महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाच्या वतीने अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या राज्य कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने वादाचा आणखी एक आखाडा पार पडला. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळच्या रूपाने नवा ‘महाराष्ट्र केसरी’ गवसला. पण, या वेळी त्याच्या विजेतेपदाला लागलेली वादाची किनार विसरता येणार नाही. किताब जिंकल्यानंतरही चर्चा पृथ्वीराजच्या विजयाची, त्याच्या कौशल्याची वा मेहनतीची नाही, तर त्याच्याविरुद्ध गादी विभागात अंतिम लढतीत चितपट झालेल्या शिवराज राक्षेची आणि त्याने केलेल्या कृतीची अधिक झाली. किताबी लढतीला तीन दिवस झाले, तरी ही चर्चा थांबायचे नाव घेत नाही. राष्ट्रीय पातळीवर बृजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांच्या विरोधात साक्षी मलिक, विनेश फोगट या अव्वल महिला कुस्तीपटूंनी दिलेला लढा या पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र केसरी’ लढतीच्या निमित्ताने होणारी ही खडाखडी भारतातील कुस्ती नेमकी कुठे चालली आहे, असा प्रश्न उपस्थित करणारी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चितपट झालेला शिवराज राक्षे, पंचांचा वादग्रस्त निर्णय आणि त्याचे पर्यवसान म्हणून राक्षेने पंचांवरच केलेला लत्ताप्रहार यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ची चर्चा वेगळ्याच वळणावर गेली आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ किताब हा कुस्ती क्षेत्रात प्रतिष्ठेचा आणि दर्जाचा मापदंड. अलीकडच्या काळात या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालण्यापेक्षा समांतर रेषेसारख्या चालत आहेत. प्रतिष्ठा आणि दर्जापेक्षा लढत आणि वादच आता केंद्रस्थानी आहेत. किताबी विजेता स्पर्धेपूर्वीच ठरवलेला असतो, ही टीका याचाच परिणाम. माजी कुस्तीपटू आणि तज्ज्ञच आता ती उघडपणे करू लागले आहेत. अहिल्यानगरमधील गादी विभागातील अंतिम लढतीत पृथ्वीराजने शिवराजला ढाक डावावर शिताफीने खाली घेतले. कुस्ती धोकादायक परिस्थितीत जाण्यापूर्वीच पंचांनी शिवराज चितपट झाल्याचा निर्णय दिला. जल्लोषासाठी चाहते मॅटवर आले. अशा वेळी चाहत्यांना पंचांच्या निर्णयाशी काही घेणे-देणे नसते, तसेच या वेळीही झाले. या गर्दीतून वाट काढून निर्णयाला आव्हान देण्यासाठी शिवराजने पंचांकडे धाव घेतली. पंच ऐकेनात असे दिसल्यावर त्याने थेट पंचांची कॉलर पकडली आणि पुढे जाऊन त्यांना लाथही मारली. पंच शेवटी माणूस आहे आणि तो चुकूही शकतो. पण, त्यासाठी पंचांना मारहाण करणे हे उत्तर असू शकते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काहींनी शिवराजचे समर्थन केले असले आणि आणखी पुढची भाषा बोललेली असली, तरी कुस्तीच्या भल्यासाठी आणि प्रतिष्ठेसाठी ते योग्य आहे का, हा यातील कळीचा प्रश्न.

याच स्पर्धेत अन्य एका स्पर्धकाने लढत अर्धवट सोडून थेट पंचांना शिवीगाळ केली. खेळाचे मैदान कुठलेही असो, तेथे घडलेल्या घटनेचा पंच हा पहिला थेट साक्षीदार असतो. त्यामुळे त्याच्या निर्णयाला मान मिळायलाच हवा. आधुनिक काळात पंचांच्या निर्णयाला दाद मागता येते. कुस्तीतही ती सुविधा उपलब्ध आहे. तिचा उपयोग येथे केला गेला नाही. पण, म्हणून पंचांना मारणे हे योग्य कसे ठरू शकते? मारहाणीच्या भीतीने पंच लढतीसाठी उभेच राहिले नाहीत, तर स्पर्धा कशा होतील, हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा. कुस्तीच्या आखाड्याचा राजकीय वर्चस्वासाठी उपयोग ही यातील आणखी एक बाब. महाराष्ट्र कुस्तिगीर संघ हा भारतीय कुस्ती महासंघाच्या आश्रयाने आस्तित्वात आला. मात्र, सध्या कुस्ती महासंघावरच सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. सरकारने यावर अजून निर्णय दिलेला नाही. महाराष्ट्रातील राज्य कुस्तिगीर परिषदेचे अस्तित्व तडकाफडकी संपविण्यात आले. पण, न्यायालयात राज्य कुस्तिगीर परिषदेने आपली बाजू मांडून विजय मिळविला. त्यामुळे गेली तीन वर्षे ‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन लढती होतात, दोन राज्य अजिंक्यपद स्पर्धा होतात. या वेळीदेखील कुस्तिगीर परिषदेने मार्चमध्ये आपली स्पर्धा जाहीर केली आहे. राज्य कुस्तिगीर संघाकडूनच आलेल्या संघास राष्ट्रीय स्पर्धेकडून मान्यता मिळणार असेल, तर कुस्तिगीर परिषदेने दुसऱ्या स्पर्धेचा घाट कशासाठी घालायचा? यामुळे मल्लांपुढेही कुठल्या स्पर्धेत खेळायचे, हा प्रश्न घर करून आहे. कुस्ती प्रशासकांना हे कधी कळणार? यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबी लढतीनंतर हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे कुस्तीच चितपट होण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. ही भीती प्रत्यक्षात उतरली, तर या रांगड्या पारंपरिक खेळाची अप्रतिष्ठा होईल, हे सांगणे न लगे!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial referee decision at maharashtra kesari wrestling competition zws