कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्राबल्य असण्याच्या आजच्या काळात स्त्रीपुरुष असमानतेबाबतचे पूर्वग्रहदेखील जसेच्या तसे पाझरत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानावर ज्याचे नियंत्रण आहे, त्याच्या मानसिकतेमुळे स्त्री आपोआपच दुय्यम ठरवली जात आहे. तंत्रज्ञान म्हटले की विमान, क्षेपणास्त्रे, अंतराळयान, शस्त्रास्त्रे, अण्वस्त्रे डोळ्यासमोर येते… घरगुती मिक्सर, धुलाईयंत्रे, इस्त्री, स्वयंपाकाची शेगडी वगैरे काहीच डोळ्यासमोर येत नाही, असे का? कल्पनेतील आणि जगण्यातील तंत्रज्ञान वेगळे का? तंत्रज्ञानाला भोवतालच्या सामाजिक, राजकीय अभिसरणाचा वास असतो. तंत्रज्ञानामध्ये राजकीय हितसंबंध आणि सत्ताकारणाची उद्दिष्टे अंतर्भूत असतात. ते केवळ वस्तुनिष्ठ वैज्ञानिक शोधासाठीच नव्हे, तर समाजरचना, संस्कृती, मूल्ये आणि राजकारण यांच्या प्रभावातून निर्माण होते. साहजिकच पुरुषप्रधानता, सामर्थ्य, मर्दानगी वगैरे पैलू तंत्रज्ञानाला उपजतच जोडले जातात. STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) या क्षेत्रात मुलींची संख्या कमी असणे हे समाजात सामान्य समजले जाणारे वास्तव आहे. यामागे काही क्षेत्रांना ‘प्रतिभा’ आणि ‘अलौकिक बुद्धिमत्ते’ची आवश्यकता असल्याचे मानले जाते, तर इतर क्षेत्रांसाठी ‘सहानुभूती’ किंवा ‘कठोर परिश्रम’ महत्त्वाचे मानले जातात. ज्या क्षेत्रांमध्ये ‘जन्मजात प्रतिभा’ अपेक्षित असते, तेथे महिलांचे प्रमाण खूपच कमी असते हा समज दृढ झालेला दिसतो. त्यातूनच समाजामध्ये लिंगात्मक गैरसमजुती निर्माण होऊन पुरुषांची मक्तेदारी असणारी क्षेत्रे कौशल्याची आहेत हा समज प्रचलित झाला. पूर्वी घरगुती स्तरावर प्रसूती करणाऱ्या सुईणींचे काम अप्रतिष्ठित मानले जायचे मात्र पुरुष प्रसूतीतज्ज्ञांचा उदय झाल्यानंतर या व्यवसायाला प्रतिष्ठा आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहानपणी मुलाला कार आणि मुलीला बाहुली देण्यापासून आपण तंत्रज्ञानातील लिंगात्मक भेदांना बळकटी देण्यास सुरुवात करतो. बालपणी तंत्रज्ञानाच्या वापरातील फरक, विविध प्रेरणास्थानांची (रोल मॉडेल्स) प्रचलित असलेली विषमता, शिक्षणपद्धतीतील वैविध्य, आणि रोजगार बाजारातील अतिरेकी लैंगिक विभाजन या सर्व घटकांमुळे पुरुषांना ‘बलवान, हाताने काम करणारे आणि तंत्रज्ञानात पारंगत’ तर स्त्रिया या ‘शारीरिक आणि तांत्रिकदृष्ट्या अक्षम’ अशा प्रतिमा रूढ होण्यास मदत होते. याचमुळे स्त्रिया प्रामुख्याने कमी प्रतिष्ठा असलेल्या व्यवसायांमध्ये (टेलिफोन ऑपरेटर्स, डेटा एंट्री, संदेशवहन उपकरण चालक, रिसेप्शनिस्ट) अधिक प्रमाणात आढळतात. याउलट पुरुष, संगणक प्रणाली विश्लेषक, वैज्ञानिक, अभियंते यांसारख्या उच्च-प्रतिष्ठित तांत्रिक भूमिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आजकाल महिला अभियंत्यांचे प्रमाण वाढले असले तरी बहुतांश स्त्रिया या पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन मध्यम स्तरांवर काम करतात तर संशोधन आणि निर्मितीसारख्या क्षेत्रांमध्ये पुरुषांचीच मक्तेदारी जाणवते. पुरुष निर्णय घेतात आणि स्त्रिया ते अमलात आणतात. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगायचे कसे याचा मार्ग पुरुष ठरवतात आणि स्त्रिया त्या मार्गाची देखरेख करतात.

