डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो- बंडखोरीने ग्रासलेला देश. तिथे काँगोलीज आर्म्ड फोर्सेस आणि एम२३ हा बंडखोरांचा गट यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. अशा कोणत्याही संघर्षग्रस्त भागात तणावाला सर्वाधिक बळी पडतात त्या महिला आणि मुली. काँगोमध्ये या बंडखोरांकडून बलात्कार, शारीरिक हिंसाचार, छळाचा प्रयोग एखाद्या आयुधाप्रमाणे केला जातो आणि या साऱ्याचा सामना कसा करावा याविषयी महिला पूर्णपणे अनभिज्ञ आणि हतबल असतात. अशा महिलांना आवाज मिळवून देणाऱ्या, हिंसेशी दोन हात करण्याची क्षमता मिळवून देणाऱ्या मेजर राधिका सेन यांना नुकतेच ‘युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांतून लैंगिक समता प्रस्थापित करण्यात वैयक्तिकरीत्या महत्त्वाचे योगदान देणाऱ्यांना २०१६ पासून या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिका या मूळच्या हिमाचल प्रदेशच्या बायोटेक इंजिनीअर. संशोधन क्षेत्रात काम करून मानवाच्या कल्याणात योगदान द्यावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून त्या मुंबईतील आयआयटीमध्ये मास्टर्स करत होत्या. मास्टर्सच्या शेवटच्या वर्षाला असताना सहज भारतीय लष्करात भरती होण्यासाठीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाल्या. मात्र आता संरक्षण की संशोधन असे द्वंद्व लढावे लागणार होते. त्यांनी संरक्षण क्षेत्र निवडले. २०२३ मध्ये ‘मोनस्को’ म्हणजेच ‘युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन स्टॅबिलायझेशन मिशन इन द डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’मध्ये एंगेजमेंट कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : रिचर्ड एम. शेरमन

पूर्णपणे भिन्न संस्कृती, परंपरा असलेल्या तणावग्रस्त प्रदेशात लोककल्याणाचे काम आव्हानात्मक असते. मोनस्कोविषयी काँगोमधील रहिवाशांत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे स्थानिकांशी संवाद साधण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असे. कधी घोषणाबाजी, तर कधी थेट दगडफेकही होत असे. याविषयी एका मुलाखतीत राधिका सांगतात की, ‘आम्ही सुरुवातीला तेथील पुढाऱ्यांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढारी त्यांच्या सोयीचे चित्र उभे करत होते. त्यामुळे थेट स्थानिक महिलांशी संवाद साधू लागलो. या महिलांमध्ये प्रचंड भीती होती. त्यांच्या घरातही त्या उघडपणे बोलत नसत. मग महिन्यातून दोनदा कॅम्प आयोजित केले. त्यांना बोलण्यासाठी जागा मिळवून दिली. तेव्हा माहिती मिळू लागली. समस्या कळू लागल्या.’

मुळात आपल्यावर अन्याय होत आहे, तो योग्य नाही आणि त्याचा प्रतिकार केला पाहिजे याची जाणीवच अनेकदा अशा संकटग्रस्त महिलांना नसते. शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाचा अभाव ही महिलांच्या दुरवस्थेमागची प्रमुख कारणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मोनस्कोने काँगोमधील रहिवाशांचे लहान गट करून महिलांना स्वसंरक्षण, शिवणकाम, बेकिंग, बालकांची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले. लहान मुलांना स्वसंरक्षण व इंग्रजी संभाषण आणि तरुणांना वाहन दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले. जेणेकरून हे सर्व जण मोनस्कोच्या अनुपस्थितीतही स्वसंरक्षण करू शकतील, पायांवर उभे राहू शकतील. त्यांच्या या प्रयत्नांना लक्षणीय यश मिळाले. आज तेथील महिला स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करू पाहत आहेत. राधिका या पुरस्काराने सन्मानित झालेल्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या. त्यांच्याआधी २०१९ मध्ये सुमन गवाणी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. ‘लैंगिक संवेदनशीलता, समता प्रस्थापित करणे हे केवळ महिलांचे काम नाही, ती आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ याची आठवण त्यांनी पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर करून दिली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facts about indian army officer radhika sen zws