राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘अधिक मासात मला ठिकठिकाणी लोक फळे, खाद्य, ताटवाटय़ा आदींचे दान व दक्षिणाही देताना मी अनुभवले. अधिक मास म्हणजे दानपुण्याची महान पर्वणी! यावर विचार करताना मला वाटले, ज्या कोणी हे अधिक मासाचे माहात्म्य लिहून ठेवले असेल त्याने आपल्या जीवननिर्वाहाची सगळीच सोय मोठय़ा कुशलतेने लावून ठेवली असावी. त्या काळाच्या दृष्टीने ते योग्यही असू शकते. कारण त्या वेळी उपदेशकांना पगार मिळत नव्हता. जनसेवा करावी आणि दान घेऊन पोट भरावे, याशिवाय वेगळा मार्गच नव्हता. परंतु आता सगळेच नोकर, दुकानदार आणि धंदेवाईक व्यापारी झाले आहेत; मात्र अधिक मासाची प्रथा जशीच्या तशीच सुरू आहे. ही गोष्ट नुसती चुकीचीच नव्हे तर अत्यंत घातक आहे. ‘पुण्य करिता होय पाप’ असाच परिणाम यातून निघत असतो.’’

‘‘आज दानाचा ओघ आपणास बदलून टाकला पाहिजे. समाजकार्यासाठी आपले तन, मन व धन अर्पण करणे; दु:खितांना सुखी करण्यासाठी भूमिदान, श्रमदान, विद्यादान, कलादान इत्यादी दानांना उत्तेजन देणे आणि शाळा, दवाखाने, विहिरी, रस्ते, गरिबांची घरे वगैरे बांधण्यासाठी पैशांचा व्यय करणे हेच आजच्या युगातील सर्वोत्तम पुण्यकर्म समजले पाहिजे.

ही दृष्टी समाजातील सर्व लहानथोर लोकांना देण्याची जबाबदारी आज सर्व समजदार लोकांची आहे, हे ध्यानात घ्या. ज्याचे जीवन २४ तास समाजाचे कार्य करण्यात खर्ची पडते किंवा जो पुरुष रात्रंदिवस सतत अध्यात्मचिंतनात मग्न राहतो आणि आपल्या देहधारणेसाठी काहीही उद्योग करू शकत नाही, अशा पुरुषांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी समाजाने घ्यायला हरकत नाही. रंजले-गांजले, दीन-अनाथ, लुळे-पांगळे अशांची विचारपूर्वक सहानुभूतीने व्यवस्था लावणे, हे तर समाजाचे आवश्यक कर्तव्यच आहे. मात्र यातही ऐदीपणा आणि ढोंगधतुरा वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे.’’

‘‘अशा प्रकारच्या दानधर्माऐवजी एकाहून एक उंच आपआपल्या धर्माची प्रतीके बांधण्याची किंवा दानदक्षिणेत व्यर्थ पैसे उधळण्याची जी चढाओढ समाजात चालत आली आहे, तिला ताबडतोब फाटा दिला पाहिजे. पण हे कार्य ज्या साधुसंतांनी, धर्मपुरुषांनी करायला पाहिजे, ते स्वत:च वैभवाच्या मागे लागून आपले कर्तव्य विसरत आहेत. त्याग हेच ज्यांचे भूषण, त्यांना या ना त्या रूपाने धनसंग्रहाची चटक लागलेली दिसून येत आहे. जनतेला बुद्धी देण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे, मग ते साधुसंत असोत, विद्वान पंडित असोत की प्राध्यापक- उपदेशक असोत, त्या सर्वाचा ओघ धनसंग्रहाऐवजी समाजासाठी शक्य तितका त्याग करण्याकडे वळायला पाहिजे.’’ महाराज ‘लहरकी बरखा’ ग्रंथात म्हणतात,

ऐ धर्मवालों! धर्म से,

तुमने किया बेपार है।

सब देवता करके अलग,

फैला दिया व्यभिचार है।।