‘पाळीचे पॉलिटिक्स’ या पुस्तकाच्या लेखिका आणि स्त्रीवादी अभ्यासक डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांच्या मते स्त्रियांना वैद्याकीय शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरुवातीपासून सुरू होते. अति शिक्षणाने मेंदूमध्ये रक्तस्राव होईल, गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी होऊन स्त्रिया मूल जन्माला घालू शकणार नाहीत, अशा शंका उपस्थित करण्यात आल्या. स्त्रियांना डॉक्टरपेक्षा परिचारिका होण्यासाठी प्रोत्साहन देणे, जेणेकरून पुरुष डॉक्टरांच्या हाताखाली त्या काम करतील हा हेतू या सर्व भ्रामक समजुती पसरविण्याचे मूळ होता. वैद्याकीयशास्त्राबद्दल त्या सांगतात की स्त्रियांना लैंगिक चेतना प्रदान करणारा शिश्निका (क्लिटोरिस) हा अवयव तेवढा सखोल अभ्यासला गेला नाही कारण केवळ लैंगिक सुखासाठी समर्पित अवयव स्त्रीच्या देहात असू शकतो यावर विश्वास ठेवणे ‘पुरुषी’ वैद्याकीय तज्ज्ञांना जड जात होते. पुढे जाऊन शरीरावर औषधनिर्माणासाठी प्रयोग करणे चालू झाले तेव्हा स्त्रीदेह हा निसर्गाशी जास्त मिळताजुळता आहे या सबबीखाली स्त्रियांवर प्रयोग करणे सामान्य झाले. गर्भनिरोधक गोळ्या या पुरुषांसाठी उपयोजित न करता प्रामुख्याने स्त्रियांसाठी करणे, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी स्त्रियांना प्राधान्य हे सर्व याच पुरुषप्रधान मानसिकतेतून आले आहे.

दैनंदिन तांत्रिक वापरातील कित्येक गोष्टींना स्त्री-पुरुष उपमा देणे आपल्या दिनचर्येचा भाग आहे. नट आणि बोल्ट, प्लग आणि सॉकेट यांना स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियाच्या आकारावरून संबोधणे यामध्येसुद्धा वर्चस्ववाद आहे असे काही अभ्यासकांना वाटते. विद्याुत सॉकेट हे ग्राहक आहे तर पुरुषी प्लग, ज्यामध्ये विद्याुतप्रवाह आहे तो त्या सॉकेटचे नियंत्रण करतो म्हणजेच सामाजिक वर्तुळात पुरुषसत्ताक असणारी उतरंड तांत्रिक भाषेत उमटताना आपल्याला दिसते. स्त्रीदेह हा प्रस्थापितांच्या नियंत्रणाचा कायमच विषय राहिला आहे. आधी धर्माच्या नावाखाली त्यावर नियंत्रणे आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर उदारमतवादाच्या नावाखाली प्रदर्शन चालू झाले. सध्याच्या तंत्रकेंद्रित संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात डोना हॅरावेसारख्या अभ्यासकांनी तंत्रज्ञानाकडे पारंपरिक बंधनांपासून मुक्ती देणारा मसीहा या दृष्टीने पाहिले. समाजमाध्यमांच्या या दुनियेत आपले संपर्कजाळे विस्तारून महिलांचा सामाजिक कुप्रवृत्तीविरोधात लढण्याचा आवाज बुलंद होईल असे वाटले. इंटरनेटच्या माध्यमातून पारंपरिक लिंगभेद आधारित व्यवस्था बदलता येऊन यंत्राद्वारे ‘शरीर’ आणि ‘अंतर्मन’ यांच्यातील नातेसंबंध पुनर्निर्मित होतील, हा आधुनिकोत्तर (पोस्टमॉडर्न) स्त्रीवादातील एक लोकप्रिय विषय आहे. मात्र सामाजिक व्यवस्था सत्तानियंत्रणाचा छुपा अजेंडा या काळातही जोमाने राबवीत आहे असे दिसते.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे चलचित्रांची मुबलकता सामान्य मनोविश्वाला व्यापून गेली. त्यामुळे शरीराची छायाचित्रणासाठी सदैव तत्पर राहण्याची वृत्ती बळावत गेली. त्यातूनच विशेषत: स्त्रिया या शरीरसौंदर्य आणि नेटकेपणा याबाबत सजग राहू राहिल्या. भांडवलकेंद्रित कॅमेरा फिल्टर्स आणि एडिटिंग कौशल्यामुळे सौंदर्याचे बाजारकेंद्रित नवे परिमाण प्रस्थापित झाले आणि स्त्रिया त्यामध्येच स्वत:ला गुंतवून घेऊ लागल्या. चेहऱ्याबरोबरच इतर शारीरिक वैशिष्ट्यांबद्दल चिंता उत्पन्न होऊन बाजारकेंद्रित अल्गोरिदमच्या शिकार झाल्या. त्यानंतर अश्लील आणि बीभत्स चित्रपटांचे पेव फुटल्यामुळे गेल्या काही वर्षांत लैंगिक आक्रमकता आणि शारीरिक हिंसेमध्ये वाढ झालेली दिसून येते. तिसरी गोष्ट, विविध सौंदर्य प्रसाधनांच्या मुद्रा, आहार सल्लाविषयक अॅप, कॅलरीकेंद्रित दृष्टिकोन आणि त्यानुसार बाजारातील नवी खाद्यास्वरूपे हे या सर्व बदलांचे लाभार्थी आहेत. सिरी आणि अलेक्सासारखी स्त्रीलिंगी आदेश पालन प्रणाली स्त्रियांचे समाजातील काम हे आदेशांचे पालन करणे असते या समजुतीला बळ देते.

