Premium

चिंतनधारा : सेवामय जीवन हाच गीतेचा पूजापाठ

‘‘श्रीकृष्णाचा हा आदर्श व गीतेचा हा आदेश जीवनात उतरविणे हाच खरा गीतेचा पाठ ठरणार आहे.

rashtrasant tukdoji maharaj
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘भगवद्गीतेमधील यथार्थता समजावून सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘गीतेची भूमिका केवळ भाविकतेची नाही. श्रीकृष्णाची गीता ही देवपाटात पूजनासाठी नाही; तिचा जन्म कर्तव्याच्या कणखर रणमैदानावर झाला आहे. गीतेची पूजा ही अक्षता फुलांनी होऊ शकत नाही; कारण सत्यासाठी शिरकमले वाहण्याच्या प्रसंगातून ती जन्मास आली आहे. स्वर्गाच्या आशेने मुर्दाड जीवन जगून अन्याय सहन करत वेदांताच्या घोषणा कराव्यात हे गीतेला मान्य होणे शक्य नाही.’’

‘‘हे विश्वच स्वर्गीय सौंदर्याने नटविण्याचे कर्तव्य करण्याचा संदेश देण्यासाठी ती अवतरलेली आहे. कुण्या पंडितांच्या मुखातून ती बाहेर पडली नाही; तर समाजाच्या खालच्या थरातील भोळय़ा मुलांत मिसळून, गायी चारून, समाजावरील संकटाचा नि:पात करून, बासरीवर फिरणाऱ्या कलावान बोटांनी प्रसंगी प्रखर चक्र धरून, आश्रमातील मोळय़ा वाहून नेणाऱ्या गोपालाच्या मुखातून ती प्रगट झाली आहे. डोळस परिश्रमातूनच जिवंत ज्ञान जन्मास येते याचे हे प्रात्यक्षिक आहे आणि सेवाबुद्धीचे परिश्रम करण्याचा संदेश देण्यासाठीच ती अवतरली आहे.’’

‘‘श्रीकृष्णाचा हा आदर्श व गीतेचा हा आदेश जीवनात उतरविणे हाच खरा गीतेचा पाठ ठरणार आहे. मोठेपणाच्या व पवित्रतेच्या पोकळ अहंकाराने समाजापासून दूर जाणाऱ्या, स्वर्गाच्या आशेने उंच-उंच भराऱ्या मारणाऱ्या पांढऱ्या शुष्क ढगाऐवजी, समाजाला जीवन वाहून देऊन शांत करण्यासाठी खाली येणाऱ्या काळय़ा जलपूर्ण ढगातच गीतेसारखे उज्ज्वल ज्ञान चमकत असते. श्रीकृष्णाचे ज्ञान हे नुसते ग्रंथांचे ज्ञान नाही. शेकडो ग्रंथ वाचून बुद्धीला फाटे फोडून घेतल्यानेच जीवन सुखमय होऊ शकेल ही आशा व्यर्थ आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सुचविले आहे.

संदर्भासाठी शेकडो ग्रंथ गीतेने जमेस धरले असले तरी वास्तविक गीता ही जीवनाचे स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. सेवामय जीवनात शेकडो संघर्षांतून व आघातांतून उदयास आलेला तो अमर प्रकाश आहे. समाजाच्या जीवनाचा व त्याच्या उन्नतीचा पुरेपूर विचार करून

त्याला अनुसरूनच कृष्णाने ज्ञानगीता सांगितली आहे. समाजाला विसरून कृष्णाने जर पुस्तकांनाच महत्त्व  दिले असते, विद्वानांची ठरावीक विचारसरणीच जर शिरोधार्य मानली असती तर गीतेचे स्वरूपच बदलून गेले

असते; ती सध्याच्या स्वरूपात दिसून आली नसती.’’

‘‘अर्जुन तर आपल्या ग्रंथाभ्यासी बुद्धिकौशल्याने व परंपराप्राप्त विचारांनी म्हणतच होता की, ‘वर्णसंकर, पितरांच्या पिंडदानांत अडथळा, जीवहत्या, गुरुजनसंहार इत्यादी पापापासून वाचणे हीच खरी बुद्धिमानता व हाच खरा धर्म! आणि त्याचा एकमात्र उपाय या अघोर रणापासून परावृत्त होऊन सर्वसंगपरित्याग करून भक्ती करीत राहणे.’ पण श्रीकृष्णाने या रूढ धर्मविचाराला धुडकावून लावले व त्या क्रांतिकारक विचारांनाच ‘गीता’ हे नाव मिळाले.’’

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chintandhara rashtrasant tukdoji maharaj explaining truth in bhagavad gita zws