसते, असे कित्येकांचे गाऱ्हाणे आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत जबरीने संततिनियमन करण्यापेक्षा संतती पोषणार्थ राष्ट्राची आर्थिक परिस्थिती अधिक चांगली करून घेणे योग्य होणार नाही का? एका साधकाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हाच प्रश्न केला. त्यावर ते म्हणतात, ‘‘पुत्र कितीही होवोत, माणसाने इंद्रियाधीनतेने संसार केला, की एक पवित्र कर्तव्य पार पडण्याच्या दृष्टीने संसार केला, हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. माणूस वैषयिक प्रवृत्तीने भारला गेला असेल, तर तो उत्तमपणाचा भागीदार होणे अशक्य आहे. त्याची वृत्ती इंद्रियांच्या स्वैराचाराकडे धावणारी असली तर ते त्याच्या माणुसकीला भूषण नव्हे!’’

‘‘केवळ सत्कार्यप्रवृत्त होऊन संसार करणारा मनुष्य कसा काय संभवतो, याची आपणास कदाचित शंका वाटेल. परंतु अशी वृत्ती अंगी बाणविण्यासाठी संसार का करावा, हे ज्ञान देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना आश्रमीय शिक्षण दिले पाहिजे. त्याकरिता त्यांनी पुत्रलोभही सोडला पाहिजे. राष्ट्राच्या नेत्यांना पुत्रकार्यार्थ आपली उचित संपत्ती देऊन ‘‘आमचा या पुत्रावरचा हक्क संपला, याला तुम्हीच कार्यक्षम करावे व याचे भावी जीवित तुमच्यावर अवलंबून आहे,’’ अशी पती-पत्नींनी उभयता ग्वाही द्यावी. असे झाल्यास माणसाचे ध्येय सुधारेल व तो विकारवश होऊन बिघडण्यापेक्षा सुधारेल, यात शंका नाही. आपले पूर्वज असे करीत असत. माणसाने स्वैराचारी व्हावे असे राष्ट्राचे ध्येय नसून तुम्हालाच राष्ट्रनिर्मिती, संपत्ती व संततीचे जनक म्हणून पात्र करावे, अशी योजना आहे. एखादी पिढी स्वैराचाराच्या ताब्यात गेली म्हणून तशा सर्व होतील, असे मानून राष्ट्राने तिची व्यवस्था लावावी की, आपल्या आचरणावर ताबा ठेवून आपण सुखी व्हावे?’’

‘‘ऋषींच्या आशीर्वादापेक्षाही भरमसाट पैदास भूषणावह वाटते की, ‘पुरे एकचि पुत्र मायपोटी। हरिस्मरणे उद्धरी कुळे कोटी’ हे बरे वाटते? आपण म्हणाल ‘आम्ही जरी प्रयत्न केला तरी ते साधत नाही.’ याला माझे उत्तर असे की, तुम्हाला तुमच्या दुर्बलतेने जे साधत नाही त्याची सोय राष्ट्राने कशी लावावी?  बहुसंख्य झालेली ही मुले जर तुमच्याहून जास्त विषयासक्त निघाली व त्यांनी राष्ट्राच्या हाकेसरशी शिपायी होण्याचे नाकारले व आम्ही आयत्या धनावर नागोबा मात्र होणार असे धोरण स्वीकारले तर ही सर्व सांगड कशी जमायची? राष्ट्राच्या सुखसोयी वाढविण्यासाठी तरुणांचे साहाय्य घ्यावे लागणार नाही का? आणि राष्ट्रीयता जर अंगी बाणली नसली तर सुखसोयी तरी कशा वाढणार? तुमच्या संततीनेही जर वरील स्वार्थी मनोवृत्ती बाळगून असे म्हटले की, आमच्याही संततीची तुम्हीच व्यवस्था करा, तर हे कसे काय जमायचे? तेव्हा या सर्व वितंडवादापेक्षा मनुष्याने आपला संसार वर सांगितल्याप्रमाणे नि:स्वार्थ बुद्धीने, नियमितपणे व आपली अधिक शक्ती खर्च न करता केला तर या सर्व बाबी सुलभ होतील.’’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara builders of wealth and nation rashtrasant tukdoji maharaj ysh