२०२३ च्या सेन्सिटी एआयच्या अहवालानुसार डीपफेक तंत्रज्ञानाच्या ९६ टक्के पीडित या महिला आहेत. समीक्षक सोफी बिशप यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘स्वयंचित्र-अर्थव्यवस्था (सेल्फी इकॉनॉमी) हे स्त्रीस्वातंत्र्य नसून लिंगभेदाची एक नवी आघाडी आहे.’’ फ्रेंच तत्त्वज्ञ फुको (Foucault) च्या सिद्धांतानुसार शरीरामध्ये रक्तवाहिन्या सर्वत्र ज्या प्रकारे पसरलेल्या असतात त्याप्रमाणे सत्ताकेंद्रे ही समाजामध्ये विखुरलेली असतात. शाळा, तुरुंग, राज्यव्यवस्था यांच्या माध्यमातून आपण एक बहिर्वक्र व्यवस्था निर्माण करत असतो ज्याच्या नाभीस्थानी ते घटक असतात ज्यांना सतत निगराणीखाली ठेवून त्यांची वर्तणूक नियंत्रित केली जाते. स्त्रीला या निरीक्षणाचा घटक मानले तर आदर्श स्त्रीचे चित्रण शिक्षण, वर्तणूक इत्यादी संस्करणातून हवी असलेली स्त्री घडविली जाते. सध्याच्या इंटरनेटच्या काळात सौंदर्य अल्गोरिदम, छळवणूक तंत्रे, प्रजनन, आहार, मासिक पाळी यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणाऱ्या अॅप्लिकेशन्समुळे स्त्रीत्वाला संहित करणे पुरुषप्रधान मानसिकतेला सहज शक्य झाले आहे.

एआयच्या जमान्यात समाजातील विविध पूर्वग्रह नैसर्गिकरीत्या स्वीकारले जात आहेत. अॅमेझॉनच्या एका एआयआधारित नोकरभरती प्रणालीने पुरुषांच्या अर्जांना प्राधान्य दिले. काही चॅटबॉट्सनी वापरकर्त्यांच्या लिंगानुसार स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारे करिअरविषयक समुपदेशन केले. संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाने केलेल्या १३३ एआय प्रणालींच्या अभ्यासात ४४ टक्के प्रणाली महिलांबद्दल पूर्वग्रहदूषित आढळल्या. २०२४ मध्ये जागतिक स्तरावर अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या निवडणुकांना सामोरे गेली. एआय प्रणालींच्या माध्यमातून स्त्रियांचे केले जाणारे चारित्र्यहनन, बाजारीकरण आणि द्वेषपूर्ण विधाने यावर या आयोगाने अभ्यास करत लोकशाहीत स्त्रियांच्या होणाऱ्या अवमूल्यनाचे धोके समोर आणले. एका पाहणीनुसार, एआय क्षेत्रातील तज्ज्ञांपैकी स्त्रिया केवळ एकतृतीयांश असून केवळ १८ टक्के संशोधकांना हे पूर्वग्रह रोखण्यासाठी लैंगिक समानतेची गरज वाटत आहे.

सत्तासंघर्ष ही फक्त निवडणुकीच्या स्वरूपातील राजकीय लढाई नसून तो व्यक्त-अव्यक्त स्वरूपात सत्ताधार्जिण्या आणि विद्रोही शक्तींमधील निरंतर संघर्ष आहे. दुर्दैवाने लैंगिक वर्चस्वाची लढाई हा सर्वात मूलभूत सत्तासंघर्ष. डिजिटल माध्यमांपासून रस्त्यांवर, समाजामध्ये महिला दिनाच्या निमित्ताने इस्ट्रोजेनचा पूर येईल. त्यात काही जण उखळ पांढरे करून घेतील. एक दिवस साजरा करून पापक्षालन केले की उरलेले ३६४ दिवस ये रे माझ्या मागल्या! उत्सवमूर्ती आणि उत्सवकर्ते, दोघेही खूश! बाकी खरी लैंगिक समानता तेव्हाच येईल जेव्हा महिला दिन साजरा करायची गरजच भासणार नाही.

तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gender inequality in the technology feminist perspective on technology challenges for women in technology zws