वन्यजीवांविषयी संवेदनशीलता महत्त्वाचीच पण तिला व्यावहारिक दृष्टिकोनाची जोड हवी. जंगल वाचविण्यासाठी दरवेळी तेथील रहिवाशांना हद्दपार करणे गरजेचे नसते. वाघ वाचवलेच पाहिजेत, पण ते नरभक्षक असतील, तर त्यांचा बंदोबस्तही केला पाहिजे, असा समतोल दृष्टिकोन ठेवून वन्यजीव संरक्षणासाठी भरीव कामगिरी करणारे डॉ. असीर जवाहर थॉमस जॉनसिंग ऊर्फ डॉ. ए. जे. टी. जॉनसिंग नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : इस्रायलमधील एकोप्याला सुरुंग

तळ पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील तमिळनाडूतील नांगुनेरी येथे निसर्गसंवर्धनाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जॉनसिंग यांचा जन्म झाला. जिम कॉर्बेट यांच्या कथांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. प्राणीशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी वन्यजीवांवर पीएचडी केली. देशातील वाघांचे अनेक अधिवास त्यांना जवळून माहिती होते. व्याघ्र प्रकल्पांची स्थापना करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. १९७६-७८ दरम्यान सस्तन प्राण्यांवरील त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. यात कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील ढोल या प्राण्याच्या अभ्यासाचा समावेश होता. १९८०च्या दशकात त्यांनी हत्तींवर काम सुरू केले. ‘प्रोजेक्ट एलिफंट’च्या आखणीत त्यांची भूमिका निर्णायक ठरली. मुदुमलाई अभयारण्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. वॉशिंग्टन डीसीतील स्मिथसोनियन संस्थेत त्यांनी काही काळ काम केले. ऑक्टोबर १९८१ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये काम करण्यासाठी ते भारतात परतले. त्यानंतर ‘वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये फॅकल्टी सदस्य म्हणून काम करू लागले आणि पुढे याच संस्थेचे अधिष्ठाता झाले. निवृत्तीनंतरही ते निसर्ग संवर्धन संस्था, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया आणि कॉर्बेट फाउंडेशन यांसारख्या संस्थांमध्ये सक्रिय होते.

हेही वाचा >>> पहिली बाजू : बाधाये आती है आएँ…

१९७६ साली बांदीपूरमध्ये ढोलांचा पाठलाग करताना ते वाघापासून थोडक्यात बचावले. बांदीपूरमध्ये फिरणाऱ्या वाघाची पहिली स्पष्ट प्रतिमा त्यांनी टिपली होती. भारतातील विविध वनक्षेत्रांतील हत्तींचीदेखील अनेक वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे त्यांनी टिपली. डॉ. जॉनसिंग यांनी अनेक वनाधिकारी, सुमारे ३०० वन्यजीव व्यवस्थापक आणि ५० वन्यजीव अभ्यासकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन संवर्धनाचा वारसा त्यांच्याकडे सोपविला. राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले.

भारतातील धोरणकर्त्यांनी पर्यावरण आणि वन्यजीवांविषयीचा उदासीन दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असे डॉ. जॉनसिंग यांचे आग्रही मत होते. चंदनचोर विरप्पन आणि वन्यजीवांची शिकार करणारा संसारचंद यांचा बंदोबस्त करण्यात सरकारी पातळीवरून अक्षम्य विलंब झाला, अशी टीका ते करत. प्रत्येक कामात वेळकाढूपणा करण्याची वृत्ती प्रचंड नुकसान करणारी आहे, असे त्यांचे म्हणणे होते. डॉ. जॉनसिंग यांची अखेरपर्यंत सुरू असलेली जंगलभ्रमंती आता थांबली आहे.